computer

शांततेचं नोबेल मिळवणाऱ्या शांतीदूताची शांती रॅलीमध्येच झाली हत्या!! इस्रायलसाठी या माणसानं काय केलं याचं मोजमाप नाही!!

त्यांना कळत होतं, आपल्याला आपल्या देशात अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. पण कुठेतरी त्यांचा आपल्या माणसांवर विश्वास होता. आपल्या देशातले लोक आपल्याला कधीही दगाफटका करणार नाहीत अशी खात्रीच होती त्यांना. पण तसं झालं नाही. या शांतिदूताची- इस्रायलचे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांची- त्यांच्याच देशात एका शांतता रॅलीदरम्यान हत्या झाली. काय विरोधाभास आहे बघा, शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या राबिन यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं!

राबिन यांचा जन्म जेरुसलेममधला. त्यांनी कृषी विषयातली पदवी संपादन केली ती मुळात शेती करण्यासाठी. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. शेतकरी न होता ते सैनिक बनले आणि पामाक अंडरग्राउंड नावाच्या यहुदी भूमिगत सेनेत सामील झाले. या काळात त्यांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर सैन्याचं नेतृत्व केलं, युद्धकलेत निपुण झाले. १९४८ मधल्या अरब - इस्रायल युद्धात ते सहभागी झाले.
इस्रायलसाठी लढताना त्यांच्यातले अनेक नेतृत्वगुण समोर आले. त्यामुळे त्यांना भराभर पदोन्नती मिळत गेली. जानेवारी १९६४ मध्ये ते लष्करप्रमुख बनले. त्यांनी लष्करात अनेक सुधारणा घडवून आणल्या. परिणामी १९६७ च्या सहा दिवसीय युद्धात इस्रायलला विजय मिळाला.
वरवर पाहता राबिन हे शूर, धाडसी, मुत्सद्दी होते. पण प्रत्यक्षात त्याखाली मात्र एक कमकुवत मनाचा, संवेदनशील माणूस होता. त्यांना तणाव सहन होत नसे. युद्धं, त्यात जाणारे बळी हे त्यांना मानवत नसत. त्यातून अनेकदा त्यांना नर्व्हस ब्रेकडाऊनचा सामना करावा लागे.

१९६८ मध्ये लष्करातील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी इस्रायलचे अमेरिकेतले राजदूत म्हणून काम पाहिलं. यादरम्यान त्यांनी आपल्या देशासाठी अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रं मिळवली. त्यांच्याच कारकिर्दीत अमेरिका इस्रायलला शस्त्रपुरवठा करणारा प्रमुख देश बनला. यानंतर त्यांच्या आयुष्याला अजून एक कलाटणी मिळाली. ते देशाचे पंतप्रधान बनले.

शाचा राज्यकारभार हाती घेतल्यावर त्यांनी नेता म्हणून समाजवादाचा पुरस्कार केला, तरी मनातून मात्र ते जेरुसलेम आणि ज्यू यांमध्येच गुंतलेले होते. पंतप्रधान म्हणून त्यांची पहिली टर्म अल्पायुषी ठरली. एका पत्रकाराने त्यांची आणि त्यांच्या बायकोची वॉशिंग्टनमध्ये एका बँकेत बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप केला आणि त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं.

पुढे ते संरक्षण मंत्री झाले. या काळात पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीसाठी धुमाकूळ घातला होता. अपहरण, हल्ले या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. यात अनेक इस्रायली नागरिक मृत्युमुखी पडले, जखमी झाले. राबिन यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी, पॅलेस्टाईनने कब्जा केलेला भाग परत मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र आपल्या देशबांधवांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी पॅलेस्टाईनच्या बाबतीत बळाचा जोरदार वापर केला. एरवीचे संवेदनशील राबिन हेच का इतका प्रश्न पडण्याइतपत ते कठोर झाले होते. याच काळात त्यांना 'बोन ब्रेकर राबिन' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पुढच्या निवडणुकांमध्ये परत एकदा सत्तापालट होऊन राबिन पंतप्रधान झाले. आता मात्र त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारायचं ठरवलं. त्यांनी पॅलेस्टिनी नेता यासर अराफत याच्याशी चर्चेला सुरुवात केली. दोघांच्यात झालेल्या करारानुसार पॅलेस्टिनी गटांनी इस्रायलचं अस्तित्व सार्वजनिक स्वरूपात मान्य केलं. दुसऱ्या बाजूला गाझा पट्टी आणि वेस्ट बँकेच्या काही भागातून इस्रायलच्या सैन्याला परत बोलावण्याचं आवाहन राबिन यांनी केलं. याला अनेक इस्रायली लोकांचा विरोध होता. एकीकडे हा शांतता करार होत असताना दुसरीकडे मात्र पॅलेस्टिनी आणि ज्यू एकमेकांना भिडत होते. त्यामुळे ज्यूंमध्ये आपल्याला डावलल्याची भावना निर्माण झाली. राबिन यांनी यासर अराफतशी आतून हातमिळवणी केल्याची अनेकांची समजूत झाली. अशाच लोकांपैकी एक होता यीगल अमीर नावाचा माणूस.

अमीरच्या मते राबिन यासर अराफतला म्हणजेच पॅलेस्टाईनला जास्त जमीन देत होते. या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्याने त्यांना मारायचं ठरवलं.
४ नोव्हेंबर १९९५ च्या रात्री तेल अवीव येथे एक पीस रॅली आयोजित केलेली होती. रॅलीसाठी जमलेल्या विराट जनसमुदायासमोर राबिन उभे होते. त्यावेळी सुमारे दहा लाख लोक हजर होते. त्यांच्यासमोर त्यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी देशातील नागरिकांनी भूतकाळाला विसरावं आणि न घाबरता शांततापूर्ण मार्गाने स्वतःला पुढं न्यावं या गोष्टीवर भर दिला. या जनसमुदायात तरुणांची संख्या खूप होती. यावेळी मध्येच एका बुजुर्ग गायकांनी त्यांची ओळख असलेलं शांततेसाठीचं गाणं आळवलं. त्यावेळी तो व्यासपीठावरील राबिन यांनाही गायची विनंती करू लागला. गाण्याचे शब्द लिहिलेला कागद राबिन यांनी समोर धरला आणि वाचून खिशात ठेवून दिला. इतर लोकांबरोबर ते गाऊ लागले.

नंतर व्यासपीठाच्या डाव्या बाजूने पायऱ्या उतरायला लागले आणि त्यांची कार उभी होती त्या दिशेने जाऊ लागले. पण ते ज्या कारकडे जात होते ती कार त्यांची नव्हतीच. तिथे जवळच यीगल अमीर हा पंचवीस वर्षांचा इस्रायली तरुण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक समोर आला. अतिशय शांतपणे त्याने पंतप्रधानांना गोळ्या घातल्या. यानंतर सुमारे अर्ध्या तासाने त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

वास्तविक या रॅलीआधी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याचा सल्ला दिला होता. पण राबिन यांनी त्याला नकार दिला. जर माझ्याच देशात मी बुलेटप्रूफ जॅकेट घालून फिरावं अशी वेळ आली असेल, तर मला या देशाचा पंतप्रधान होण्यात स्वारस्य नाही असं त्यांचं उत्तर होतं. त्यावेळी सुरक्षेसाठी त्यांच्या अंगावर होतं एक जॅकेट, टाय आणि पांढऱ्या रंगाचा कॉटनचा शर्ट.

आजही यित्झॅक राबिन जगाला संपूर्णपणे समजले नाहीत. वरवरचा शिस्तीचा, द्रष्टा, काळाची पावलं ओळखणारा, शांतताप्रिय, राष्ट्राभिमानी नेता खरा की खाजगी आयुष्यातला संवेदनशील मनाचा, भीतीने आणि चिंतेने ग्रासलेला माणूस खरा हे अनेकांना उमजत नाही. जे काय असेल ते असेल, पण इस्रायलसाठी या माणसाने जे केलं त्याचं मोजमाप होऊ शकत नाही.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required