जेव्हा ३ टन बर्फ सहारा वाळवंटाच्या भट्टीतून सुखरूप बाहेर निघतो...वाचा १९५९ सालच्या आईसब्लॉक मोहिमेबद्दल !!
आपलाच माल कसा चांगला आहे हे दाखवण्यासाठी कंपन्या काय करतील याचा भरवसा नाही. जाहिरात करणं, माऊथ पब्लिसिटी किंवा एखादा कॅम्पेन आयोजित करणं हे झाले सरधोपट मार्ग, मात्र इतिहासात कधीकधी मार्केटिंगचे अस्से फंडे राबवले गेले आहेत की ज्याचं नाव ते! आता हेच बघा ना, ग्लासवॅट नावाच्या इन्शुलेटिंग ग्लास वूल बनवणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीने आपलं इन्शुलेटिंग मटेरियल किती उत्तम आहे हे सिद्ध करण्यासाठी तब्बल ८,००० किलोमीटर अंतरावर या मटेरियलच्या साह्याने रोधित केलेल्या कंटेनरमध्ये तीन टन बर्फ वाहून नेला. हा प्रयोग एक पब्लिसिटी स्टंट मानला जात असला तरी त्याचा सुरुवातीचा उद्देश होता तो एका स्पर्धेत सहभागी होण्याचा. चला तर, या आगळ्यावेगळ्या मोहिमेची माहिती घेऊ.
ग्लास वूल चा अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा तर त्याचा अर्थ आहे काचेपासून बनवलेली लोकर. हे एक उष्णता प्रतिरोधक मटेरियल आहे. काचेचे तंतू विशिष्ट प्रकारच्या बाइंडिंग मटेरियलने एकत्र बांधल्यावर तयार होणारं लोकरीसारखं टेक्श्चर म्हणजे ग्लास वूल. हे तयार करताना उच्च तापमानाला काचेच्या तंतूंमध्ये अनेक हवेच्या छोट्या पोकळ्या तयार होतात त्यामुळे त्याचे उष्णतारोधी गुणधर्म वाढतात. इमारतीच्या बांधकामात छतांमध्ये, भिंतींमध्ये, तसेच एसीमध्येही इन्शुलेटिंग मटेरियल म्हणून ग्लास वूल वापरली जाते. तर ही कंपनी अशा प्रकारे या मोहिमेत उतरू इच्छित होती.
ही मोहीम पार पडली १९५९ च्या शरद ऋतूमध्ये. त्याच्या आधीच्या शरदात रेडिओ लक्झेम्बर्गतर्फे एक आवाहन केलं गेलं होतं. लक्झेम्बर्ग हा पश्चिम युरोपमधला एक देश. त्याच्या पश्चिम आणि उत्तरेस बेल्जीयम, पूर्वेस जर्मनी आणि दक्षिणेला फ्रान्स आहे. तर इथल्या रेडिओ चॅनेलने आवाहन केले होते- ३ टन बर्फ 'जैसे थे' स्थितीत आर्क्टिक सर्कल पासून विषुववृत्तापर्यंत वाहून न्यायचा. यात मुख्य अट अशी होती की या मोहिमेदरम्यान कोणत्याही प्रकारच्या शीतकरणाला मान्यता नव्हती. हे कोणी करूच शकणार नाही असा या आयोजकांना आत्मविश्वास होता, त्याच भरात त्यांनी वाहून नेलेल्या बर्फाच्या प्रत्येक किलो मागे १ लाख फ्रँक्स एवढं घसघशीत इनाम जाहीर केलं. फ्रॅंक हे युरोपातल्या अनेक देशांमध्ये असलेलं चलन. यात स्वित्झर्लंड, फ्रान्स, बेल्जीयम, लक्झेम्बर्ग इत्यादी देशांचा समावेश आहे. आजच्या हिशेबाने १ लक्झेम्बर्ग फ्रॅंक म्हणजे २.१५ रुपये
मात्र त्यांना एक सवाई भेटला. बर्गर नॅटविक हे त्याचं नाव. ग्लासवॅट नावाच्या इन्शुलेटिंग ग्लास वूल बनवणाऱ्या नॉर्वेजियन कंपनीचा हा एम. डी. होता. त्याला या आव्हानात यशस्वी होण्याची बऱ्यापैकी खात्री होती. फायबरग्लासपासून बनवलेल्या ग्लास वूलमध्ये जर बर्फ काळजीपूर्वक गुंडाळला तर त्याच्या वितळण्याचं प्रमाण कमीत कमी ठेवून तो वाहून नेता येईल असा त्याचा हिशेब होता. हे प्रत्यक्षात आलं असतं तर कंपनीला लाखो फ्रँक्सची कमाई होणार होती. त्याने आपली कंपनी या स्पर्धेत उतरवायचं ठरवलं. ही बातमी पसरली आणि माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
कधी नॅटविकला अनुकूल, तर कधी त्याच्या विरोधात. स्पर्धेचं वातावरण तयार होऊ लागलं. नॅटविकने पूर्ण योजनेनिशी स्पर्धेत उतरण्याची तयारी केली. आता रेडिओ लक्झेम्बर्गला मात्र घाम फुटला. समजा, या बेट्याच्या म्हणण्याप्रमाणे नेला वाहून त्याने बर्फ, तर आपल्याला केवढा खड्डा पडेल असा विचार करून लक्झेम्बर्गने स्पर्धाच रद्द केली. पण आतापर्यंत नॅटविकने इतकी तयारी केली होती आणि मीडियामध्येही या गोष्टीवर इतकी चर्चा झाली होती की नॅटविकने स्पर्धा नसतानाही ही मोहीम पूर्ण करायचं ठरवलं. गेलाबाजार, त्यांना आपलं इन्शुलेटिंग मटेरियल किती उत्तम दर्जाचं आहे हे जगाला दाखवण्याची संधी मिळणार होती.
यासाठीचा बर्फ पुरवला स्वरटीझन नावाच्या ग्लेशियरने. २०० किलो वजनाचे बर्फ़ाचे तुकडे वितळवून त्यांच्यापासून ३०५० किलोचा एकच तुकडा बनवण्यात आला. तो एका लोखंडी चेंबरमध्ये ठेवला गेला. या चेंबरला आतल्या बाजूने ग्लासवूल आणि लाकूड यांचा थर लावून रोधक बनवलं गेलं. २२ फेब्रुवारी १९५९ रोजी मो इ राना इथून या बर्फाचा एका ट्र्कवरून प्रवास सुरू झाला.
युरोपात सगळीकडे या ट्रकचं उत्साहात स्वागत झालं. ट्रकवर ३०० किलोपेक्षा जास्त वजनाची औषधं होती आणि ती त्यांना मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये द्यायची होती. युरोपमध्ये अजून काही काही ठिकाणी यांत आणखी भर पडली. मात्र युरोपातील प्रवास खूपच सुसह्य होता. जिथेतिथे लोक एकत्र येऊन त्यांना मानवंदना देत होते. पॅरिसमध्ये तर तिथल्या महापौराने या लोकांना आपल्याबरोबर जेवणाचं पण आमंत्रण दिलं.
प्रवासाचा दुसरा टप्पा आफ्रिका हा मात्र खडतर ठरला. सहारा वाळवंटातला प्रवास खूपच त्रासदायक होता. भरीत भर म्हणून अल्जीरियात फ्रेंचांविरुद्ध बंड पुकारण्यात आल्याने तिथेही युद्धाचे ढग होते. वाळवंटात रस्ते धड नसल्याने त्यांचा ट्रक अनेकदा वाळूत फसायचा. तापमानही जास्त होतं आणि अजून वाईट म्हणजे पाण्याचा साठा मर्यादित होता.
अखेर निघाल्यापासून २७ दिवसांनी बर्फ मुक्कामी पोहोचला तेव्हा फक्त ११% बर्फ वितळला होता. ही एक प्रकारे ग्लासवूलच्या चांगल्या दर्जाची पावतीच होती.
या बर्फाचा काही भाग आफ्रिकन लोकांना - ज्यांनी पूर्वी कधीच बर्फ पाहिला नव्हता - वाटून देण्यात आला, तर काही बर्फ नोर्वेच्या राजधानीतल्या-ऑस्लोतल्या पत्रकारांच्या ड्रिंक्समध्ये मिसळण्यासाठी नॉर्वेला परत पाठवला गेला!
लेखिका : स्मिता जोगळेकर




