computer

केरळ सिरीयल मर्डर : या प्रेमळ दिसणाऱ्या बाईनं १४ वर्षांत एकाच कुटुंबातल्या ६ जणांचा खून केलाय..

केरळमध्ये एका मोठ्या सिरीयल किलिंगचा छडा लागलेला आहे. क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडियाच्या एपिसोडला शोभेल अशीच ही घटना म्हणावी लागेल. मागच्या जवळजवळ १४ वर्षात एकाच कुटुंबात ६ खून झाले आणि कोणाला हे खून असावेत असा संशयही आला नाही. हे खून का झाले? खून करणारी व्यक्ती १४ वर्ष लपून कशी राहिली आणि त्या व्यक्तीने एवढ्या लोकांचा जीव का घेतला हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

केरळच्या कोळीकोडे(Kozikode) जिल्ह्यातली ही घटना आहे. २००२ साली या खून सत्राला सुरुवात झाली. पहिला खून झाला ५७ वर्षांच्या अनम्मा यांचा. त्या निवृत्त शिक्षिका होत्या. २००२ सालच्या ऑगस्टमध्ये जेवणानंतर अचानक त्यांना मृत्यू आला.

दुसरा खून झाला अनम्माचा नवरा टॉम थॉमस यांचा. ते ६६ वर्षांचे होते. २००८ साली त्यांचाही मृत्यू जेवल्यानंतर थोड्यावेळाने झाला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा जीव गेला होता.

तिसऱ्यांदा बळी ठरला या दोघांचा मुलगा रॉय थॉमस. रॉयचा मृत्यूदेखील त्याच्या आईवडिलांसारखाच झाला होता. तो बाथरूममध्ये असतानाच कोसळला. पोस्टमॉर्टेममध्ये त्याच्या शरीरात पोटॅशियम सायनाइड आढळून आलं. यावर रॉयच्या पत्नीने सुचवलं की त्याने कदाचित आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केली असावी. पोलिसांनी ही बाजू गृहित धरून केस तिथेच बंद केली.

पुढचा नंबर होता मथ्यू मांजदियाईल यांचा. हे अनम्माचे बंधू होते. त्यांचा मृत्यू त्यांच्या राहत्या घरी फेब्रुवारी २०१४ साली झाला. असं म्हणतात की मथ्यूने रॉय थॉमसच्या खुनाबद्दल संशय घेतला होता.

मथ्यू यांच्या मृत्युनंतर लगेचच मार्चमध्ये पाचवा बळी गेला. हा बळी होता अवघ्या १ वर्षाच्या मुलीचा. ही टॉम थॉमसच्या भावाची नात होती. काहीतरी खाताना अन्न घशात अडकून गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. 

२०१६ साली या लहानग्या मुलीची आई दातांच्या डॉक्टरकडे गेली होती. तिथं पाणी प्यायल्यावर तिला काहीतरी झालं आणि सिलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या १ वर्षानंतर सिलीच्या नवऱ्याने शाजूने जॉली नावाच्या महिलेशी लग्न केलं. ही जॉली म्हणजे खून झालेल्या रॉयची पत्नी. हिनेच रॉयचा मृत्यू आत्महत्या असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं.

हे सर्व खून नैसर्गिक किंवा आत्महत्या असल्याचा समज सर्व नातेवाईकांना होता, पण जॉली आणि शाजूच्या लग्नानंतर सगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला.

लग्नानंतर जॉलीने घराची संपूर्ण मालमत्ता खोट्या कागदपत्रांच्या जोरावर आपल्या नावे करून घेतली होती. अमेरिकेत राहणाऱ्या अनम्मा आणि टॉम थॉमस यांच्या दुसऱ्या मुलाला या गोष्टीचा पत्ता लागल्यानंतर त्याने मागच्या ६ खुनांवर विचार केला आणि त्यांच्यात काहीतरी साम्य असल्याचा त्याला संशय आला. मुख्य म्हणजे त्याचा संशय जॉलीवर होता. यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क करून तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून वैद्यकीय निरीक्षणे तपासण्यात आली. शिवाय हे ६ मृत्यू झाले त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांची जबानी घेण्यात आली.  साक्षीदारांच्या माहितीवरून हे उघड झालं की या सहाही मृत्यूंच्या वेळी जॉली तिथे उपस्थित होती.

या भक्कम पुराव्यानंतर पोलिसांनी जॉलीला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला. तिच्या सोबत २ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. तिचा मित्र एमएस मथ्यू एका दागिन्यांच्या दुकानात काम होता. खुनासाठी वापरलेले सायनाईड याच दागिन्यांच्या दुकानातून मिळवण्यात आलं होतं. हे सायनाईड विकत घेण्याचं काम प्राजी कुमार करायचा.

१४ वर्ष खून होत राहिले आणि कोणाला पत्ताच लागला नाही. हे कसं शक्य झालं?

जर एखाद्याचा मृत्यू संशयास्पद वाटत असेल आणि त्याबद्दल कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली तरच पोलिसांकडून तपासणी करण्यात येते. या केसमध्ये जे ६ खून झाले त्याबद्दल कोणत्याही कुटुंबियाने संशय घेतला नव्हता. एवढंच काय या प्रेतांचे पोस्टमार्टेमदेखील करण्यात आलं नव्हतं. बरेचदा नातेवाईकांना पोस्टमार्टेम होणं म्हणजे मृतदेहाची विटंबना वाटते. त्यामुळेही डॉक्टरांनी पोस्टमार्टेमचा आग्रह धरला नाही.

सुरुवातीच्या दोन खुनानंतर रॉयचा खून झाला, त्यावेळी मथ्यू मांजदियाईल यांच्या सांगण्यावरून पोस्टमार्टेम करण्यात आलं होतं. त्यातून जे हाती लागलं त्यालाही बगल देण्यात जॉली यशस्वी ठरली. तिने फारच सफाईने ही आत्महत्या असल्याचं सांगितलं. यानंतर पोस्टमार्टेम करायला लावणाऱ्या मथ्यू मांजदियाईल याचाही तिने जीव घेतला.

कायदा काय म्हणतो ?

अशा घटनेत जर कुटुंबाने संशय घेतला तर पंचायतराज कायद्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधीने पोलिसांना खुनाची बातमी द्यायची असते. यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात येते आणि त्यांच्या बरोबरीने पोलिसांनी तपास करायचा असतो. या केसमध्ये कोणालाही संशय आला नाही.

(जॉलीच्या कुटुंबाचं घर)

शिवाय दुसरी महत्वाची बाब अशी की ज्या हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्तीला नेण्यात येतं, त्या हॉस्पिटलवर संशयित मृत्यूची बातमी पोलिसांना कळवण्याची सक्ती नसते. जर नातेवाईक म्हणत असतील की या मृत्यूत संशयास्पद काही नाही, तर हॉस्पिटलकडून मृत्युपत्र देण्यात येते. कायद्यातल्या या पळवाटांचा जॉलीने पुरेपूर फायदा करून घेतला. 

मंडळी, CID मध्ये एसीपी प्रद्युम्न म्हणतात त्याप्रमाणे गुन्हा कधीही लपत नसतो. जॉलीने हे सर्व खून कुटुंबाची मालमत्ता मिळवण्यासाठी केले. पण तिच्या लालसेनेच तिचा घात केला. शेवटी जेव्हा सगळं सुरळीत जात होतं तेव्हाच ती पोलिसांच्या ताब्यात सापडली.

 

आणखी वाचा :

सायनाईड मल्लिका...भारतातली पहिली महिला सिरियल किलर !!

४३ निष्पाप आणि निरागस लेकरांचं हत्याकांड या तिघींनी का केलं? कारण जाणून तुम्हांलाही राग येईल !!

दीड वर्षांत १० खून आणि दरोड्यांनी हादरवून टाकणाऱ्या पुण्याच्या जोशी-अभ्यंकर केसचे भयानक सत्य आणि तपास वाचा या खास लेखात...

सबस्क्राईब करा

* indicates required