घ्या आता.. लाच म्हणून हा अधिकारी मागतोय २०००च्या नव्या नोटा !!

खरंतर शीर्षकात "घ्या आता" म्हणण्यापेक्षा "द्या आता" असंच म्हणायला हवं होतं! इकडे पंतप्रधान मोदींनी देशातला भ्रष्टाचार संपवण्यासाठी आकाश पाताळ एक केलंय पण आपल्यातल्या सरकारी बाबूंची पैसे खाण्याची हाव मात्र काही केल्या जात नाही... 

      देशात ५०० आणि १००० च्या नोटा बंद होऊन ४ दिवसही उलटले नाहीत तर इकडे एका अधिकाऱ्याने लाच म्हणून २००० च्या नोटा मागितल्या आहेत. कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक म्हणजे -शुद्ध मराठीत सिनिअर क्लार्क- पदावर असलेल्या या अधिकार्‍याचं नाव आहे चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर. जाधव नामक एका हायस्कूल शिक्षकाचं मुख्याध्यापक पदावर प्रमोशन करून देण्यासाठी सावर्डेकरांनी ३५,००० रुपयांची लाच मागितली होती आणि तीही २००० च्या नव्या नोटांच्या स्वरूपात. पण काल संध्याकाळी नेमकं लाच घेतानाच लाचप्रतिबंधक विभागाने यांना रंगेहाथ पकडलं आणि सोबत पुरावा म्हणून हे दृश्य कॅमेर्‍यात कैदही केलं...  प्रेस ट्रस्ट इंडियाच्या बातमीनुसार २०००च्या १७ नवीन नोटा या लाचेअंतर्गत दिल्या होत्या. इथे एक एक नोट मिळवताना मारामार होतेय, लाच देणार्‍याने १७ नोटा कुठून मिळवल्या असतील हा प्रश्न लोकांना आता पडला आहे.

नव्या नोटा लाच म्हणून मागणारा कदाचित देशातली ही पहिलीच व्यक्ती असेल. सरकारी नियम आणि कायद्यात कितीही कठोरता आली तरी अजूनही आपल्या मानसिकतेत बदल झालेला नाही, हेच यावरून सिद्ध होतं. देशाला लागलेली भ्रष्टाचाराची ही कीड इतक्या सहजासहजी संपेल असं तुम्हाला तरी वाटतंय का ?

सबस्क्राईब करा

* indicates required