computer

१०७ वर्षांनंतर सापडले आहे अंटार्क्टिकाजवळ बुडालेले त्यावेळचे सर्वात मजबूत मानलेले लाकडी जहाज!! याची पूर्ण गोष्ट तर जाणून घ्या!!

एखादी वस्तू समुद्रात अनेक वर्षानंतर सापडली की ती गोष्ट फार कुतूहलाचा भाग होते. म्हणजे टायटॅनिक बुडाले आणि त्याचे अवशेष हळूहळू सापडत गेले. त्यानंतर त्या मागचा इतिहास, त्यावेळी काय घडले असेल याचा शोध सुरू होतो. असेच एक बुडालेले जहाज तब्बल एक शतकानंतर सापडले आहे! अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर १०७ वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडले आहेत.

विशेष म्हणजे या जहाजाचे अवशेष चांगल्या स्थितीत आहेत. जहाजाचं नाव आहे एचएमएस एन्ड्युरन्स. हे जहाज ध्रुवीय संशोधक अर्नेस्ट शॅकलटनचे यांचे होते. १९१५ साली हे जहाज अंटार्क्टिक समुद्रात बुडाले होते.

या एचएमएस एन्ड्युरन्स जहाजाचा इतिहासही रंजक आहे. त्याचं मूळ नाव पोलारिस. ते नॉर्वेतल्या फ्रॅमनेस शिपयार्ड येथे बांधले गेले आणि १९१२ मध्ये नॉर्वेमधील सॅन्डेफजॉर्ड येथे लॉन्च केले गेले. शॅकलटनने हे जहाज जानेवारी १९१४ मध्ये मोहिमेसाठी विकत घेतले होते. त्याचं आयुष्य अधिक नव्हतं. एक वर्षातच एचएमएस एन्ड्युरन्स नोव्हेंबर १९१५ मध्ये बर्फात अडकले आणि शेवटी अंटार्क्टिकाजवळील समुद्रात बुडाले. पण त्यात असणारे सगळे प्रवासी वाचले.

ते जहाज जरी बुडाले तरी ते अतिशय मजबूत होते आणि त्याची रचना ध्रुवीय परिस्थितीसाठी केली गेली होती. त्यात वापरलेले लाकूड हे ओकचे होते. प्रत्येक लाकूड त्याच्या आकारासाठी निवडलेल्या एका ओकच्या झाडापासून बनवले गेले होते जेणेकरून त्याचा नैसर्गिक आकार जहाजाच्या रचनेच्या वक्रप्रमाणे असेल. असे म्हणतात, १९१२ मध्ये एन्ड्युरन्स हे आतापर्यंत बांधलेले सर्वात मजबूत लाकडी जहाज होते.

आता पाहूया हे जहाज नेमके बुडाले कसे!!
अर्नेस्ट शॅकलटन हे एक ब्रिटिश संशोधक होते. १९०७ आणि १९२२ दरम्यान अंटार्क्टिकमध्ये तीन ब्रिटिश मोहिमांचे नेतृत्व केल्यानंतर शॅकलटन यांचे नाव बरेच लोकप्रिय झाले होते. ते बराच काळ दक्षिण ध्रुवाचा शोध घेत होते. त्यांनी या भागात एकूण चार शोधमोहीम राबवल्या होत्या. हे एन्ड्युरन्स त्यांच्या एका मोहिमेचाच भाग होते. नाव होते - इंपीरियल ट्रान्स-अंटार्क्टिक मोहीम!! एन्ड्युरन्स बरेच मोठे होते. त्याची लांबी ९,८४२ फूट इतकी होती. या जहाजावर शॅकलटनसह २८ लोक होते. एन्ड्युरन्स १९१४ मध्ये ब्रिटनमधून निघाले आणि एका वर्षानंतर अंटार्क्टिकामधील मॅकमर्डो साउंडला पोहोचले. पण अत्यंत वाईट हवामानामुळे हे जहाज समुद्रात कडक बर्फात अडकले आणि बुडाले.

र्घटनेनंतर शॅकलटन एन्ड्युरन्सवरून पायउतार झाले आणि उत्तरेकडे बर्फाच्या पृष्ठभागावर पोहोचले. तिथेही वातावरण अतिशय विपरीत होते. ते जवळजवळ १० महिने त्या बर्फाळ भागात अडकले होते. हळूहळू ही टीम निर्जन एलिफंट बेटावर पोहोचली आणि या तिथून सर्वांची सुटका करण्यात आली. मोहीम अयशस्वी झाली, परंतु शॅकलटनच्या अनुभवी नेतृत्वामुळे सर्व टीम सुरक्षित आणि जिवंत होती. त्यामुळे या घटनेकडे एक मोठा विजय म्हणून पाहिले गेले व शॅकलटनचे खूप कौतुक झाले. या अपघातानंतर शॅकलटन आणि सहप्रवासी वाचले. पण त्यानंतर सातच वर्षांनी म्हणजे १९२२ मध्ये एका मोहिमेतच शॅकलटनचा मृत्यू झाला. तो तेव्हा दक्षिण जॉर्जिया बेटावर होता आणि तेथेच त्याला दफन करण्यात आले. तो वारला तेव्हा त्याचे वय फक्त ४७ वर्षे होते.

१९१४-१९१७ ची इंपीरियल ट्रान्स-अंटार्क्टिक मोहीम ही अंटार्क्टिकातील शेवटची मोठी मोहीम मानली गेली. सर अर्नेस्ट शॅकलटन यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मोहीम अंटार्क्टिक खंडाचा पहिला भूप्रदेश पार करण्याचा प्रयत्न होता.

आता इतक्या वर्षानंतर फॉकलँड्स मेरीटाईम हेरिटेज ट्रस्ट आणि हिस्ट्री हिट या टीमने या बुडालेल्या जहाजाचे अवशेष शोधले आहेत. ५ मार्च २०२२ रोजी एन्ड्युरन्सचे अवशेष सापडले. या अवशेषरुपी जहाजाची लांबीही ९,८६९ फूट आहे आणि ते १०७ वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहे. मिशनचे एक्सप्लोरेशन डायरेक्टर मॅनसन बाऊंड यांनी सांगितले की, "अशाप्रकारे लाकडी जहाजाची झालेली मोडतोड त्यांनी कधीच पाहिली नव्हती. पण हे जहाज संवर्धन करता येण्यासारखे आहे. त्यामुळे या जहाजाचा शोध ध्रुवीय इतिहासातील हा एक मैलाचा दगड मानला जात आहे."

१०७ वर्ष असे जहाज बुडणे आणि त्याचे अवशेष चांगल्या अवस्थेत सापडणे हा चमत्कारच मानला पाहिजे. यातून कदाचित आणखी काही महत्वाच्या बाबी, किंवा रहस्येही उलगडली जातील. पुढे काय घडते हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required