computer

मॅपमायइंडिया: 'गुगल मॅप'ला टक्कर देण्यासाठी अस्सल भारतीय नेव्हीगेशन ऍप आलंय...महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या !!

गुगल मॅपला टक्कर द्यायला येतंय खास भारतीय नेव्हीगेशन ऍप. भारतीय ऍप वापरायला सध्या सगळीकडेच पसंती आहे. गुगल मॅप आणि गुगल अर्थला सध्यातरी कुठलाच पर्याय नाही. त्यासाठीच मॅपमायइंडिया या कंपनीने पुढाकार घेतला आहे. मॅपमायइंडिया ही नेव्हीगेशन उपलब्ध करून देणारी भारतीय कंपनी आहे. इस्रो (Indian Space Research Organisation) आणि मॅपमायइंडिया यांनी नुकतीच या सर्विससाठी हातमिळवणी केली आहे. इस्रोबरोबर संलग्न झाल्याने ही स्वदेशी नेव्हीगेशन सर्व्हिस कंपनी सॅटेलाइट बेस्ड सर्विस खास भारतीयांसाठी घेऊन येत आहे. हे अत्याधुनिक ऍप लवकरच सूरू होईल.

मॅपमायइंडियाचे सीईओ रोहन वर्मा यांनी सांगितलं की इस्रोकडून सॅटेलाईट इमेजेस उपलब्ध होतील आणि मॅपमायइंडियाकडून सर्विस दिली जाईल. आत्मनिर्भर भारत अभियानात हे खूप महत्वाचे पाऊल ठरेल. परदेशी कंपन्या देत असलेले नेव्हीगेशन मोफत असल्याचा दावा करत असतील तरीही जाहिरातीतून पैसे मिळवतच असतात. शिवाय त्यातला डेटा सुरक्षितही नसतो. परंतु हे भारतीय अँप पूर्णपणे सुरक्षित असेल व मोफतही असेल.

हे ऍप बनवताना NavIC (Navigation with Indian Constellation)  आणि भुवन (Bhuvan) यांचीही मदत होणार आहे. NavIC ही सुद्धा एक भारतीय नेविगेशन सिस्टम आहे जिला इस्रोनेच तयार केले आहे. मॅपमायइंडिया १९९५ पासून डिजिटल मॅपिंगमध्ये कार्यरत आहे. ७.५ लाख गाव, ७५००पेक्षा जास्त शहरांचे रस्ते यात समाविष्ठ आहेत. जवळजवळ ३ कोटींपेक्षा जास्त ठिकाणांचे नकाशे यात असतील. भौगोलिक परिस्थिती जसे की पाऊस, वादळ,भूकंप, पूर अश्या गोष्टींचा अंदाज हे ऍप सांगेल. ही भारतीय सर्व्हिस जास्त अचूक माहिती सांगेल याची ग्वाहीही देण्यात येतेय.

गुगल मॅप वापरताना अनेक वेळा गडबड होते. भारतीय रस्ते, त्यांची नावं आणि माहिती सहज समजत नाही. या सगळ्या गोष्टी सोप्या होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारतीयांना पाकिस्तानचा नेव्हीगेशन डेटा देण्यास नकार दिला होता. तेव्हापासून असे भारतीय मॅपिंग सर्व्हिस बनवायचे प्रयत्न सुरू होते. या ऍप चा इंटरफेसही गुगल मॅप सारखा असेल व वापरायलाही सोपा असेल.

आता प्रत्यक्ष आल्यावर अजून पुढची माहितीही कळेलच. पण तोपर्यंत या अँपची उत्सुकता नक्कीच सर्व भारतीयांना राहील हे नक्की. तुम्हाला काय वाटतं?

 

लेखिका: शीतल दरंदळे

 

आणखी वाचा:

तुम्ही कुठं जाता याची सगळी माहिती गुगल मॅप्सकडे आहे. तुम्हीच पाहा गेल्या वर्षभरात तुम्ही कुठल्या ठिकाणांना भेट दिली ते..

भाऊ आपल्या लातूरच्या निलंग्यात झूम केल्यावर काय दिसतं पाहा !!

९९ स्मार्टफोन्स वापरून त्याने चक्क गुगल मॅप्सला मुर्खात काढलं?

गुगल मॅप्सच्या सल्ला घेतला म्हणून त्याच्यावर पश्चातापाची वेळ का आली ? काय घडलं बघा !!

सबस्क्राईब करा

* indicates required