आपल्या लहानपणीच्या खेळण्यांमध्ये काडेपट्यांचा आवर्जून समावेश असायचा मंडळी. या रिकाम्या काडेपेट्या गोळा करणं, साठवणं, आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या कलाकृती बनवणं, या सार्या गोष्टी आपण आपल्या बालपणातच ठेवून मोठे झालो. पण काडेपेट्यांचं हेच वेड जर मोठेपणीही कोणीतरी बाळगायला लागलं तर? कदाचित तुम्हाला हे करणं थोडं विचित्र वाटेल, पण एक तरूणी आहे जिनं या काडेपेट्यांनाच आपली पॅशन म्हणून निवडलंय !!
श्रेया कटूरी नावाच्या या तरूणीनं देशभरातल्या, नव्हे नव्हे तर देशविदेशातल्या काडेपेट्यांचा ढिगभर संग्रह केलाय. पण हा फक्त संग्रह नाहीये. या काडेपेट्यांवर असणार्या वेगवेगळ्या लेबल्सना ती अतिशय कल्पक आणि वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने आपल्यासमोर मांडते. तिचं 'artonabox' हे इन्टाग्राम अकाउंट तिच्या या सुंदर कलाकारीनेच सजलेलं आहे. इतकंच काय, तिनं पत्रकारीतेमध्ये ग्रॅज्युएशन करतानाही या काडेपेट्यांच्या लेबल्सवरच शोधनिबंध सादर केलाय! या वेगवेगळ्या लेबल्सचा ती कसा वापर करते हे तुम्ही इथं पाहू शकता...