computer

इतिहासाला कलाटणी देणाऱ्या हत्या: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचा खून म्हणजे बळीचा बकरा बनवण्यातला प्रकार होता!!

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हाचे व्हॉईसरॉय म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन आपल्याला माहिती आहेत. प्रिन्स चार्ल्स याचे ते घनिष्ठ मित्र. रॉयल नेव्हीमध्ये ते अधिकारी होते. हिंदुस्थानची भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली फाळणी त्यांच्याच काळात घडली.

लॉर्ड माऊंटबॅटन भारताचे व्हॉईसरॉय असताना त्यांना राजा सहावा जॉर्ज याचे भारतातले प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले होते. राजाच्या वतीने कारभार करण्याचा त्यांना अधिकार दिलेला होता. वास्तविक माऊंटबॅटन स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला फारसे उत्सुक नव्हते. भारताचं स्वातंत्र्य त्यावेळी दृष्टिपथात आलं होतं आणि इंग्रजांकडून भारतीयांकडे सत्तेचं हस्तांतरण माऊंटबॅटन यांच्या देखरेखीखाली होणार होतं. पण हे स्वातंत्र्यही सुखासुखी पदरात पडलं नाही. त्याला फाळणीचं आणि त्यातून उद्भवलेल्या हिंदू-मुसलमान दंग्यांचं ग्रहण लागलं. त्याआधीपासूनच हिंदू आणि मुसलमान यांच्यातला तणाव वाढायला लागला होता. त्यामुळे माऊंटबॅटन यांनी देशाचं विभाजन १९४८ ऐवजी १९४७ मध्ये करण्याचं ठरवलं. पण तरी जे व्हायचं ते झालंच. फाळणीमुळे लक्षावधी लोक जिवाला मुकले, तितक्याच निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. भारत सोडताना फाळणीची कटू घटना ब्रिटिशांच्या खात्यात जमा झाली.

माऊंटबॅटन यांचे ग्रह नंतरही फिरलेलेच राहिले.

१९७९ मध्ये २७ ऑगस्ट या दिवशी त्यांचा खून झाला. त्यांचं आयर्लंडमध्ये स्लिगो कौंटी इथे हॉलिडे होम होतं. तिथे ते कुटुंबियांसह सुट्टीसाठी म्हणून गेले होते. त्या दिवशी ते लॉबस्टर फिशिंगसाठी बोटीने निघाले होते. त्यांचे काही नातलगही त्यांच्याबरोबर होते. त्यावेळी बोटीत अगोदरच ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यात त्यांच्या पायाला इजा होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. शिवाय स्फोटामुळे ते पाण्यात पडले. पाण्यातून त्यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. पण त्यानंतर काही वेळातच ते गेले. बीबीसीच्या अहवालानुसार त्यांच्या बोटीवर सुरक्षिततेचे कोणतेही उपाय योजलेले नव्हते.

हा हल्ला झाला त्यावेळी आयर्लंडच्या उत्तर भागात तणावाचं वातावरण होतं. तिथे युनियनिस्ट्स आणि रिपब्लिकन यांच्यात संघर्ष सुरू होता. नॉर्दर्न आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा भाग असावा की रिपब्लिक ऑफ आयर्लंडचा, या मुद्द्यावर वाद सुरू होते. त्यामुळे ब्रिटिश पलटणी आणि आयरिश रिपब्लिकन आर्मी यांच्यात लढाई सुरू झाली. त्यामध्ये ब्रिटन आणि नॉर्दर्न आयर्लंड यावर बॉम्बहल्ले झाले. हा संघर्ष तब्बल तीस वर्षं सुरू राहिला.

माऊंटबॅटनवरच्या हल्ल्याची जबाबदारी आयरिश रिपब्लिकन आर्मीने स्वीकारली. त्यांनी एक निवेदन जारी केलं. त्यात म्हटलं होतं, आमच्या देशाचा ब्रिटिशांनी वर्षानुवर्षं ताबा घेतल्याच्या कृतीकडे ब्रिटिशांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा बॉम्बहल्ला घडवून आणला आहे. त्यांचं हे कृत्य म्हणजे ब्रिटिश फौजांनी आयरिश लोकांच्या केलेल्या हत्याकांडाचा बदला होता. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या व्यतिरिक्त आयरिश रिपब्लिकन आर्मीने त्याच दिवशी १८ ब्रिटिश सैनिकांनाही ठार मारलं.

आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य टॉमी मॅकमान याला माऊंटबॅटनच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पुढे ऑगस्ट १९९८ मध्ये त्याची सुटका झाली.

लॉर्ड माऊंटबॅटन यांचं वैयक्तिक आयुष्य तसं चांगलंच 'रंगीन' होतं. प्रिन्स ऑफ वेल्स याचे ते मार्गदर्शक होते. प्रिन्स चार्ल्सला त्यांनी लग्न करून संसाराला सुरुवात करण्यापूर्वी जरा 'मौजमजा करण्याचा' सल्ला दिला होता असं म्हणतात. अगदी कॅमिला या आपल्या प्रेयसीशी असलेले संबंधही प्रिन्स चार्ल्सने माऊंटबॅटनच्या सल्ल्यावरून तोडले होते. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी स्वतः लग्न केलं खरं, पण ते बरंच गुंतागुंतीचं ठरलं. त्याचं कारण त्यांचे बऱ्याच स्त्रियांशी असलेले संबंध! पण असं असून आणि अनेकदा घटस्फोटाचा विचार येऊनही त्यांनी प्रत्यक्षात मात्र घटस्फोट घेतला नाही. उलट त्यांचा संसार सुरू राहिला. दोन मुलीही झाल्या त्यांना. त्यांची एक मुलगी अद्याप हयात आहे.

आपल्या वडिलांना बळीचा बकरा बनवून आयरिश रिपब्लिकन आर्मीने नेमकं काय साधलं हे उत्तर मात्र तिला आजतागायत मिळालेलं नाही.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required