computer

किस्से नोबेलचे: एकाच वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकाला नोबेल मिळाल्याचा किस्सा कधी आणि कसा घडला ?

नोबेल पुरस्काराचं महत्त्व सांगावं लागत नाही. हा असा पुरस्कार आहे, जो पूर्ण देशभरात एखाद्याला मिळाला तरी पूर्ण देश आनंदोत्सव साजरा करतो. पण एकाच वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना नोबेल पुरस्कार मिळाला असेल तर?. एवढंच नाही, तर त्यांच्या शिक्षकालासुद्धा नोबेल पुरस्कार मिळाला असेल तर? विश्वास बसत नाही ना? चला तर मग जाणून घेऊया नोबेलचा असाच एक किस्सा...

ही गोष्ट आहे 1930 च्या दशकातली. तेव्हा भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना शिकागो येथील एका विद्यापीठात ऍस्ट्रोफिजिक्स शिकवण्याची संधी मिळाली होती. तो असा काळ होता जेव्हा वर्गात किती मुलं बसतात यावरून एखादा प्राध्यापक किती लोकप्रिय आहे हे कळत असे.

प्राध्यापक मंडळी देखील आपल्या वर्गात किती मुले बसतात हे गर्वाने सांगत असत. पण याबाबतीत सुब्रमण्यम चंद्रशेखर दुर्दैवी होते. त्यांच्या वर्गात फक्त दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. संग दाऊ ली आणि रँग चेन निंग असे ते दोन विद्यार्थी. या गोष्टीवरून चंद्रशेखर यांची चांगलीच टिंगल होत असे.

त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे जिथे त्यांचा वर्ग होता ती जागा विद्यापीठ कॅम्पसपासून ८० मैल दूर होती. फक्त दोघांना शिकवण्यासाठी येण्याजाण्याचे धरून १६० मैल प्रवास त्यांना करावा लागणार होता. लोकांना वाटले की दोन विद्यार्थ्यांना काय आता चंद्रशेखर शिकवत नाहीत. पण तसे घडले नाही.

चंद्रशेखर यांना शिकविण्यावर विशेष प्रेम होते. त्यात ऍस्ट्रोफिजिक्स त्यांचा आवडता विषय. त्यांनी दोन विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. दोनच विद्यार्थी असल्यामुळे चंद्रशेखर खेळीमेळीने पूर्ण विषय त्यांना समजावून देत असत. पुढे जाऊन त्यांच्या या दोन्हीही विद्यार्थ्यांनी चांगलेच कर्तृत्व गाजवले.

एका पाठोपाठ एक करत दोन्ही विद्यार्थ्यांना नोबेल पुरस्कार मिळाले, एवढेच नाहीतर चंद्रशेखर यांना देखील १९८३ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशाप्रकारे जगाच्या इतिहासात हा एकमेव असा वर्ग होता, त्यातल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकाला देखील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. फक्त विद्यापीठात नाहीतर जगात आजवरचा सर्वाधिक यशस्वी वर्ग हा ठरला असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. प्रख्यात नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रामन सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे काका. थोडक्यात, नोबेल पुरस्कार विजेत्यांचे हे एक कुटुंबच होते.

सबस्क्राईब करा

* indicates required