computer

प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!

प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!

२८ नोव्हेंबरच्या त्या रात्री फ्रँक ओस्लोनने आत्महत्या केल्यावर पुढची अनेक वर्षं फ्रँक ओस्लोन सगळ्यांच्याच विस्मरणात गेला. सीआयएसाठी काम करणारी अनेक माणसं अशीच विस्मृतीत जातात. फ्रॅंक ओस्लोन सीआयएच्या पटावरचं एक प्यादं होतं. काही प्यादी नको तो चौकोन अडवून बसतात म्हणून तर काही केवळ उपयोग संपला म्हणून पटाबाहेर फेकली जातात. शेवटी पटावर राज्य असतं वजीराचं! राजा तर केवळ मानधारी असतो. मग सीआयएत वजीर कोण हा एकच प्रश्न फक्त विचारा.  त्यातूनच या प्रकरणाची एकेक कडी उलगडत जाणार आहे. त्या काळी सीआयएचा वजीर होता अ‍ॅलन डलेस!!

पूर्वसूत्र :

अमेरिकेची देशाबाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना म्हणजे सीआयए. त्यांनी त्यांचं काम करताना आजवर बरीच अमानुष कामंही केली. त्यातली ही आमची कथामालिका म्हणजे सीआयएच्या अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे. या कथेत अनेक खलनायक आहेत. त्यांच्या कथा आपण एकानंतर एक आपण वाचणार आहोत 'बोभाटा'च्या प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या मालिकेतून! ही मालिका बर्‍याच भागात आम्ही सादर करणार आहोत,  कारण ही कथा तशीच गुंतागुंतीची आहे.

हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेसचे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. एखाद्याच्या मेंदूचा किंवा मनाचा ताबा घेऊन त्याला आपले गुन्हे कबूल कसे करायला भाग पाडेल अशी औषधं आणि कार्यपद्धती शोधणं हे प्रोजेक्ट एम के अल्ट्राचं काम होतं. १९५३ मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली तरी तो खरा चालू झाला ते १९७३मध्ये. बेकायदेशीर असल्याने अमेरिकेने या प्रोजेक्टची माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरी अगदी २०१८पर्यंत त्याबद्दल काही माहिती उजेडात येत गेली.  पण अशा प्रकारचा हा जगातला पहिला प्रयोग नव्हता. बोभाटा हा प्रयोगाची मंजुरी, त्याचे दुष्परिणाम, अमेरिकेने हे सगळं कसं लपवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कोण सामील होते, त्यांच्या भूमिका काय होत्या हे सर्व आपल्यासमोर या मालिकेद्वारे आणत आहे.

१० एप्रिल १९५३. स्थळ : प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी.

(प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी)

अ‍ॅलन डलेस, सीआयएचे नवे प्रमुख युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थ्यांसमोर भाषण देत होते. पण त्यांच्या मनात तेव्हा सोव्हिएट रशियाच्या ब्रेन वॉरफेर(BRAIN WARFARE) म्हणजे मानवी मनाचा ताबा घेण्याच्या प्रयोगाबद्दलची भिती बोलून दाखवण्याचे प्रयत्न जाणूनबुजून चालू होते.  ते सांगत होते, "गेली काही वर्षं आपण लोकांच्या मनातल्या वैचारिक द्वंदाबद्दल ऐकतोच आहोत.  आपल्याला खरंतर या समस्येची तीव्रता अजूनही पुरेशी कळली नाही. कारण सोव्हीएट रशियाच्या या प्रयोगाबद्दलच्या कल्पना किती भयानक आहेत ते अजून कळलेलं नाही." 

अ‍ॅलन डलेसना मात्र या प्रयोगांची व्याप्ती माहिती असावी किंवा त्याच्या मनातला भयगंड हे बोलत होता हे कळायला काही मार्ग नव्हताच. पण ब्रेन वॉर फेअर या विषयावर ते पुढे म्हणाले, "सोव्हिएट रशियाचे हे मनोविकृत प्रयोग आणि त्याचे परिणाम कोरियाच्या युध्दातून परत येणार्‍या सैनिकांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत आहेत. परत येणारे सैनिक रशियाच्या कम्युनिस्ट विचारधारेवर पोपटपंची केल्यासारखे बोलत आहेत. काय वापरलं असेल त्यांच्यावर? संमोहनाचे अस्त्र? रसायनं? दुसरं काहीतरी? ते कळायला मार्ग नाही. पण असे प्रयोग कोणत्याही देशाच्या नागरिकांवर करणे अमेरिकेच्या मानवी मूल्यांच्या संकल्पनेत बसत नाही,".  भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, "पाश्चिमात्य देशात अजूनही आम्ही ब्रेन वॉर फेअरबद्दल अनभिज्ञ आहोत". 

"पाश्चिमात्य देशात अजूनही आम्ही ब्रेन वॉर फेअरबद्दल अनभिज्ञ आहोत". 

हे वाक्य तद्दन खोटं होतं. त्या भाषणानंतर तीन दिवसांतच या अ‍ॅलन डलेसनी प्रोजेक्ट एमके अल्ट्रा सुरु करण्यासाठी मान्यता दिली. हे म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली यातलाच प्रकार झाला. पण असो. तसाही सीआयएचा हा काही पहिला प्रयोग नव्हता. असे अनेक विचित्र प्रयोग त्यांनी आधीही केले होते. पण प्रोजेक्ट एमके अल्ट्रा म्हणजे अमानुष-पाशवी म्हणावा असा होता. अ‍ॅलन डलेस सारखा धूर्त- कावेबाज माणूसच हे करू शकत होता. त्याच्या सोबत काम करत होती त्याच्या सारखीच अमानवी वृतीची अनेक माणसं जी फक्त परवानगीची वाट बघत होती.

एकदा परवानगी मिळाल्यावर प्रोजेक्ट एमके अल्ट्रा जोरात सुरु झाला. इलेक्ट्रिक शॉक, विषारी रसायनं, संमोहन, पॉलिग्राफ, ड्रग्ज ॲडिक्शन सगळे प्रयोग धडाक्यात सुरु झाले. प्रोजेक्ट फंडींगला काही कमतरता नव्हती.  प्रयोग करायचे कोणावर हे पण निश्चित झाले होते. गोडीगुलाबीने जे स्वयंसेवक म्हणून येतील ते, ज्यांच्यावर बळजबरीने प्रयोग करता येतील ते, तुरुंगातले कैदी, मेंदूची वाढ खुंटलेली लहान मुलं, लैंगिक विकृतीने पछाडलेली माणसं..  थोडक्यात, विरोधाची शक्यता जेथे कमी आहे अशा सगळ्यांनाच या प्रयोगातले गिनीपिग बनवण्यात आले.  

या सगळ्या प्रयोगांचे अंतिम उद्दिष्ट एकच होते. माणसाच्या मनाचा ताबा घ्यायचा आणि त्याला एखाद्या सर्कशीतल्या प्राण्यासारखे आदेशावर नाचायला शिकवायचे.

पण..  ही कथा पुढे वाचण्यापूर्वी अ‍ॅलन डलेस ही काय चीज होती ते पण जाणून घेऊ या!

राजनैतिक शिष्टाचार, राजकारण, नोकरशाही या सगळ्यांचं बाळकडू मिळालेला अ‍ॅलन डलेस अमेरिकेच्या 'न्यू लूक' पॉलीसीचा एक भाग होता. न्यू लूक पॉलीसी मुख्यत्वेकरून रशिया आणि अमेरिकेच्या शीतयुध्दाच्या व्यूहनीतीचा भाग होता. अ‍ॅलन डलेस यानी पदभार स्विकारल्यावर सीआयएच्या नोकरशहांना न्यायालयाने समन्स बजावू नये अशी व्यवस्था केली. त्यानंतर तो त्याची गणितं मांडायला मोकळा झाला. 

सीआयएच्या अग्रस्थानी सतत आठ वर्षं बसणारा आणि अप्रत्यक्षपणे अमेरिकेची धोरणं ठरवणारा अ‍ॅलन डलेस हुशार असणारच होता. पण जोडीला पाताळयंत्री कारस्थानं रचून ती नैतिक-अनैतिकतेच्या चाळणीतून बाहेर ठेवून वेळीच नामानिराळा होऊन खांदे झटकण्याचे कौशल्य त्याच्याकडे जन्मजातच होते. याच अ‍ॅलन डलेसने(आणि काही जणांनी) अमेरिकेतल्या मोठमोठ्या औद्योगिक समूहांच्या फायद्यासाठी राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडींच्या हत्येचा कट रचला होता असेही म्हटले जाते. पण त्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येच्या चौकशी समितीचाच सदस्य म्हणून खुर्ची पटकावणारा अ‍ॅलन डलेस किती मोठा गेमर होता हे आता तुम्हालाही कळलेच असेल. पण या चौकशी आयोगात त्याने स्वतःच्या बचावासाठी काही केले का? तर नाही. पण चौकशी समितीचा कोणताही सदस्य सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही इतकी खबरदारी त्याने घेतली.

(जॉन. एफ. केनेडी आणि अ‍ॅलन डलेस)

इंग्रजी भाषेत एकशब्द आहे 'नॉन स्क्रपलस' -म्हणजे खर्‍या खोट्याची, भल्याबुर्‍याची चाड नसलेला ! या वर्णनात अ‍ॅलन डलेस फिट्ट बसतो. पण अ‍ॅलन डलेस हा तसा एकटाच नव्हता. त्याच्यासारखे अनेकजण त्याच्यामागे उभे होते. येणार्‍या दिवसांत त्याच पाठीराख्यांना वापर करून त्याने अनेक छुप्या कारवाया पार पाडल्या. या कारवायांची यादी बनवायची झाली तर ते स्वतंत्र प्रकरणच होईल. म्हणून काही मोजक्या कारवाया बोभाटाच्या वाचकांना आम्ही उदाहरणादाखल सांगतो.. 

१. ऑपरेश अ‍ॅजॅक्स -

१९५३ साली इराणचे सरकार रशियाच्या बाजूने झुकण्याची शक्यता अमेरिकेला वाटली. म्हणून लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या मोहम्मद मोसादेगची सत्ता ब्रिटिशांच्या मदतीने सीआयएने उलथवून लावली. मोहम्मद मोसादेगच्या जागेवर मोहम्मद रझा पेहलवी (इराणचा शहा) या कठसूत्री बाहुल्याला आणून बसवले. कल्पना ग्रेट ब्रिटनची आणि कारवाई सीआयएची!

२. ऑपरेशन पीबीसक्सेस -

१९५४ साली ग्वाटेमालाच्या देशातील सत्ता उलथवण्यात आली.

३. बे ऑफ पिग्ज -

शीतयुध्दाच्या ऐन धामधुमीच्या काळात क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोविरुध्द केलेल्या कारवाया. या कारवाया सरतेशेवटी फसल्या आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय राजकारणात तोंडावर पडली.

इथेच जॉन. एफ. केनेडी आणि अ‍ॅलन डलेस यांच्यात वादाच्या ठिणग्या उडाल्या. परिणामी २८ नोव्हेंबर १९६१ साली अ‍ॅलन डलेसचा नॅशनल सिक्युरिटी मेडल देऊन सन्मान करण्यात आला आणि दुसर्‍या दिवशी त्याचा राजीनामा घेण्यात आला. पण त्यानंतरही पडद्यामागून त्याची सत्ता चालतच राहिली. कारण आलेल्या नव्या राष्ट्राध्यक्षाला त्याची गरज होतीच.

तर बोभाटा वाचकहो, सीआयएच्या पटावरच्या वजीराची ओळख तुम्हाला पटली असेलच. पण तुम्हाला हॅरी पॉटरच्या सिनेमातला प्रोफेसर स्नेपचा डायलॉग आठवतो का?
काळ्या जादू बर्‍याच, विविध, निरंतर बदलणार्‍या आणि शाश्वत आहेत. त्यांच्याशी लढाई करणे हे राक्षसाच्या एका डोक्याशी झुंज देण्यासारखे आहे. जे (डोके) प्रत्येक वेळी तोडले जाते आणि नव्याने उगवणारे डोके पूर्वीपेक्षा अधिक कणखर आणि हुशार होते."

ज्या सीआयएबद्दल आपण वाचतोय तीही हुबेहूब अशीच आहे. आपण तर फक्त रावणाला दशानन म्हणून ओळखतो. पण सीआयएची किती तोंडं आहेत याची काही गणतीच नाही. त्यापैकी एक म्हणजे अ‍ॅलन डलेस!

या कहाणीच्या पहिल्या भागात कहाणीची सुरुवात वाचली. या दुसर्‍या भागात सूत्रधाराची ओळख पण झाली. तिसर्‍या भागात आता तुमची ओळख होणार आहे पटावरच्या इतर पात्रांशी. यात पहिलं नाव आहे-  काळ्याविद्येचा जादूगार 'सिडनी गॉटलीब' याचं!

क्रमशः

 

प्रोजेक्ट MK Ultra-३: काळ्या विद्येचा जादूगार सिडनी गॉटलीबने केले लोकांवर अमानुष रासायनिक प्रयोग!!

सबस्क्राईब करा

* indicates required