computer

तीन वेळा फाशी प्रयत्न करुनही या माणसाला फाशी देता आली नाही. मग तो नॅशनल हिरोच झाला. काय गोष्ट आहे ही?

एखादा मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन येतो तेव्हा 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय येतो. अगदी थोडक्यात एखाद्या दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांबद्दल हेच म्हटले जात असते. पण असेही काही किस्से असतात, जिथून वाचण्याची शक्यता शून्य असते. तरीही हे लोक वाचतात. अशावेळी देव तारी त्याला कोण मारी ही म्हण थोडी अधिक प्रत्ययकारी ठरते. जॉन ली या माणसाची गोष्ट पण काहीशी अशीच आहे.

जॉन ली नावाचा हा माणूस १८६४ साली इंग्लंडमध्ये जन्मला. तो वयात आला तसा एमा केसे या महिलेच्या घरात नोकर म्हणून काम करू लागला. एके दिवशी या ली ला केसे यांनी चोरी करताना पकडले आणि त्याला तुरुंगात धाडले. परत त्यांनीच त्याला सोडवून आणले आणि कामावर घेतले.

नंतर काही वर्षं अशीच गेली. ली चे आयुष्य नोकरी करून व्यवस्थित चालले होते. एके दिवशी केसे यांनी आपली काही संपत्ती विकण्याचे ठरवले. आपली नोकरी जाईल या भीतीने ली ने थेट आपल्या मालकीणबाईलाच मारहाण केली. मग या बाईने संतापात त्याचा पगार कमी केला. या पगारकपातीने लीच्या आयुष्यात मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या.

ली चे तेव्हा लग्न ठरले होते, पण पगार कमी झाल्याने त्याचे लग्न मोडले. १८८४ साली मात्र अचानक केसे यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळून आला. गळा कापलेला आणि अर्ध्या जळलेल्या अशा अवस्थेत त्या सापडल्या. साहजिक पहिली शंका गेली ती ली याच्यावर. कारण त्या काळात तोच घरात होता आणि त्याच्या हाताला जखम झालेलीही पोलिसांना दिसली.

आता कोर्टात मात्र हा ली भाऊ आपल्याला काही पर्वाच नाही अशा अविर्भावात फिरत असे. जजसाहेबांनी मग त्याला दोषी मानत फाशी सुनावली. ली ला फाशी देण्याचा दिवस ठरला २३ फेब्रुवारी १८८५. सर्व तयारी पूर्ण झाली होती. ली च्या गळ्यात 'फासी का फंदा' टाकण्यात आला. पण ऐनवेळी जो खटका ओढून फाशी दिली जाते तोच चालला नाही.

वास्तविक फाशी देण्यापूर्वी खटका तपासला होता. आता फाशी देताना तो चालला नाही तेव्हा ली ला खाली उतरवले आणि खटका पुन्हा तपासला तर तो चांगला चालत होता. मग ली ला पुन्हा फाशीच्या ठिकाणी उभे करण्यात आले आणि आश्चर्य म्हणजे खटका पुन्हा चालला नाही. त्याला खाली उतरवून चेक केले तर तो चालत होता. त्याला आता परत वरती चढवले आणि या खटक्याने परत झटका दिला. तो काही चालला नाही.

असे तीन वेळा झाल्यावर मात्र पोलिसांनी पण हट्ट सोडला. नंतर त्याला फाशी देऊ असे म्हणून त्याला परत तुरुंगात आणले. लोकांमध्ये मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली. ली निर्दोष असल्याकारणाने खुद्द देवानेच त्याला वाचवले असावे असे सर्वजण बोलू लागले. ली ची शिक्षा आता जन्मठेपेत बदलण्यात आली.

लोक चक्क रस्त्यावर उतरून ली ला सोडण्याची मागणी करू लागले. शेवटी ली विरुद्ध पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी मात्र त्याची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली. तब्बल २२ वर्षं तुरुंगात काढून तो १९०७ साली तुरुंगातून बाहेर आला. आता मात्र तो सामान्य नोकर राहिला नव्हता. त्याला एखाद्या सेलेब्रिटीचे स्टेटस आले होते.

बाहेर येऊन त्याने आपल्या पहिल्याच बायकोसोबत लग्न केले. त्याला दोन मुले झाली. भावाने लगोलग आत्मचरित्रही लिहून टाकले. ते सुद्धा बेस्टसेलर ठरले. देशभर तो वक्ता म्हणून भाषणे देत फिरू लागला. त्याच्या आयुष्यावर १९१२ साली एक सिनेमाही आला होता.

ली इतका नशिबवान म्हटला पाहिजे की तो फक्त मरताना वाचला नाही,तर चक्क एका नोकराचा नॅशनल हिरो झाला. कुणाचे नशीब केव्हा भरारी घेईल हे सांगता येत नाही हेच खरे...

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required