computer

हे बेट सहा महिने फ्रान्स, तर ६ महिने स्पेनच्या मालकीचे का असते? सीमावाद सोडवण्याचा हा भन्नाट प्रकार वाचाच!!

कोणत्याही देशात सीमावाद असणे यात काही नवल नाही. समुद्री सीमा असोत की भूसीमा, सीमा निश्चित करण्यात नेहमीच समस्या येतात. अशावेळी काही देश युद्धाचा मार्ग निवडतात तर काही देश चर्चेने समस्या सोडवतात. या समस्या सोडवताना कधीकधी आश्चर्यकारक कल्पना राबवल्या जातात.

डेन्मार्क आणि कॅनडामध्येही असं हान्स बेटाच्या मालकीवरुन युद्ध चालू होतं, पण ते विचित्र व्हिस्कीयुद्ध होतं. 

दोन देशांच्या सीमावादातून व्हिस्की युद्ध कसं सुरु झालं? हा किस्सा वाचाच !!

असंच सीमावादाचं आणखी एक विचित्र उदाहरण फ्रान्स आणि स्पेनमध्ये पाहायला मिळेल. या दोन्ही देशादरम्यान बिडोसा नावाची एक नदी वाहते. ही नदी म्हणजेच या दोन देशांची सीमारेषा आहे. या नदीतून प्रवास करताना तुम्हाला आढळेल की, फ्रांसच्या किनाऱ्यावर औद्योगिक इमारती दिसतील, तर स्पेनच्या बाजूला मोठमोठे रहिवाशी बंगले. इथे कुठेच तारांचे कुंपण आणि दोन्ही बाजूला बंदुकधारी सैनिक दिसणार नाहीत. जसेजसे नदीतून तुम्ही पुढे जाल तसे मध्ये तुम्हाला एक अगदी छोटे बेट दिसेल. फ्रांस आणि स्पेन दरम्यान असणारे हे फिजंट बेट हा कधीकाळी वादाचा मुद्दा होता, पण दोन्ही देशांच्या सत्ताधीशांनी यावर एक भन्नाट तोडगा शोधून काढला. आज आम्ही तुम्हाला या फीजंट बेटाची गोष्ट सांगणार आहोत. हे बेट सहा महिन्यांसाठी फ्रान्समध्ये असते आणि उर्वरित सहा महिन्यांसाठी स्पेनमध्ये!!

बिडोसा नदीच्या मध्यभागी अत्यंत शांत, झाडाझुडपांनी वेढलेले, गवताची छानछोक छाटणी केलेले असे हे फिजंट बेट आहे. याशिवाय १६५९ साली या बेटावर जो करार झाला त्याचे एक स्मारक इथे आहे. याशिवाय इथे तुम्हाला काहीही पाहायला मिळणार नाही. इथे दोन्ही देशांतील नागरिकांना जाण्यास बंदी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ फारफार तर दीड दोन एकर इतके भरेल.

पूर्वी फ्रान्स आणि स्पेनमध्ये या बेटाच्या मालकी हक्कावरुन बराच संघर्ष झाला आहे. त्यानंतर १६५९ साली तीन महिन्यांच्या सलग चर्चेनंतर या बेटाच्या मालकीवर एक भन्नाट कल्पना योजण्यात आली. ही कल्पना अंमलात आणण्यासाठी स्पेन आणि फ्रान्सने एक करार केला, या कराराला पायरीनिस करार म्हटले जाते. या कराराचे स्मरण रहावे म्हणून इथे एक स्मारक बांधण्यात आले आहे आणि त्यावर या कराराच्या मसुद्यातले महत्वाचे मुद्दे नमूद केले आहेत. या करारानुसार हे बेट १ फेब्रुवारी ते ३१ जुलै दरम्यान स्पेनच्या अधिपत्याखाली असते आणि त्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी ते फ्रान्सच्या अधिपत्याखाली असते. १६५९ पासून म्हणजे गेली ३६२ वर्षापासून या बेटाचे असे हस्तांतरण सुरूच आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये फ्रेंच प्रतिनिधी स्पेनच्या प्रतिनिधींकडे हे बेट सुपूर्द करतात आणि पुन्हा ऑगस्टमध्ये ते परत घेतात. आतापर्यंत सुमारे सातशे वेळा ही अदलाबदल घडून आली असेल.

१६५९साली जेव्हा पहिल्यांदा या बेटाचे हस्तांतरण झाले तेव्हा या हस्तांतरणाच्या निमित्ताने फ्रान्स आणि स्पेनमध्ये शाहीविवाह देखील पार पडला होता. फ्रेंचचा तत्कालीन राजा चौदावा लुई याने स्पॅनिश राजा चौथा फिलीप याच्या मुलीशी लग्न केले. त्यानंतर कधीकाळी फक्त शाही विवाहासाठीच दोन्ही देशातील नागरिक या बेटावर जमा होत. आता शाही विवाहसोहळ्याचे रूपही पालटले आहे.

आताही जेव्हा वर्षातून दोन वेळा या बेटाचे इकडून तिकडे-तिकडून इकडे हस्तांतरण केले जाते तेव्हा जंगी कार्यक्रम केला जातो. सध्या या कार्यक्रमांनाही फाटा देण्याची चर्चा सुरु आहे. इतर वेळी मात्र पलीकडील राष्ट्राचा कोणीही नागरिक या बेटावर येणार नाही याची खबरदारी घेतली जाते. पर्यटकांसाठीही हाच नियम आहे. इथे कुणीही भेट देऊ शकत नाही.

मालकी हक्कासाठी झगडणाऱ्या दोन्ही देशांनी या छोट्याशा बेटावर कसल्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नाही. कधी कधी पाण्याच्या प्रवाहाचा जोर वाढला की बेटावरील जमिनीची धूप होते. त्यामुळे सध्या या बेटाचा काही भाग खचला आहे. बेटाचे आकारमान पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे. तरीही बेटाच्या संवर्धनासाठी काही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. मात्र वाढलेल्या गवताची छाटणी वेळोवेळी करण्यात येते. बेटावरील झाडांचीही निगा राखली जाते. मात्र फक्त दीड एकर क्षेत्रात पसरलेल्या या बेटावर कुणीही वास्तव्य करू शकत नाही.

ही होती दर सहा महिन्यांनी देश बदलणाऱ्या फीजंट आईसलॅंडची गोष्ट! फीजंट आईसलॅंडची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required