computer

गुगल आणि फेसबुकला तब्बल ८४४ कोटींचा चुना लावणारा ठग....कसा केला त्याने हा घोटाळा.

मंडळी, फेसबुक आणि गुगल सारख्या बड्या आणि मातब्बर कंपन्यांना पण कोणीतरी चुना लावू शकतो हे नुकतंच समोर आलं आहे. एव्हाल्डास रिमासौस्कास या व्यक्तीने या दोन्ही कंपन्यांना खोटे बिल पाठवले होते. आश्चर्य म्हणजे या कंपन्यांनी कोणतीही शहनिशा न करता बिल भरलेत. हे पैसे होते तब्बल १२२ मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल ८४४ कोटी राव. 

या महाभागाने दोन्ही कंपन्यांना चुना लावला तरी कसा ? चला जाणून घेऊया !!

एव्हाल्डास रिमासौस्कास हा व्यक्ती लाटव्हियाचा आहे. त्याने Quanta Computer Inc. नावाची हार्डवेअर विकणारी खोटी कंपनी उघडली होती. त्याने असं दाखवलं की त्याच्या कंपनीने फेसबुक आणि गुगलला हार्डवेअर विकलं आहे. या व्यवहारासाठी त्याने दोन्ही कंपन्यांना बिल पाठवलं. सहसा एवढ्या मोठ्या रकमेसाठी तपासणी केली जाते पण फेसबुक आणि गुगल गाफील राहिले. अशा प्रकारे एव्हाल्डासने २०१२ ते २०१५ वर्षात गुगल कडून २३ मिलियन डॉलर्स तर फेसबुक कडून ९९ मिलियन डॉलर्स वसूल केले आहेत.

एव्हाल्डासने आपली कंपनी खरी असल्याचं भासवण्यासाठी दरवेळी खोटी कागदपत्र सादर केली होती. मिळणारी रक्कम वेगवेगळ्या बँकेत जमा व्हायची. हे चौर्यकर्म त्याने एकट्याने केलेलं नाही तर त्यात आणखी लोक सामील होते. 

ते क्राईम पेट्रोलवाले म्हणतात ना “जुर्म छुपता नही” त्या प्रमाणे शेवटी एव्हाल्डास पण पकडला गेलाच. नुकतंच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याला ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फेसबुकने आपलं नुकसान भरून काढलं आहे, पण गुगलकडून कोणतीच बातमी मिळालेली नाही.

मंडळी, या बातमीने फेसबुक आणि गुगल सुद्धा माती खाऊ शकतात हे नव्याने समजलंय. ८४४ कोटीचा चुना लावणारा बहाद्दरच म्हणायचा...नाय का ??

सबस्क्राईब करा

* indicates required