पुरुषबंदी असलेले महिलांचे गाव...सिरियाच्या युद्धभूमीवरचं एक आश्चर्य!!

युद्ध आयुष्य उध्वस्त करतं, पण त्या सोबत खंबीर नेतृत्वाला जन्म देतं हा इतिहास आहे. सिरीया मध्ये चाललेल्या यादवी युद्धामुळे अशाच खंबीर नेतृत्वाला जन्म दिला आहे. सिरियाच्या काही महिलांनी ठरवलंय की त्या पुरुषांवर निर्भर राहणार नाहीत. यासाठी त्यांनी युद्धभूमीच्या मधोमध ते करण्याची हिम्मत केली ज्याचा विचार कोणी करणार नाही....त्यांनी असं काय केलं ? चला पाहूया.

स्रोत

फोटोत दिसणारा गेट आहे 'जीनवर' (Jinwar) गावाचा. गेटवर महिला सुरक्षाकार्मी आपण पाहू शकतो. अवघ्या ३० घरांच्या या गावात फक्त महिला राहतात. गावातल्या रोजच्या कामापासून ते गावाच्या सुरक्षेपर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिला पार पाडतात. सिरीया सारख्या धगधगत्या देशात काही मुठभर महिलांनी मिळून हे नंदनवन वसवलं आहे. दोन वर्षापूर्वी या गावाची स्थापना झाली. पितृसत्ताक व्यवस्था आणि दडपशाही यांना नाकारणाऱ्या प्रत्येक महिलेला इथे स्थान आहे.

स्रोत

मंडळी, या गावाचा जन्म फक्त पितृसत्ताक पद्धतीला नाकारल्यामुळे झाला असा गैरसमज करून घेऊ नका. त्या मागे सिरियातील आजची परिस्थिती तेवढीच कारणीभूत आहे. एकीकडे ISIS आणि दुसरीकडे यादवी युद्ध अशा अत्यंत धोकादायक भागात राहणाऱ्या महिलांची परिस्थिती काय असेक याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

आंतरराष्ट्रीय संस्थांनी आणि स्थानिक महिलांनी मिळून या गावाची स्थापना केली आहे. हे गाव सिरियाच्या ज्या उत्तरेच्या भागात वसलं आहे तिथे आजही ISIS चा प्रभाव आहे. जीनवर पासून काही मैल लांब असलेल्या परिसरातून असंख्य याजीदी पुरुषांना मारण्यात आलं होतं आणि महिलांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून पकडून नेण्यात आलं होतं. अशा परिस्थितीत कुर्दिश महिलांना हातात शस्त्र घेण्यावाचून पर्याय नव्हता.

स्रोत

लहान वयात लग्न, गरोदरपण आणि पतीचं छत्र हरपलेल्या महिला तसेच युद्धात पती मारला गेल्याने बेघर झालेल्या स्त्रियांना या गावात एकत्र करण्यात आलं आहे. याशिवाय ज्यांना स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे अशा मुलींना/महिलांना गावात स्थान आहे. गावातल्या भिंतीवर लिहिलेली एक ओळ याबाबतीत बोलकी आहे. तिथे लिहिलंय “स्त्री शिवाय स्वातंत्र्य नाही. (आणि) जोवर स्त्री शिक्षित आणि सशक्त होत नाही तोवर स्वातंत्र्य मिळणार नाही.” 

स्रोत

महिला सबलीकरणासोबत गावाने काही आदर्श घालून दिलेत. गावात पारंपारिक शेती केली जाते. शेतमालातून येणारा पैसा हा रोजच्या गरजांसाठी वापरला जातो. गावात प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर होण्यास शिकवले जाते. गावात शाळाही आहे. मुलांसोबत गावात राहायला आलेल्या महिलांच्या राहण्याची, कामाची आणि आणि मुलांसाठी शिक्षणाची सोय गावात करण्यात आली आहे.

स्रोत

मंडळी, सिरीयाच्या युद्धजन्य भागात महिला सबलीकरणाचा विचार करणे हे फक्त कल्पनेतच होऊ शकतं, पण जीनवरच्या महिलांनी ते सत्यात उतरवलं आहे. यासाठी झटणाऱ्या प्रत्येक महिलेस बोभाटाचा सलाम !!

 

आणखी वाचा :

शनिवार स्पेशल : नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेली नादिया मुराद आहे तरी कोण ? काय आहे तिची कहाणी ?

सबस्क्राईब करा

* indicates required