सनी देओलच्या सिनेमापासून प्रेरणा घेऊन आयपीएस अधिकारी बनलेल्या कॉन्स्टेबलची गोष्ट!!

सध्या यु ट्यूब आणि इतर सोशल मीडियावर मोटिव्हेशनल स्पीकर्सची भाषणे मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात. या लोकांपासून प्रेरणा घेऊन अनेक लोक यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात. काही यशस्वी होतात, तर काही होत नाहीत. मात्र कुणाला कुठून कशी प्रेरणा मिळेल हे काही सांगता येत नाही.

मनोज रावत नावाचे एक आयपीएस अधिकारी आहेत. जयपूर, राजस्थान येथील शामपुरा नावाच्या एका छोट्या गावात इतर मुलांसारखे त्यांचे शिक्षण सुरू होते. एकेदिवशी टीव्हीवर सनी देओलचा इंडियन सिनेमा लागला होता. या सिनेमात आयपीएस असलेला सनी देओल कशी देशसेवा करतो हे बघून मनोज रावत यांचा उर भरून आला.

मग का,य त्या लहान वयातच रावतांनी ठरवून टाकले. आता इंडियनमधील सनी देओलसारखे आयपीएस व्हायचे आणि देशसेवा करायची. प्रेरणा अनेक लोक अनेक ठिकाणांहून घेतात, पण प्रत्येक जन अधिकारी होत नाही. इंडियन बघून मनोज रावतांना मिळालेले मोटिव्हेशन वेगळे होते, हे मान्य करावे लागेल.

१८ वर्षं वय पूर्ण झाल्याबरोबर पोलीस भरतीत उतरून रावत यांनी पोलीस दलात प्रवेश केला. पण त्यांना कॉन्स्टेबल नाही,तर थेट आयपीएस व्हायचे होते. मग काय? अजून जोरात अभ्यास सुरू केला. २०१३ साली न्यायालयात लिपिक म्हणून त्यांची निवड झाली. ही नोकरी घेतली तर अभ्यास करायला वेळ मिळेल हे ओळखत त्यांनी लिपिक होणे पसंत केले. कारण घरी बसून अभ्यास करण्याइतकी चांगली परिस्थिती नव्हती.

पुढे त्यांची निवड सीआयएसएफमध्येही झाली. ती नोकरी मात्र त्यांनी नाकारली. त्यांचे लक्ष आता आयपीएस हेच होते. प्रचंड अभ्यास केल्यावर शेवटी त्यांना यश आले. आता ते आयपीएस होऊन देशसेवा करत आहेत. लहानपणी बघितलेले स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण झाले आहे.

मनोज रावत यांच्याकडे बघून मात्र संदीप माहेश्वरी किंवा इतरांकडून कितीही मोटिव्हेशन घेतले तरी सनी देओलच्या सिनेमांची बातच न्यारी हे ही समजून येते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required