नरभक्षक वाघांना मारता-मारता वाघांच्या प्रेमात पडून संवर्धनासाठी काम करणारे जिम कॉर्बेट!! तुम्हांला त्यांच्याबद्दल काय माहित आहे?

जिम कार्बेट हे नाव समोर आले म्हणजे पहिली गोष्ट आपल्या डोक्यात येते ती म्हणजे जिम कार्बेट नॅशनल पार्क! उत्तराखंडमधल्या या नॅशनल पार्कमध्ये जगभरातले लोक प्राणी प्रजातीतील थक्क करून सोडणारी विशेषता बघण्यासाठी येतात. पण ज्यांच्या नावावरून हे नॅशनल पार्क उभे राहिले आहे, त्यांच्याबद्दल तुम्हांला माहित आहे का?

जेम्स ऍडवर्ट जिम कार्बेट यांनी सुरुवातीच्या काळात अनेक वाघ आणि बिबट्यांची शिकार केली. वाघांची शिकार करता करता मात्र हा माणूस प्राणीप्रेमी कधी झाला हे समजले देखील नाही. इतके की आज त्यांच्या नावाने इतके मोठे नॅशनल पार्क तयार झाले आहे. साहजिक त्यांचा हा प्रवास रंजक असला पाहिजे.

जिम कार्बेट यांचा जन्म २५ जुलै १८७५चा. ते नैनीतालमध्ये जन्मले. नावावरुन आणि जन्माच्या कालखंडावरुन लोकांना ते इंग्लिश गृहस्थ वाटतात, पण खरेतर त्यांचे मूळ हे आयरिश होते. त्यांचे लहानपण तसे जंगलात फिरण्यातच गेले. नैनिताल येथील फिलांडर स्मिथ कॉलेजमधून शिक्षण घेऊन ते १९ वर्षांच्या वयात रेल्वेत नोकरीला लागले. पुढे त्यांना ब्रिटिश इंडियन आर्मीत कर्नलची रँक मिळाली होती.

कुमाऊ, नैनिताल आणि पूर्ण गढवाल परिसर या भागातील जंगले त्यांनी फिरून काढली होती. जंगल हे त्यांचे प्रेम होते. ते इतके जंगलाशी एकरूप होते की जंगलात आवाजावरून हा कोणता प्राणी किंवा पक्षी आहे हे ओळखू शकत होते. जंगल शिकार हा त्यांचा अजून एक शौक!! शिकारीच्या आवडीने त्यांनी कित्येक लोकांचे जीव देखील वाचवले.

त्याकाळी काही वाघांनी लोकवस्तीत येऊन लोकांना खाण्याचे प्रमाण खूप जास्त होते. अशा घटना सर्रास होत असत. पूर्ण गढवाल परिसरात वाघांच्या या दहशतीमुळे तिथे लोकांना फिरण्याचीही भीती वाटत असे. काही वाघांनी ४००-५००च्यावर लोकांना खाल्ले होते. यावेळी ब्रिटिश शासनाला जिम कॉर्बेट यांची मदत झाली.

त्यांनी या वाघाची शिकार करून लोकांना दिलासा मिळवून दिला. एक वाघ तब्बल ४३६ लोकांचे जीव घेऊन बसला होता. तर दुसऱ्या एका वाघाने जवळपास १२०० लोक मारले होते, त्या नरभक्षक वाघालाही त्यांनी मारले. अधिकृतपणे त्यांनी १२ वाघ मारले असे सांगितले जाते, पण खरा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता सांगितली जाते.

वाघांना मारता मारता मात्र त्यांना या वाघांवर प्रेम झाले. वाघांची संख्या कमी होत आहे आणि त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी वाघांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यासाठी संरक्षित क्षेत्र निर्माण करावे अशी सूचना केली. त्याआधी त्यांचे मोलाचे काम ओळखून ब्रिटिशांनी त्यांना कैसर-ए-हिंद हा सन्मान दिला होता.

जिम कार्बेट यांनी फोटोग्राफी आणि लेखन यातही जबरदस्त योगदान दिले आहे. त्यांची पुस्तके ही जंगल प्रेमींसाठीच नाही, तर सर्वांसाठीच पर्वणी असतात. कार्बेट आपल्या निवृत्तीनंतर केनिया या देशात आपल्या बहिणीसोबत स्थायिक झाले. तिथे जाऊन त्यांनी आपले लेखनकार्य सुरू ठेवले होते. लिखाणातून ते सतत घटणाऱ्या प्राण्यांची संख्या आणि पर्यावरणाची हानी याबद्दल जगाला सावध करत होते. कार्बेट यांनी आपले ६ वे पुस्तक ट्री टॉप्स संपवले आणि काहीच दिवसात त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी लिहिलेले मॅन इटर्स ऑफ कुमाऊ हे पुस्तक जागतिक स्तरावर सर्वाधिक गाजलेल्या पुस्तकांपैकी एक समजले जाते, या पुस्तकाचे २७ भाषेत अनुवाद झाले आहेत.

कार्बेट यांनी आपल्या या जंगल प्रेमासाठी लग्न देखील केले नव्हते. आयुष्यभर त्यांनी स्वत:ला आपल्या आगळ्यावेगळ्या आवडीसाठी झोकून दिले होते. १९५५ साली त्यांचे निधन झाल्यावर १९५७ साली नॅशनल पार्कला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

 

सबस्क्राईब करा

* indicates required