computer

देशातली पहिली निवडणूक चक्क ५ महिने चालली.. वाचा तेव्हा काय घडलं याचे किस्से!!

मंडळी, भारतात अनेक निवडणुका गाजल्या, पण पहिली सार्वत्रिक निवडणूक ही ऐतिहासिक ठरली. त्यावेळच्या परिस्थितीचा जर विचार केला तर लक्षात येईल, की बहुसंख्य नागरिकांना निवडणुका काय असतात हेच माहित नव्हतं. सुरुवातीला राजेशाही आणि नंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून गेलेल्या भारताला नवीन राज्यपद्धती समजून घेण्याचा तो काळ होता. महत्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात नागरिक निरक्षर होते. अशा परिस्थितीत निवडणुका नेमक्या कशा पार पडल्या, मतदान कसं करण्यात आलं, नेमक्या काय अडचणी आल्या, त्यांच्यावर मात कशी करण्यात आली याबद्दल जाणून घेणं औत्सुक्याचं ठरेल.

चला तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने ऐतिहासिक ठरलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल जाणून घेऊया.

पहिली सार्वत्रिक निवडणूक ही निवडणूक नव्हती तर ५ महिने चालेलेला उत्सव होता. १५ ऑक्टोबर, १९५१ ते २१ फेब्रुवारी, १९५२ पर्यंत या निवडणुका पार पडल्या. एकूण १,८७४ उमेदवार निवडणुकीत उभे होते. पक्षांची संख्या ५३ होती, ज्यापिकी १४ पक्ष हे राष्ट्रीय पक्ष होते..

त्यावेळी मतदानास पात्र असलेल्या मतदारांची संख्या ही केवळ १७.३ कोटी होती. हा आकडा आज ९० कोटीवर पोहोचला आहे. नव्याने मतदान करणाऱ्यांची संख्या आज जवळजवळ १ कोटी पेक्षा जास्त आहे.

महिलांकडून मतदान करवून घेणं ही त्यावेळची सर्वात कठीण कामगिरी होती. स्त्रिया आपलं नाव सांगत नव्हत्या. विशेषतः उत्तर भारतातल्या स्त्रियांची ओळख ही स्वतःच्या नावापेक्षा कोणाची तरी बायको किंवा अमुक एकाची आई अशीच होती. आज हे समजून घ्यायला गम्मत वाटेल, पण त्याकाळी स्त्रियांनी आपली नावं अशीच सांगितली होती. निवडणूक आयोगाचे तत्कालीन मुख्य आयुक्त सुकुमार सेन यांच्याकडे जेव्हा अशा नावांची यादी आली तेव्हा त्यांनी ही यादी रद्दबातल केली. त्या यादीत जवळजवळ २८ लाख स्त्रिया होत्या. पुढे मतदानाच्यावेळी स्त्रियांनी स्वतःचं नाव सांगितलं.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे त्याकाळी निरक्षरतेचं मोठं प्रमाण होतं. नागरिकांना पक्षांची नावं वाचता येत नव्हती मग मतदान होणार तरी कसं. यावर उपाय म्हणून पक्ष चिन्हाची कल्पना काढण्यात आली. चिन्हावरून राजकीय पक्षाची ओळख पटू लागली. आज आपण जी पक्ष चिन्हं बघतो त्यापेक्षा वेगळी चिन्हं पहिल्या निवडणुकीत वापरण्यात आली होती. कॉंग्रेस पक्षाने बैलाचं चिन्ह निवडलं होतं तर फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने हाताचा पंजा चिन्ह म्हणून निवडलं होतं.

आता बोलूया प्रचाराबद्दल. त्याकाळी आजच्या सारख्याच सभा बोलावल्या गेल्या होत्या. उमेदवार घरोघरी जाऊन मतं मागत होते. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक डॉक्युमेंटरी पण तयार करण्यात आली होती. या डोक्युमेंट्रीला देशातल्या ३००० सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं.

हे मतदान शक्य झालं त्याचं श्रेय १६,५०० लेखनिकांना पण जातं. पात्र मतदार निवडण्यासाठी आणि त्यांची लिस्ट तयार करण्यासाठी ६ महिन्यांच्या करारावर हे लेखनिक कामावर ठेवण्यात आले होते. या कामात त्यावेळी कागदाच्या तब्बल ३,८०,००० रीम्स वापरण्यात आल्या. १ रिम म्हणजे ४८० ते ५०० कागदांचा गठ्ठा. याप्रमाणे हिशोब केला तर जवळजवळ १९ कोटी कागद. 

आता मतदानाकडे वळूया. मतदानाचं स्वरूप थोडं वेगळं होतं. एकच एक मतदान पेटी ठेवलेली नव्हती. मतदारांना मत देणं सोप्पं जावं म्हणून प्रत्येक पक्षासाठी वेगळी पेटी ठेवण्यात आली होती. या पेटीवर पक्ष चिन्ह आणि उमेद्वाराचं नाव लिहिण्यात आलं होतं. मतदारांना एक मतपत्रिका दिली जायची. ही मतपत्रिका आपल्या आवडत्या पक्षाच्या मतपेटीत टाकली की झालं मतदान.

गोदरेज कंपनी तर्फे वेगळ्या डिझाईन केलेल्या मतदानपेट्या भारताच्या पहिल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आल्या होत्या. या पेट्या बुलेटप्रूफ होत्या. तसेच कोणतीही छेडछाड केली तरी पेटी उघडणार नाही अशी दक्षता घेण्यात आली होती. या स्पेशल मतदानपेटीसाठी तब्बल ८,२०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता.

(मतमोजणी)

निवडणुकांची सुरुवात झाली ती हिमाचल प्रदेशच्या चीनी येथे. याच जागी बौद्ध भिख्खूंच्या एका समूहाने भारतातलं पाहिलं मतदान केलं होतं. मतदानाचा ६८ वा आणि शेवटचा टप्पा होता उत्तर प्रदेश. अशा प्रकारे ५ महिने हे मतदान चाललं.

 

मंडळी, कसा वाटला हा भारतातल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीचा प्रवास ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या !!

 

आणखी वाचा :

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? इथे क्लिक करा आणि जाणून घ्या !!!

स्वच्छ निवडणूक अभियानाचा जनक - ‘टी.एन. शेषन’ !! त्यांच्याबद्दलची ही सगळी माहिती तुम्हांला नक्कीच माहित नसेल..

अच्छे दाग वाली ही शाई येते तरी कूठून : या घेऊया शाईचा मागोवा

सबस्क्राईब करा

* indicates required