१४ वर्षे वयात केबीसी मध्ये १ करोड ते आता पोरबंदरचे IPS अधिकारी, डॉ. रवी सैनींची ही गोष्ट तुम्ही वाचायलाच हवी..

कौन बनेगा करोडपती हा अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो. हुशारी दाखवा आणि पैसे कमवा या सोप्या गोष्टीवर आधारित शो गेली २० वर्षं सातत्याने लोकप्रिय आहे. या काळात अनेक लोक शोमध्ये येऊन गेले. त्यातल्या काहींनी शोमध्ये लाखो रुपये कमावले. काहीजण इथून करोडपती होऊन गेले आणि काही वर्षांत पुन्हा जिथल्याच्यातीथे आल्याच्या स्टोऱ्याही आपण वाचल्या आहेत. आजचा भाऊ मात्र अफलातून आहे.

२००१ साली जेव्हा कोन बनेगा करोडपती सुरुवातीच्या काळात सुरू होते. तेव्हा एक लहान मुलगा कौन बनेगा करोडपती ज्युनिअर शोमध्ये आला होता. रवी मोहन सैनी असे त्या १४ वर्षांच्या मुलाचे नाव. त्याच्याआधी येऊन गेलेल्या उमेदवाराने २५ लाख पॉईंट्स मिळवले होते. हा ही एक विक्रम होता. मात्र रवीने हा विक्रम मोडत ५० लाख पॉईंट्स मिळवले. म्हणजे पैशांच्या भाषेत त्याने तब्बल एक कोटी रुपये जिंकले.

जेव्हा ही मुले १८ वर्षांची होतात तेव्हा हे पॉईंटस पैशांमध्ये कन्व्हर्ट होतात. एक कोटी रुपये अवघ्या १४ वर्षं वयात जिंकणे म्हणजे मोठी गोष्ट असते. रवीच्या वडिलांना जेव्हा विचारण्यात आले की या पैशांचे तुम्ही काय करणार त्यावर त्यांनी मुलाला उच्चशिक्षण घेण्यासाठी खर्च करणार म्हणून सांगितले.

आता बाळाचे पाय पाळण्यात दिसले होते. मात्र अनेक मुलं लहानपणी चमकदार कामगिरी करतात, पण मोठे होत असताना त्यांना सूर सापडत नाही. रवीची बातच न्यारी आहे हे हळूहळू सिद्ध होत गेले. शिक्षण पूर्ण करून त्याने मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम दिली. जयपूर येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळाले.

२०१२ साली त्याने मेडिकल इंटर्नशिप सुरू असतानाच यूपीएससीची तयारी सुरू केली. यूपीएससी किती कठीण असते आणि तिथे किती स्पर्धा असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पहिल्या वर्षी तो पूर्वपरीक्षा पास झाला. पण मुख्य परीक्षा काही पास झाला नाही. आता दुसऱ्या प्रयत्नात जोरात अभ्यास करून पास तर झाला, पण मनासारखी पोस्ट मिळाली नाही.

यावेळी त्याला पोस्ट, टेलिकॉम, अकाउंट आणि फायनान्स इथे पोस्ट मिळाली होती. २०१४ साली जोरदार तयारी करत तो पुन्हा परीक्षा देण्यासाठी तयार झाला. आता मात्र मेहनतीस फळ मिळाले. देशभरात ४६१ वा क्रमांक मिळवत त्यांना आयपीएस ही पोस्ट मिळाली. सध्या ते गुजरात येथील पोरबंदरला एसपी म्हणून कारभार बघत आहेत.

रवी सैनी यांना ज्या प्रश्नाने करोडपती बनवले तो प्रश्न खालीलप्रमाणे होता.

१९९२ साली पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा खेळाडू कोण होता?

१) विश्वनाथन आनंद
२) सचिन तेंडुलकर
३) गीत सेठी
४) लियांडर स्पेस

याचे उत्तर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required