या चित्रपट निर्मात्यांनी ६ महिने टाकून दिलेल्या अन्नावर ताव मारून डोळ्यात अंजन घातलंय!
आपण अन्न हे पूर्णब्रह्म मानतो. पानात अन्नाचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नाही हा महत्वाचा नियम आपण लहानणापासूनच अंगी बाणवतो. आजही जगात अशी खूप मोठी जनसंख्या आहे ज्यांना अन्नाचा एक कण मिळायलाही खूप झगडावे लागते. हे असं असतानाही जगात अनेक शहरांत कितीतरी टन अन्न वाया घालवले जाते, फेकले जाते. सगळ्यात वाईट बाब ही आहे की हे सगळेच अन्न खराब झालेले नसते. जेन रुस्टेमेयर आणि ग्रँट बाल्डविन या जोडीने कॅनडातील टाकून दिलेले अन्न खाऊन राहण्याचा एक आगळावेगळा प्रयोग केला. त्यावर एक डॉक्युमेंटरी ही केली. काय आहे ही सर्व कहाणी आज या लेखात पाहूयात.
अन्नाचा अपव्यय ही तशी पहिली तर मोठी समस्या आहे आणि म्हणलं तर नाही. कारण प्रत्येकाने सामाजिक भान राखून हा प्रयोग स्वतःच्या घरापासून सुरू केला तर बरेच अन्न वाचेल. अमेरिकन कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेमध्ये दरवर्षी अंदाजे १३३ अब्ज पौंड अन्न न खाता फेकले जाते. सुट्यांमध्ये हे प्रमाण अजून वाढते. जेन रुस्टेमेयर आणि ग्रँट बाल्डविन या दोघांना दिसले की वाया गेलेल्या अन्नापैकी अर्धे अन्न आपण खाऊ शकतो. मुळात गरजेपेक्षा जास्त अन्न विकत घेतले जाते आणि बनवले जाते. अन्न वाढताना ही ते जास्त प्रमाणात सर्व्ह केले जाते. य सर्व गोष्टींमुळे कचरापेटीत खूप मोठ्या प्रमाणात चांगले अन्न सापडते.
घरातल्या अन्नाची ही कहाणी आहे, तर शेतमालाच्या बाबतीतही असेच होते. आपल्याकडे थोड्या डागाळलेल्या फळांची वर्गवारी करुन ती थोडी स्वस्त विकली जातात. पण बऱ्याच ठिकाणी अशा मालाला उठाव नसतो. साहजिकच ही डाग असलेले फळं फेकली जातात. कारण ही फळं वय व्यापारी घेत नाहीत तसेच ग्राहकही पाठ फिरवतात. त्यामुळे हा माल गोदामात टाकला जातो. त्यांनी कॅलिफोर्नियातील एका पीच शेतकऱ्याला भेट दिली तेव्हा त्यांना समजले की त्याचे ३० ते ७० टक्के पीचेस केवळ खराब दिसतात म्हणून वाया गेली होती. पण खरेतर ती ताजी आणि तेवढीच चवदार होती.
दुकानात किंवा मॉलमध्येही त्यांना अनेक धक्कादायक गोष्टी दिसल्या. त्यांनी एका मॉलमध्ये पाहिले की एक्सपायरी डेटच्या जवळ आलेला माल फेकला होतो. मोठमोठ्या कॅन्समध्ये तो गोदामात ठेऊन शेवटी फेकून दिला जातो.
या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर जेन रुस्टेमेयर आणि ग्रँट बाल्डविन यांनी प्रयोग करायचे ठरवले. सहा महिने या जोडप्याने असेच अन्न खाण्याची शपथ घेतली जे फेकून द्यायचा जवळ आले असेल किंवा ज्याला मागणी नाही. याची सर्व माहिती त्यांनी जस्ट इट इट: अ फूड वेस्ट स्टोरीमध्ये दाखवली आहे.
त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांना असे अन्न कुठून मिळेल याची माहिती करून घ्यायची होती. ते कोल्ड-टर्की गेले तिथे त्यांनी सांगितले की ते फक्त फेकून द्यायचे अन्नच खाणार आहेत. त्यासाठी पैसेही द्यायची त्यांनी तयारी दाखवली. पण त्यांना तसे कुठलेही अन्न सापडले नाही. कारण तसे पदार्थ विक्रीस ठेवलेच जात नाही. मग त्यांनी कचरापेट्या आणि घाऊक गोदामांच्या मागे शोध घेतला आणि तिथे त्यांना भरपूर प्रमाणात अन्न सापडले. त्यांना १८ फूट मोठ्या कचरापेट्या अन्नाने भरलेल्या आढळल्या. या सर्व पदार्थांची एक्सपायरी डेट जवळ आली होती. त्यांनी ते विकत घेतले आणि घरी आणून ठेवले.
तसेच त्यांना अजून एक गोष्ट आढळून आली. ती म्हणजे बऱ्याच अन्नपदार्थांचे च्या पाकिटावर best before ही तारीख असते. पण याचा अर्थ या तारखेच्या आधी हे ताजे असते. त्यांनतर ते खाऊ नये किंवा सुरक्षित नाही असे समजणे चुकीचे असते. या तारखेमुळे लोक खरोखरच गोंधळतात आणि अन्न फेकून देतात.
त्यांना फेकलेल्या वस्तूमध्ये अनेक अन्नपदार्थ सापडले ज्यामुळे त्यांना धक्का बसला. तांदूळ, गोठलेले मांस, ब्रेड, बरेच डेअरी प्रॉडक्ट्स, तसेच महाग मेपल सिरप अशा बऱ्याच वस्तू त्यांना सापडल्या. एका डब्यात त्यांन $१३,००० किंमतीचे ऑरगॅनिक चॉकलेट बार्सदेखील सापडले आणि ते अजिबात खराब झालेले नव्हते, पण केवळ एक्स्पायरी डेट जवळ आल्याच्या भीतीमुळे फेकले गेले होते. कितीतरी घरात हिरव्या पालेभाज्या वेळेच्या आधी फेकल्या जातात. फक्त चांगली दिसत नाही म्हणून फळे विकत घेतली नाही. पण या फळभाज्यांनाही तितकेच पाणी दिले जाते आणि त्यांचीही तेवढीच काळजी घेतलेली असते, त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य कमी होत नाही.
या दोघांनीही सहा महिने असेच अन्न गोळा केले आणि फ्रीजमध्ये वर्गीकरण करून खाल्ले. फ्रिजच्या तळाशी त्यांनी असेच अन्नपदार्थ ठेवले जे लगेच संपवायचे आहेत. त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले. सहा महिन्यांत त्यांनी किराणा मालावर सुमारे $२०० खर्च केले आणि घरात सुमारे $२०,००० मूल्याचे अन्न साठवलेले होते. त्यांचे शेजारी आणि मित्र त्यांनी काय खरेदी केले आहे हे पाहण्यासाठी अक्षरशः घरी येत. त्यांना खरोखर किती अन्न सापडले याचे वर्गीकरण करता आले नाही, कारण ते अमाप होते.
त्यांना या प्रयोगातून गरीबांना दुखवायचे नव्हते तर खरी माहिती जगासमोर आणायची होती. त्यांचा हा प्रयोग अनेकजणांना अंजन घालणारा ठरेल यात शंका नाही.
जस्ट इट इट: अ फूड वेस्ट स्टोरी ही तुम्ही MX player वर मोफत पाहू शकता. १.१५ तासाच्या या डॉक्युमेंट्री मध्ये तुम्हाला त्यांचे अनुभव पहायला मिळतील.
शीतल दरंदळे




