computer

शनिवार स्पेशल : नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलेली नादिया मुराद आहे तरी कोण ? काय आहे तिची कहाणी ?

काल शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. डेनिस मुकवेगे आणि याजीदी महिला कार्यकर्ता नादिया मुराद (वय वर्ष २५) यांना हा पुरस्कार जाहीर झाला. दोघांनीही लैंगिक अत्याचाराला युद्धादरम्यान हत्यार म्हणून वापरण्याविरुद्ध मोठा लढा दिला आहे. नादिया स्वतः त्या असंख्य मुलींपैकी एक होती ज्यांना ISIS च्या लैंगिक अत्याचाराला बळी पडावं लागलं होतं. 'मलाला युसूफझाई' नंतर सर्वात कमी वयाची नोबेल पारितोषिक विजेती म्हणून तिचं नाव घेतलं जातं आहे. आज शनिवार स्पेशल मध्ये आपण पाहूयात नादिया मुरादच्या खडतर प्रवासाची कहाणी.

नादियाच्या वाईट दिवसांना सुरुवात होण्याआधी ती आई आणि भाऊ-बहिणींसोबत इराकच्या उत्तर भागातल्या कोचू गावात राहायची. ISIS च्या हल्ल्यापूर्वी तिचं शिक्षण सुरु होतं. मग ३ ऑगस्ट २०१४ उजाडलं. या दिवशी याजीदी लोकांवर ISIS च्या आतंकवाद्यांनी हल्ला चढवला.

कोचू हे गाव शिंजा भागात आहे. त्या भागातले अनेक गावकरी तिथून शिंजा पर्वताच्या दिशेने पाळले. पण नादियाचं गाव तिथून लांब असल्याने ते सहज ISIS च्या तावडीत सापडले. ३ ते १५ ऑगस्ट पर्यंत गावकऱ्यांना ओलीस ठेवण्यात आलं.

नादिया सांगते की “आम्हाला पकडलं तेव्हा बातम्या आल्या की जवळजवळ ३००० लोकांना मारण्यात आलंय आणि ५००० स्त्रिया व मुलांना पकडण्यात आलंय.”

मंडळी पुढे सांगण्याआधी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की याजीदी हा एक वेगळा धर्म आहे. या धर्मातली बरीचशी तत्वे ही पारसी, सुफी आणि काही प्रमाणात ख्रिश्चन धर्मातली आहेत. आतंकवाद्यांनी गावकऱ्यांना इस्लामचा स्वीकार करण्यासाठी २ दिवसांची मुदत दिली होती. या दोन दिवसात अनेक घटना घडल्या.

१५ ऑगस्टच्या दिवशी १००० कट्टरपंथीय गावात घुसले, त्यांनी स्त्री आणि पुरुष असे दोन गट पाडले. या दोन्ही गटांना गावातल्या शाळेच्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवलं. त्यांच्याकडील सर्व वस्तू काढून घेण्यात आल्या. यानंतर त्यांच्या लीडरने घोषणा केली की ज्यांना कोणाला इस्लाम स्वीकारायचा आहे ते या रूम मधून बाहेर जा. नादिया म्हणते की ‘घोषणे नंतर कोणीच तिथून हललं नाही. तिथून बाहेर पडले तरी त्यांचं मरण ठरलेलच होतं.’ कारण हे कट्टरपंथी याजीदी मुस्लिमांना अस्सल मुस्लीम समजत नाहीत.

यानंतर पहिल्या मजल्यावरच्या सर्व पुरुषांना एकत्रितपणे बाहेर घेऊन जाण्यात आलं. नादिया म्हणते की ‘त्यावेळी काय घडलं माहित नाही, पण गोळ्यांचा आवाज येत होता.’. तिथे उपस्थित सर्व पुरुषांना गोळ्या घालण्यात आल्या. यात नादियाचा भाऊ पण होता.

(प्रातिनिधिक फोटो)

यानंतर महिलांना दुसऱ्या गावात नेण्यात आलं. तिथे त्यांचे तीन गट पाडण्यात आले. पहिला गट तरुण मुलींचा होता, दुसरा गट लहान मुलांचा, तिसऱ्या गटात उरलेल्या महिला होत्या. ज्या महिला लग्नाच्या लायक दिसत नव्हत्या त्या सगळ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. यात नादियाच्या आईचा सुद्धा समावेश होता.

या महिला त्या असंख्य महिलांपैकी एक होणार होत्या ज्यांचा पुढे 'सेक्ससाठी गुलाम' म्हणून वापर झाला.

नादिया आणि तिच्या सोबतच्या सर्व तरुण मुलींवर बलात्कार करण्यात आला. त्याच अवस्थेत त्यांना इराकच्या मोसुल मध्ये असलेल्या इस्लामिक कोर्टात नेण्यात आलं. तिथे सगळ्या मुलींचे फोटो घेण्यात आले. नादिया म्हणते की ‘इस्लामिक कोर्टात असंख्य महिलांचे फोटो आणि त्या खाली एक फोन नंबर लिहिलेला होता. हा फोन नंबर त्या त्या महिलेला पकडून आणलेल्या माणसाचा होता.’

इराकच्या सर्व भागातून ISIS चे कट्टरपंथी तिथे यायचे आणि मुलींची निवड करायचे. निवड केलेल्या मुलीचा/मुलींचा योग्य ती भाव लावला जायचा आणि एखाद्या वस्तू सारख्या त्या मुली एका हातातून दुसऱ्या हातात जायच्या. या मुलीना त्यानंतर ‘भाडे तत्वावर’ दिलं जायचं किंवा मग जवळच्या माणसाला ‘भेट’ म्हणून पाठवलं जायचं. नादियाला सुद्धा अशाच प्रकारे विकण्यात आलं.

नादियाने एक आठवड्यानंतर तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिला पकडण्यात आलं. शिक्षा म्हणून तिच्यावर ६ सुरक्षाकार्मींनी बलात्कार केला. याचा फैसला कोर्टानेच केला होता. यानंतर ३ महिने तिच्यावर अशाच प्रकारे अत्याचार होत राहिला. तिच्या सोबत असलेल्या मुलींनी अत्याचाराला कंटाळून जीव दिला. नादियाने पण आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण ती वाचली. याला दुर्दैव म्हणावं की सुदैव ?

तिने पळून जाण्याचा दुसरा पर्यंत केला तेव्हा ती एका मुलाच्या ताब्यात होती. तो तिला विकणार होता. एकदा घरी कोणी नसताना तिने हिमतीने तिथून पळ काढला. मोसुलच्या भागातून पळत ती एका मुस्लीम परिवाराच्या दारात पोहोचली. या परिवाराने तिची कहाणी ऐकून तिला कुर्दिस्तानच्या सरहद्दीपर्यंत पोहोचवलं

यशस्वीपणे सुटका होऊनही तिच्यामागील साडेसाती संपली नाही. कोणत्याही देशात जाण्यासाठी तिच्याकडे कागदपत्र नव्हती. कागदपत्र मिळवण्यासाठी तिला अनेक महिने इराक मध्येच राहावं लागलं. तिथे असलेल्या शिबिरांमध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल जाणून घेण्यास कोणालाही रस नव्हता. तिला इराक मध्ये घडत असलेल्या अत्याचाराला सर्वांसमोर आणायचं होतं. त्याच दरम्यान जर्मनीने १००० लोकांना मदत करण्याची घोषणा केली. त्या १००० लोकांमध्ये नादिया होती. तिला एका संघटनेने संयुक्त राष्ट्रात जाऊन आपली कहाणी सांगण्याचा सल्ला दिला. २०१६ साली तिने अमेरिकेच्या कॉंग्रेस मध्ये भाषण देताना ISIS ला संपवण्याची मागणी केली.

आज ती ३००० याजीदी महिलांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे ज्या आजही सापडलेल्या नाहीत. यावर्षीच्या शांतता पुरस्काराने तिच्या कार्याला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.

मानवी आयुष्याची जेवढी म्हणून धूळधाण होऊ शकते तेवढी धूळधाण होऊनही ती खंबीर राहिली. शेवटी एवढं सगळं होऊनही त्यापासून पळून न जाता तिच्या सारख्या असंख्य मुलींना त्यातून बाहेर काढण्याचं श्रेष्ठ काम तिने केलं आणि आजही करत आहे. अशा या अग्निदिव्यातून पार पडून सोन्यासारख्या चमकणाऱ्या नादिया मुरादला बोभाटाचा सलाम.

सबस्क्राईब करा

* indicates required