computer

प्रोजेक्ट MK Ultra-३: काळ्या विद्येचा जादूगार सिडनी गॉटलीबने केले लोकांवर अमानुष रासायनिक प्रयोग!!

प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!

प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!

त्या काळात अमेरिकन सरकार भयगंडाने पछाडलेले होते. जगातले दोन साम्यवादी देश रशिया आणि चीन आपल्याला वरचढ होणार या कल्पनेने सरकार अस्वस्थ झालेले होते. त्यांना जळीस्थळीकाष्ठीपाषाणी कम्युनिस्ट दिसायला लागले होते. मॅकार्थीझमने अमेरीकेला झपाटले होते. जोसेफ मॅकार्थी या सिनेटरच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या या चळवळीने जनतेला भारावून टाकले होते. कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून नागरीकांना कामावरून काढून टाकणे, खोटे आरोप लावून तुरुंगात डांबणे, ब्लॅकलिस्ट करणे असे बरेच काही घडत होते.

सीआयएच्या उच्च पातळीवर पण रशियन गुप्तहेर पोहचले आहेत असाही संशय बर्‍याच जणांना होता. यात किती सत्यता होती ते पुढे खूप वर्षांनंतर उघडकीस आले. पण या संशय आणि भीतीच्या वातावरणाचा पूर्ण फायदा अ‍ॅलन डलेस आणि त्याच्यासोबत काम करणार्‍या भुताळीला मिळाला. या भुताळीत सामील असलेला एक महासंमंध असं ज्याला म्हणता येईल अशी व्यक्ती म्हणजे सिडनी गॉटलीब!!

पूर्वसूत्र :

अमेरिकेची देशाबाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना म्हणजे सीआयए. त्यांनी त्यांचं काम करताना आजवर बरीच अमानुष कामंही केली. त्यातली ही आमची कथामालिका म्हणजे सीआयएच्या अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे. या कथेत अनेक खलनायक आहेत. त्यांच्या कथा आपण एकानंतर एक आपण वाचणार आहोत 'बोभाटा'च्या प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या मालिकेतून! ही मालिका बर्‍याच भागात आम्ही सादर करणार आहोत,  कारण ही कथा तशीच गुंतागुंतीची आहे.

हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेसचे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. एखाद्याच्या मेंदूचा किंवा मनाचा ताबा घेऊन त्याला आपले गुन्हे कबूल कसे करायला भाग पाडेल अशी औषधं आणि कार्यपद्धती शोधणं हे प्रोजेक्ट एम के अल्ट्राचं काम होतं. १९५३ मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली तरी तो खरा चालू झाला ते १९७३मध्ये. बेकायदेशीर असल्याने अमेरिकेने या प्रोजेक्टची माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरी अगदी २०१८पर्यंत त्याबद्दल काही माहिती उजेडात येत गेली. पण अशा प्रकारचा हा जगातला पहिला प्रयोग नव्हता. बोभाटा हा प्रयोगाची मंजुरी, त्याचे दुष्परिणाम, अमेरिकेने हे सगळं कसं लपवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कोण सामील होते, त्यांच्या भूमिका काय होत्या हे सर्व आपल्यासमोर या मालिकेद्वारे आणत आहे.

(सिडनी गॉटलीब)

ब्लॅक सॉर्ससर म्हणजे काळी विद्या अवगत असलेला जादूगार. याच नावाने सिडनी गॉटलीब सीआयएमध्ये ओळखला जायचा. तो एमके अल्ट्रा प्रोजेक्टचा प्रमुख होता. जन्माने हंगेरीयन ज्यू असलेल्या गॉटलीबचं शिक्षण अमेरिकेच्या अनेक नामांकित विद्यापीठांतून झालं होतं. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यावर वयाच्या ३३ व्या वर्षी तो सीआयएत नोकरीवर रुजू झाला. त्याची इच्छा अमेरिकन सैन्यात जाण्याची होती. पण त्याची पावले जन्मतःच वाकडी म्हणजे क्लब फूट असल्याने ते शक्य झालं नाही. पण सीआयएमध्ये काम करण्यासाठी त्याचं व्यंग आड येत नव्हतं. 

(सिडनी गॉटलीबने सही केलेलं प्रोजेक्ट एमके अल्ट्राचं परवानगी पत्र)

वेगवेगळ्या रसायनांचा वापर करत मानवी मनावर ताबा मिळवून त्या जागी आपल्याला हवं तसं मन स्थापित करणं हे प्रोजेक्ट एमके अल्ट्राचे एकमेव अंतिम उद्दिष्ट होतं. असे प्रयोग अमेरिकेत निश्चितच नवे नव्हते. दुसर्‍या महायुध्दाच्या दरम्यानच असे काही करता येईल असे अनेक अमेरिकन शास्त्रज्ञांना वाटत होतं. प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या सगळ्या प्रयोगांचा कळस होता. या प्रयोगाची व्याप्ती अनेक वर्षांची होती. खर्चासाठी कोणतीही आडकाठी नव्हती. डोक्यावर वरिष्ठांची सत्ता नव्हती. अशी पूर्णपणे अनिर्बंध सत्ता सिडनी गॉटलीबच्या हातात आली होती.

या प्रोजेक्ट एमके अल्ट्रामधून मानवी मनावर ताबा मिळवणारी रसायनं शोधता शोधता सीआयएच्या शास्त्रज्ञांना LSD चा पत्ता लागला. आता हे LSD म्हणजे नक्की काय आणि ते माणसाच्या मेंदूवर कसं काम करतं हे आपण नंतर विस्ताराने बघणारच आहोत. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर LSD म्हणजे लिसर्जिक अ‍ॅसिड डायएथेलामाइड!! हे LSD माणसाच्या मनावर खोलवर परिणाम करतं. जे नसतं ते दिसायला लागतं. कधी ते खूप छान छान अनुभव देतं, तर कधी ते भयाण अनुभवही देतं. या नशेच्या अंमलाखाली जे अनुभव येतात त्याला 'ट्रिप' म्हणतात. चांगले अनुभव म्हणजे गुड ट्रिप आणि भयानक अनुभव म्हणजे बॅड ट्रिप. आजची ट्रिप गुड असेल की बॅड हे LSD चं सेवन करताना कधीच कळत नाही. 

LSD च्या भुतानं काहीच दिवसांत सीआयएच्या शास्त्रज्ञांना पछाडलं आणि अमेरिकेने त्यावेळी जगात उपलब्ध असलेला LSD चा सगळा साठा २४०००० डॉलर्स देऊन विकत घेतला. हा निर्णय घेणारी व्यक्ती होती सिडनी गॉटलीब! यानंतर एकूण १४९ वेगवेगळे सब-प्रोजेक्ट तयार करून हजारो अजाण नागरीकांवर LSD चे प्रयोग सुरु करण्यात आले. या प्रयोगात  काहीजण मेले तर शेकडो माणसं कायमची वेडी झाली. केंच्यूकी राज्यात तर एका माणसाला सलग १७४ दिवस LSD देण्यात आले. LSD सोबत इतर काही रसायनं वापरता येतात का याच्या चाचण्या पण करण्यात आल्या.

हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेचसे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. सीआयएमध्ये गॉटलीबला जाब विचारणारं कोणीच नव्हतं. त्याचा बॉस रिचर्ड हेल्म्स, सीआयए प्रमुख अ‍ॅलन डलेस यांनीही गॉटलीब काय करतो आहे याकडे कधीच लक्ष दिले नाही. कुठल्याच बॉसचा आणि नियमांचा धरबंध नसलेल्या सिडनी गॉटलीबच्या कारवायांना एमके अल्ट्रा प्रोजेक्टमुळे ऊत आला.

त्याचं वर्णन मोजक्या शब्दात करायचं तर ते असं होतं-

This guy [Sidney Gottlieb] had a license to kill. He was allowed to requisition human subjects across the United States and around the world and subject them to any kind of abuse that he wanted, even up to the level of it being fatal — yet nobody looked over his shoulder.

सिडनी गॉटलीबच्या नजरेत हे प्रयोग ज्यांचावर केले गेले ती माणसं नव्हती, ते फक्त 'सबजेक्ट' होते. सिडनी गॉटलीबच्या अधिक ओळखीदाखल त्याच्या वेडसर अमानुषपणाची चुणूक असलेली एकदोन उदाहरणे पाहूयात. 

(फिडेल कॅस्ट्रो)

अमेरिका आणि क्युबाचे वैर तर जगजाहिर आहे. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या हत्येचे अनेक प्रयत्न झाले. एकाच माणसाच्या हत्येच्या प्रयत्नांची यादी करायची झाली तर फिडेल कॅस्ट्रोचे नाव गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्येच जायला हवे. गॉटलीबने कॅस्ट्रोच्या स्टुडिओमध्ये एलएसडीची फवारणी केली होती. कॅस्ट्रोच्या कपड्यांवर, सिगारमध्ये, पेनामध्ये विषप्रयोग करून बघितले होते. काँगोच्या अध्यक्षांना-लुमुंबांना- मारण्यासाठी त्यानी त्यांच्या टूथब्रशवर विष फवारण्याची शक्कल लढवली होती. थोडक्यात, सिडनी गॉटलीब स्वतःच एक विषारी माणूस होता. 

तर वाचकहो, पहिल्या भागात फ्रँक ओस्लेनच्या आत्महत्येपासून ही रहस्य कथा सुरु झाली. दुसर्‍या भागात  सूत्रधार अ‍ॅलन डलेसला आपण भेटलो. तिसर्‍या भागात ब्लॅक सॉर्ससर सिडनी गॉटलीबची ओळख झाली. येत्या चौथ्या भागात अमेरीकेच्या संपूर्ण नव्या पिढीला व्यसनाच्या दरीत ढकलणार्‍या LSD बद्दल वाचणे आवश्यक आहे !

सबस्क्राईब करा

* indicates required