computer

देश, भाषा, वय या पलीकडे जाऊन ५० वर्षांनंतर एकत्र येऊ घातलेल्या प्रेमजीवांची कथा वाचायलाच हवी!

पाहिलं प्रेम कधीही विसरलं जात नाही म्हणे. तुम्हीही हे वाक्य अनेक ठिकाणी वाचलं असेल, अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल, पण तुम्ही कधी कुणाच्या जीवनात पाहिलं प्रेम तब्बल ५० वर्षांनी परत आल्याचं पाहिलं आहे का? तुम्ही म्हणाल काही तरीच काय अशा गोष्टी फक्त पिक्चर मध्येच होतात.

अशी न पटणारी गोष्ट घडली आहे राजस्थान मधील एका ८२ वर्षाच्या वृद्धाच्या बाबतीत. राजस्थानच्या थार जिल्ह्यातील कुलधरा गाव हे झपाटलेले असल्याचे मानले जाते. याच अंधश्रद्धेमुळे आज या गावात फक्त एक व्यक्ती सोडल्यास कुणीच वास्तव्य करत नाही. ८२ वर्षाचा हा म्हतारा मानवी वस्तीची चाहूल नसलेल्या या गावाची राखण करतो. या म्हाताऱ्याचे अखंड आयुष्य याच गावात गेले तेही एकट्याने. त्याने अलीकडेच आपली गोष्ट सांगितली, जी सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

कधी काळी तो बाहेरून आलेल्या पर्यटकांना उंटावर बसवून वाळवंटाची सफर करून आणत असे. त्याचे कामच होते ते. तो ३० वर्षाचा असताना एक ऑस्ट्रेलियन महिला राजस्थानच्या या वाळवंटातील उंट सफरीचा आनंद घेण्यासाठी आली होती. मरीना तिचे नाव. मरीनाला या माणसाने पाच दिवस राजस्थान फिरवून दाखवला. हा काळ होता १९७० चा. जेव्हा ‘लव अॅट फस्ट साईट’वर लोकांचा विश्वास होता. मरीना अगदी पहिल्याच नजरेत या वाळवंटातील माणसाच्या प्रेमात पडली होती आणि हाही तिच्यावर फिदा झाला होता. तिने त्याला ऑस्ट्रेलियाला येण्याची गळ घातली, पण तो काहीच बोलला नाही. याच्या मौनातला अर्थ तिने समजून ती निघून गेली.  

‘लव अॅट फस्ट साईट’वाल्या या प्रेमाचं पुढे काय झालं? तेच झालं जे हिर-रांझा, लैला-मजनू आणि रोमिओ ज्युलीएटचं झालं. दोघांचीही मातृभूमी हजारो मैल दूर असल्यानं त्यांनाही एकमेकांपासून दूर जावं लागलं. मरीना ऑस्ट्रेलियाला गेली तरी, ती याच्या संपर्कात राहिली. दोघेही एकमेकांना पत्रे लिहित असत. तेही आठवड्यातून दोन वेळा.

एकवेळ मरीना म्हणाली तू मला भेटायला ऑस्ट्रेलियाला ये. मग या मजनूने ३०,०००चे कर्ज काढून ऑस्ट्रेलियाला जायची तयारी केली आणि घराच्यांना कसलीही कल्पना न देता हा मजनू आपल्या प्रेमाच्या ओढीने ऑस्ट्रेलियाला पोहोचला देखील. मरीना सोबत ऑस्ट्रेलियात त्याचे दिवस खूपच छान जात होते. मरिनाने त्याला इंग्रजी बोलायला शिकवले. यानेही तिला राजस्थानी घुमर शिकवला. मरीना म्हणाली आता एवढे चांगले आपले जमतेच आहे तर एकमेकांसोबतच राहू. तिने त्याच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण ती ऑस्ट्रेलिया सोडून भारतात येण्यास तयार नव्हती आणि हा भारत सोडून ऑस्ट्रेलियात स्थाईक तयार नव्हता. दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांचा निरोप घेतला. यानंतर दोघांनीही एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही.

तो भारतात परत आल्यानंतर घरच्यांनी त्याचे लग्न लावून दिले. मरीना येण्याची काहीच शक्यता नव्हती त्यामुळे यानेही घरातील सांगतील त्या मुलीशी लग्न केले. संसाराचा गाडा हाकण्याच्या नादात याला पहिल्या प्रेमाचा थोडा विसर पडणे साहजिकच होते. दोन मुले झाली. तीही आता मोठी झाली आहेत. दोनच वर्षांपूर्वी याची पत्नीही वारली. मुले त्याच्या संसारात रमली आणि पत्नीच्या निधनानंतर एकटा पडलेला हा आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत गुंग होऊन जात असे. खरेतर त्याला अजिबात वाटत नव्हते की आता या वळणावर, म्हातारपणात मरीना त्याच्याकडे परत येईल म्हणून.

आयुष्यात कधी कधी अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला अत्यंत सुखद धक्का बसतो. त्याचेही तसेच झाले. अचानक एकेदिवशी त्याला मरीनाचे पत्र आले. तिने लिहिले होते, की ती आता भारतात येऊ इच्छिते. तिने अजूनही लग्न केले नाही. आता उर्वरित आयुष्य तिला या आपल्या पहिल्या प्रेमासोबत काढायचे आहे. इतक्या वर्षानंतर मरिनाने त्याला शोधून काढले आणि ती चक्क भारतात येणार आहे या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना.

तो म्हणतो, “मारीनाचे हे पत्र पाहून मला तर आभाळच ठेंगणं वाटू लागलंय. ती इथे येणार आहे कायमची यावर अजूनही विश्वास बसत नाही. शेवटी तिने मला शोधून काढलेच.”

आता ते दोघेही पुन्हा एकदा संपर्कात आले आहेत. दररोज एकमेकांची विचारपूस करतात. पहिले प्रेम अचानक परत मिळाल्यानं त्याला तर पुन्हा एकदा तरूण झाल्यासारखंच वाटत आहे.

आयुष्य नेहमीच फटकारे देत नाही तर कधीकधी असा सुखाचा धक्काही देतं. अचानक इतक्या वर्षानंतर आपल्या प्रिय व्यक्तीच्या संदेश येणं आणि तोही इतका सकारात्मक हे ऐकून त्याला किती आनंद झाला असेल कल्पना करा.

सबस्क्राईब करा

* indicates required