हरवलेलं गाव तब्बल ७० वर्षांनी तलावाच्या तळाशी सापडलं आहे...हा शोध कसा लागला?

एखादी वस्तू, माणसाचे किंवा प्राण्यांचे अवशेष उत्खननात सापडणे हे तसे नवीन नाही. इतिहासतज्ञ जितके या शोधात उत्सुक असतात तितकेच सर्वसामान्य लोकांच्या मनात याविषयी कुतूहल असतेच. अश्या बातम्या आपण वरचेवर ऐकत असतोच. सध्या जगभर अशीच एक चर्चा सरू झाली आहे. तब्बल ७१ वर्षापूर्वीचे एक अख्खे गाव सापडले एका तलावाच्या खोल आत सापडले आहे. ही गोष्ट जेव्हा सोशल मिडीयामुळे बाहेर पडली तेव्हा खूप चर्चा झाली. त्या गावाचे फोटोही नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करून गेले आहेत.
इटलीच्या दक्षिण टायरॉल भागात असलेल्या रेसिया तलावात (lake resia) हे गाव सापडले आहे. हा भाग ऑस्ट्रिया स्वित्झर्लंडच्या सीमारेषवर हा आहे. त्यावर आधी ऑस्ट्रियाचा हक्क होता, परंतु पहिल्या जागतिक युद्धानंतर तिथे इटलीने ताबा मिळवला.
तर, गाव सापडण्याआधीपासून इथला तलाव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे कारण म्हणजे, या तलावाच्या मधोमध एक १४व्या शतकातले चर्च आहे. हे चर्च अर्धे पाण्याखाली बुडालेले आहे. चर्च पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. थंडीच्या दिवसांत या चर्चभोवती बर्फ साचतो, त्यामुळे या चर्चच्या टोकापर्यंत चालत जाताना पर्यटकांना मजा येते. तर उन्हाळ्यात तलावाच्या पाण्यामुळे ते चर्चचे देखणे रूप कॅमेऱ्यात कैद करायला पर्यटक येत असतात.
बऱ्याच वर्षानंतर या तलावाच्या दुरुस्तीचे काम करायचे असल्याने तिथले पाणी काढण्यात आले. त्यावेळी पाण्याच्या खाली गुडूप झालेल्या गावाचे अवशेष सापडले. त्यातली घरे, पायऱ्या अनेक वस्तू दिसू लागल्या. तिथे काम करणाऱ्या Louise DM यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. असे म्हणतात तलावाखली गाडले गेलेले ते क्यूरॉन नावाचे एक गाव आहे. १९५० च्या आधी जेव्हा तिथे हा तलाव नव्हता तेव्हा तिथे जवळजवळ १६० घरे होती. शेकडो लोकांची वस्ती त्या गावात होती. पण नंतर एक धरण बनवण्यासाठी तिथले जवळजवळ असलेले दोन तलाव एकत्र केले गेले आणि त्यामुळे क्यूरॉन गावाचे अस्तित्व मिटले. तिथले लोक आजूबाजूच्या गावात राहायला गेले. क्यूरॉन गावाच्या कथेवर आधारीत Netflix वर एक सिरीज देखील आहे. क्यूरॉन गावावर आधारित पुस्तकही प्रसिद्ध आहे.
इटलीच्या या अनोख्या गावाची गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या भारतातल्या या दोन गावांच्या कथा तर वाचायलाच हव्या. इटलीच्या गावापेक्षाही या गावांच्या कथा जास्त रोचक आहेत.
हे गाव वर्षातून एकदाच पाण्याबाहेर येतं ? काय आहे या गावाचं रहस्य ?
तालकडू : वाळवंटात गाडल्या गेलेल्या मंदिरांचं शहर....
लेखिका: शीतल दरंदळे