एका हत्तीणीच्या मृत्यूने आपण हळहळत आहोत, पण या प्राण्यांच्या मृत्यूमागची खरी कारणं तर जाणून घेऊयात?

अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या गरोदर हत्तीणीचा स्फोटकांनी भरलेला अननस खाऊन मृत्यू झाल्याची बातमी आपण सर्वांनीच वाचली किंवा ऐकली असेल. वृत्तवाहिन्यांवर ही बातमी अनेकदा दाखवली गेली आहे. सोशल मिडीयावर दर दुसरी बातमी ही हत्तीणीबद्दल दिसत आहे. उद्या किंवा फार तर परवापर्यंत या बातमीतला जोर गेलेला असेल. लवकरच नवीन विषय येईल आणि जुना विषय मागे पडेल. तसेही एवढे दिवस कोरोनाशिवाय विषय नसलेल्या वृत्तवाहिन्यांना परवा ‘निसर्ग’ हा नवीन विषय मिळाल्यानंतर कोरोनाची बातमी कुठच्याकुठे पळून गेली होती. असो..
तर, त्या दुर्दैवी हत्तीणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा माणूस आणि प्राणी यांच्यातला संघर्ष उघड झाला आहे. या गोष्टीकडे फारसं कोणाचं लक्ष जाताना दिसत नाहीय. हत्तीणीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करत असताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करून मूळ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून तुमच्यासमोर हे मुद्दे देत आहोत..
१. जंगलतोडीमुळे वनविभाग कमी झाली आहेत आणि त्यामुळे प्राण्यांना अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत यावं लागतं.
सरकारी आकडेवारीनुसार २०१४ ते २०१९ या वर्षांमध्ये हत्तींच्या हल्ल्यांमुळे २,३६१ लोकांचा जीव गेला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार केरळ राज्यात २०१७-१८ या वर्षात माणूस आणि प्राण्यांमध्ये ७,२२९ चकमकी झाल्या होत्या. कर्नाटक-केरळ भागात वाघांच्या हल्ल्यांमध्ये २०१६-१८ या वर्षात ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं आढळलं होतं.
जंगलतोड, वन्य भागात रस्ते बांधणी, उत्खनन, धरण बांधणी, अतिक्रमण इत्यादी गोष्टींमुळे प्राणी मानवी वस्तीकडे वळतात. आसाम, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या भागांमधले बिबट्यांचे हल्ले, केरळमधील हत्तींचा उच्छाद, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड भागात अस्वलांचा हल्ला हे कमी होत जाणाऱ्या जंगलांचाच परिणाम आहेत.
केरळमध्ये हत्तींसाठी राखीव असलेले ४ कॉरीडोर्स आहेत. या कॉरीडोर्समध्ये मानवी वस्ती मोठ्याप्रमाणात आहे, शिवाय या भागात शेती केली जाते. शेती असल्याने शेतीचं संरक्षण आलंच. त्यासाठी काय काय केलं जातं हे पुढच्या मुद्द्यात आपण बघूया.
२. केरळ आणि कर्नाटकात वन्य प्राण्यांना दूर ठेवण्याची पद्धत.
(तोंडात स्फोट झाल्याने मृत्युमुखी पडलेलं अस्वल)
-या पद्धतीत वन्य भागाला कुंपण घालणे, शेतीला कुंपण घालणे, विजेच्या तारा लावणे, मोठा आवाज करणारे फटाके वापरणे इत्यादी या पद्धती येतात.
-कुंपण ओलांडून प्राणी आलेच तर शेतकरी आपल्या जवळ स्फोटकांनी भरलेली फळे तयार ठेवतात. या फळातील स्फोटकांचा तोंडातच स्फोट झाल्याने प्राण्याचा जागीच मृत्यू होतो.
दरवेळी अशाप्रकारेच सापळा रचला जातो असे नाही. उदाहरणार्थ केरळमध्ये माकडांना पळवण्यासाठी फटाके उडवले जातात. फळांच्या आत स्फोटके ठेवण्याची कल्पना नंतर शोधण्यात आल्याचं दिसतं.
(तोंडात स्फोट झाल्याने हत्तीचा मृत्यू, ओडीसा)
-तिसरा मार्ग म्हणजे विजेच्या तारा लावणे. हा प्रकार अत्यंत घातक आहे. विजेच्या तारा लावण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे, पण तो सर्रास चालतो. बंदीपूर आणि नगराहोले राष्ट्रीय उद्यानातल्या अनेक हत्तींचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
(विजेच्या झटक्याने हरणांचा मृत्यू, आदिलाबाद-तेलंगणा)
३. रानडुक्कर मारण्यासाठी स्फोटकांचा वापर
कर्नाटकच्या वन्य भागात किंवा अभयारण्यांच्या जवळपास असलेल्या गावांमध्ये रानडुक्कर मारण्यासाठी स्फोटकं आणि जिलेटीनचा वापर करून एक खास बॉम्ब तयार केला जातो. आमिष म्हणून जनावरांची आतडी किंवा इतर मांसल भाग या बॉम्बभोवती लपेटला जातो. रानडुक्करे मांसाच्या वासाने आकर्षित होतात. जेव्हा ते मांस खाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा स्फोट होतो.
गर्भवती हत्तीणीचा मृत्यू कसा झाला असेल?
त्या दुर्दैवी हत्तीणीवर ज्या कारणांनी ही वेळ ओढवली त्या प्रश्नांची उत्तरे वरील तीन मुद्द्यांमध्ये आढळतात.
तिसऱ्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे तो अननस कदाचित रानडुक्करासाठी ठेवलेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अननस वापरण्या मागचं कारण त्याचा उग्र वास असं म्हणता येईल. या घटनेत दुर्दैवाने हत्तीण बळी पडली आहे. पण या पूर्वी झालेल्या घटनांमध्ये रानडुक्करांऐवजी बिबटे किंवा कोल्हे बळी पडलेले आढळलं आहे. मागच्याच महिन्यात एका हत्तीणीचा याच प्रकारे मृत्यू झाला होता. तोंड गंभीररीत्या भाजल्यामुळे काही तासांतच तिचा जीव गेला.
दुसऱ्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे हत्तीणीला इजा पोहोचवण्यासाठी मुद्दाम अननस भरवण्यात आलं नसावं. वन्य प्राण्यांना पळवण्यासाठी ते फळ तिथे ठेवण्यात आलं असावं. दुर्दैवाने हत्तीणीने ते खाल्ल्याने तिचा जीव गेला असू शकेल.
या दाव्याला आधार म्हणून आयएफएस आणि मुख्य वन संरक्षक सुरेंद्रकुमार यांचं म्हणणं इथे देत आहोत. ते म्हणतात की "कोणीतरी हत्तीला अननस खाऊ घालण्याची कल्पना शक्य वाटत नाही. स्फोटक भरलेलं फळ हत्तीणीने चुकून खाल्लं असण्याची शक्यता आहे."
सुरेंद्रकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचा मृत्यू अननस खाल्ल्याने झाला की गुळात भरलेल्या स्फोटकांमुळे झाला याचा अजून तपास घेतला जात आहे. हा स्फोट कसा झाला याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. या घटनेला आणखी एक कारण आहे. ते असं की कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे माणसं घरात अडकलेली असल्याने प्राणी मुक्तपणे फिरत आहेत. अशात त्यांचं अन्नासाठी मानवी वस्तीकडे येणं स्वाभाविक म्हणता येईल. ज्या ठिकाणी हे घडलं त्या मन्नारकड भागात हत्तींचा नेहमीच वावर असतो. शेतीला थोडंफार नुकसान पोचावण्यापलीकडे त्यांच्यामुळे माणसांना त्रास होत नाही.
लेखाच्या सुरुवातीलाच विचारात घेतलेला पहिला मुद्दा हा या सर्व प्रकरणाला पूर्णपणे कारणीभूत असल्याचं ठामपणे म्हणता येईल. जंगलतोड आणि भरमसाठ लोकसंख्येमुळे माणूस आणि वन्य प्राण्यांमधला संघर्ष चिघळला आहे. वेळोवेळी हा चिघळलेला संघर्ष दिसून येतो. मग तो पश्चिम बंगालमधल्या पेटत्या अंगाने पाळणाऱ्या हत्तींपासून ते आरेमध्ये लोकवस्तीत शिरलेल्या बिबट्यापर्यंत किंवा आसाम-बंगालमध्ये रेल्वे रुळावर मेलेल्या हत्तीपर्यंत थांबत नाही, तर जोडीदाराच्या शोधात १३०० किलोमीटरचा प्रवास करणारा वाघही याच संघर्षाचा भाग आहे.
वन्य जीवांचं जतन आणि संवर्धन करायचं असल्यास आपल्याला आधी जंगलतोड थांबवावी लागणार हे उघडच आहे. पण आधी आहे त्या जंगलांचं संरक्षण व्हायला हवं. प्राण्यांचा हल्ला झालाच तर परिस्थिती हाताळण्याच्या पद्धती बदलायला हव्यात. या गोष्टींचा विचार केला तरी वाढणारी लोकसंख्या, वाढणाऱ्या गरजा, प्रदूषण, पर्यावरणाची हानी आणि जंगलतोड या समस्यांचा गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर असणार आहे.