फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?

⁠⁠⁠⁠⁠आपल्या देशातल्या मुली दहावी, बारावी नापास झाल्या की नवीन लॉट लग्नासाठी तयार झाला म्हणून जोक करणारे आपण एक प्रकारे स्त्री शिक्षणावर शिंतोडे उडवतो असंच वाटत राहतं. मुलीच्या शिक्षणाची मोठी समस्या आपल्या देशात आजही आहे. चूल आणि मूल हा प्रकार अजूनही बघायला मिळतो. याविषयी जपानकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे मंडळी.

Image result for only one girl railway japanस्रोत

जपान मध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन जवळ जवळ बंदच आहे असं म्हणू शकतो. कारण ही जागा जपानमध्ये खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी तसे कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती.  पण तेवढ्यात त्यांना समजलं की 'काना हाराडा' नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.

Image result for only one girl railway japanस्रोत

एवढ्यावर न थांबता जपान रेल्वेजने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.

एखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. यासाठी जपानला मानाचा मुजरा !!