computer

प्रोजेक्ट MK Ultra - ५ : ऑपरेशन मिडनाइट क्लायमॅक्स, अमानुष प्रयोग आणि प्रयोगांचे बळी!!

प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!

प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!

प्रोजेक्ट MK Ultra-३: काळ्या विद्येचा जादूगार सिडनी गॉटलीबने केले लोकांवर अमानुष रासायनिक प्रयोग!!

प्रोजेक्ट MK Ultra - ४ : जाणून घ्या MK-Ultraने जगाला कसे व्यसनाच्या दरीत लोटले!

आतापर्यंतच्या भागात सिडनी गॉटलीब, एलएसडी म्हणजे काळी जादू आणि तिचा जादूगार यांची फक्त ओळख करून घेतली. आजच्या प्रकरणात आपण वाचणार आहोत 'ऑपरेशन मिडनाइट क्लायमॅक्स' आणि इतर गलिच्छ प्रयोगांबद्दल. हातात हवा तितका एलएसडीचा साठा पडल्यावर सिडनी गॉटलीबने तब्बल १५०हून अधिक सब-प्रोजेक्टच्या माध्यमातून अजाणत्या लोकांवर जाणूनबुजून LSDचे प्रयोग सुरु केले. या आधी सांगितल्याप्रमाणे तुरुंगातील कैदी, सीआयएचे कर्मचारी, मतीमंद मुलं आणि देशाबाहेरच्या 'सेफ हाऊस' मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे हे उद्योग केले जायचे.

पूर्वसूत्र :

अमेरिकेची देशाबाहेर काम करणारी गुप्तहेर संघटना म्हणजे सीआयए. त्यांनी त्यांचं काम करताना आजवर बरीच अमानुष कामंही केली. त्यातली ही आमची कथामालिका म्हणजे सीआयएच्या अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे. या कथेत अनेक खलनायक आहेत. त्यांच्या कथा आपण एकानंतर एक आपण वाचणार आहोत 'बोभाटा'च्या प्रोजेक्ट एमके अल्ट्रा या मालिकेतून! ही मालिका बर्‍याच भागात आम्ही सादर करणार आहोत,  कारण ही कथा तशीच गुंतागुंतीची आहे.

हा सीआयएचा एमके अल्ट्रा प्रोजेक्ट माणुसकीच्या नजरेतून पाह्यला तर अमानुष होता. या प्रोजेक्टद्वारे लोकांवर बरेसचे बेकायदेशीर असे प्रयोग केले गेले. एखाद्याच्या मेंदूचा किंवा मनाचा ताबा घेऊन त्याला आपले गुन्हे कबूल कसे करायला भाग पाडेल अशी औषधं आणि कार्यपद्धती शोधणं हे प्रोजेक्ट एम के अल्ट्राचं काम होतं. १९५३ मध्ये या प्रोजेक्टला मंजुरी मिळाली तरी तो खरा चालू झाला ते १९७३मध्ये. बेकायदेशीर असल्याने अमेरिकेने या प्रोजेक्टची माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरी अगदी २०१८पर्यंत त्याबद्दल काही माहिती उजेडात येत गेली. पण अशा प्रकारचा हा जगातला पहिला प्रयोग नव्हता. बोभाटा हा प्रयोगाची मंजुरी, त्याचे दुष्परिणाम, अमेरिकेने हे सगळं कसं लपवायचा प्रयत्न केला, त्यामध्ये कोण सामील होते, त्यांच्या भूमिका काय होत्या हे सर्व आपल्यासमोर या मालिकेद्वारे आणत आहे.

(प्रातिनिधिक फोटो)

तुम्ही रॉ, सीआयए वगैरेंवर आधारित मालिका पाहात असाल, तर सेफहाऊस म्हणजे काय प्रकार असतो हे तुम्हांला माहित असेलच. सेफ हाऊस म्हणजे गुप्तहेरांच्या सुरक्षिततेसाठी, छुप्या कारवायांसाठी, कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन करण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी जागा. अधिकृत सरकारी जागांच्या यादीत या आश्रयस्थानांचा नाव-पत्ता कधीच नोंदला जात नाही हे उघडच आहे. सेफ हाऊस फक्त गुप्तहेर संस्थाच वापरतात असे नाही. तर पोलीस आणि संघटित गुन्हेगारी टोळ्या पण अशी छुपी आश्रयस्थानं बनवून ठेवत असतात. तुम्ही शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला हा चित्रपट पाहिला असेल, तर अंधेरीतल्या फ्लॅटमध्ये सर्व शूटर्स लपलेले असतात, ते त्यांचं सेफ हाऊस होतं.

'ऑपरेशन मिडनाइट क्लायमॅक्स' अशाच एका सेफ हाऊसमध्ये केले गेले होते. सुरुवातीला न्यूयॉकमध्ये आणि नंतर सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये अशी सेफ हाऊस बनवण्यात आली. हा स्वतंत्र सबप्रोजेक्ट असल्याने त्याचे नेतृत्व जॉर्ज व्हाइटकडे देण्यात आले. कोण होता जॉर्ज व्हाइट?

(जॉर्ज व्हाइट)

जॉर्ज व्हाइट सीआयएत नोकरी करत नव्हता. तो एफबीआयचा अधिकारी-कर्मचारी होता. आता लक्षात घ्या की सीआयए आणि एफबीआय दोन्ही सरकारी यंत्रणा असल्या तरी त्यांच्या कार्यकक्षा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. एफबीआय देशांतर्गत घडाणार्‍या गुन्ह्यांवर लक्ष देत असते, तर सीआयए देशाबाहेर हेरगिरी करत असते. पण जॉर्ज व्हाइट अंमली पदार्थांचा एक्सपर्ट समजला जायचा. या कारणामुळे सीआयएने त्याला कन्सलटंट म्हणून कामावर रुजू करून घेतले होते. अमेरिकेत बर्‍याच वेळा घडते की एखादा कर्मचारी अनधिकृतरित्या दोघांसाठीही काम करत असतो. पण जॉर्ज व्हाइटच्या बाबतीत असे नव्हते. एफबीआयला जॉर्ज व्हाइट सीआयएसाठी काम करतो आहे हे काम करतो आहे याची जाणीव होती.

याचा पुरावा खाली दिलेल्या चित्रात दिसतो आहे. या मेमोत असं म्हटलंय, "श्रीमान हूवर (एफबीआय प्रमुख), विश्वसनीय सूत्रांकडून असे समजते आहे की ब्यूरो ऑफ नार्कोटीक्स या एफबीआयच्या विभागात काम करणारा जॉर्ज व्हाइट आता सीआयएसोबत काम करतो आहे. त्याने आणि सीआयएने ८१/ ब्रेडफोर्ड स्ट्रीटवर एक जुळा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. एका फ्लॅटमध्ये मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि दुसर्‍या फ्लॅटच्या एक्स रे मिररमधून त्या मनोरंजनाचे चित्रीकरण करण्यात येते."

हा मेमो आहे १९५३ सालचा. त्यानंतर असाच एक फ्लॅट सॅनफ्रॅन्सिस्कोत पण बनवण्यात आला. या फ्लॅटचा पत्ता २२५, चेस्टनट स्ट्रीट असा होता. बर्कली इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांकडून या फ्लॅटमध्ये बगींग मायक्रोफोन बसवण्यात आले होते. एका फ्लॅटचे इंटिरियर वेश्यागृहासारखे बनवण्यात आले होते. या फ्लॅटची एक भिंत म्हणजे मोठा आरसा होता. याला एक्स रे किंवा डबल मिरर म्हणतात. पलीकडे बसलेल्या माणसाला या फ्लॅटमध्ये काय घडते आहे हे स्पष्ट दिसत असते आणि वेळ पडल्यास कॅमेरे वापरून रेकॉर्डींग करता येते. आता बघू या काय घडत होते 'ऑपरेशन मिडनाइट क्लायमॅक्स' मध्ये!

जॉर्ज व्हाइटला एलएसडीचा वापर करून माणसांच्या मनावर कसा ताबा मिळवायचा हा अभ्यास करायचा होता. यासाठी त्याने रस्त्यावर फिरणार्‍या वेश्यांना पैशाची लालूच आणि पुढेमागे पोलीसी लफडे झाले तर मदत करू या आश्वासनावर 'रिक्रूट' करून घेतले होते. वेश्या त्यांच्या गिर्‍हाइकांना भुलवून इथे घेऊन यायच्या. सेक्ससोबत ड्रिंक्स द्यायच्या. या ड्रिंक्समध्ये एलएसडी मिसळलेले असायचे. एकदा का गिर्‍हाईक त्या नशेच्या अंमलाखाली आले की त्याला अनेक प्रश्न विचारले जायचे. त्याच्या लैंगिक वर्तनाच्या टेप्स बनवल्या जायच्या. जॉर्ज व्हाइट या टेप्स केवळ अभ्यासासाठीच नव्हे, तर मनोरंजनासाठी पण वापरायचा. खरे म्हणजे अशा पध्दतीने वेश्यांना वापरणे ही फार मोठी 'सिक्युरिटी रिस्क' होती. पण जॉर्ज व्हाइट आणि त्याच्या सिडनी गॉटलीबसारख्या बॉसना विचारणार कोण?

असे किळसवाणे उद्योग फक्त जॉर्ज व्हाइट करत होता असे नाही. तुरुंगात असलेल्या कैद्यांना शिक्षेतून काही दिवस सूट मिळण्याची लालूच दाखवून एलएसडी घेण्यास भाग पाडले जायचे. व्हायटी बल्जर नावाच्या एका कैद्याने सांगितलेले हे सगळे अनुभव वाचल्यावर अंगावर काटा उभा राहतो. पण त्याचे अनुभव वाचण्याआधी या इसमाची ओळख करून घेऊ या. व्हायटी हा बॉस्टनमधल्या संघटीत आयरीश गुन्हेगारी टोळीचा बॉस होता. एकूण ११ खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. पण सरकारला मदत करण्याचा मोबदला म्हणून त्याला अमेरिकेत मृत्यूदंड देणारी इलेक्ट्रीक चेअर मिळाली नाही. शेवटी त्याचा अंतही तुरुंगातल्या हाणामारीतच झाला. सांगायचा मुद्दा असा आहे की अंमली पदार्थाचा व्यापार करणारा माणूस देखील एलएसडीला घाबरला असं त्याच्या अनुभवावरून दिसते.

तो म्हणतो, "आम्ही आठजणही भीतीने हादरलेले होतो. भूक मेली होती. भ्रम होत होते. डोळ्यांसमोरच्या खोलीचे आकार बदलत होते. भयंकर भिती आणि सोबत हिंसक वाटत होते. भास होत होते. भिंतीतून रक्ताचे पाट वाहताहेत असं वाटत होतं. नजरेसमोर असलेल्या कॅमेराच्या जागी मला कुत्रा दिसत होता, मी वेडा झालो होतो असंच वाटत होतं."

(व्हायटी बल्जर)

पण सत्य हे होते की एलएसडीपेक्षाही जास्त नशा सीआयएच्या अधिकार्‍यांच्या मेंदूत भिनली होती. काहीही झाले तरी चालेल. पण माणसाच्या मनावर ताबा मिळवता आलाच पाहिजे हे त्यांच्या मनात घोळत होते. एकीकडे हे अनधिकृत प्रयोग चालले होते, तर दुसरीकडे आपणहून समोर आलेल्या स्वयंसेवकांची स्थिती काही वेगळी नव्हती. नक्की कितीजण या प्रयोगात मरण पावले हे अद्यापही कोणालाच समजलेले नाही. कारण नंतरच्या काळात जेव्हा न्यायालयीन चौकशी सुरु झाली तोपर्यंत सगळी कागदपत्रे नष्ट करण्यात सीआयएला यश आलं होतं. तरीही इतरत्र झालेल्या नोंदींवरून बर्‍याच घटना उजेडात आल्या.

हेरॉल्ड ब्लॉअर नावाच्या माणसाच्या मृत्यूच्या शेवटच्या मिनिटांतल्या हॉस्पिटलच्या रेकॉर्डमधल्या नोंदी वाचल्या तर..? तर .. कदाचित आज रात्री तुम्हांला झोपही येणार नाही.
सकाळी -

९.५३ इंजेक्शन दिले.

९.५९ भयंकर अस्थिर, दरदरून घाम फुटला, वास्तवाचा संपर्क तुटला. नर्सने बळजबरीने शांत केले.

१०.०१ डोळे गरगरा फिरवायला सुरुवात केली.

१०.११ शरीर कडक पडले.

१०.१५ उत्तेजक इंजेक्शन दिले.

१०.२० ते पुढे ११.४५ - पेशंट डीप कोमात गेला.

११.५० कृत्रिम श्वासोछ्वास देण्याचा प्रयत्न केला.

१२.१५ खेळ खल्लास. सब्जेक्ट डेड

हे सगळं घडत होतं. पण सीआयएच्या उच्चाधिकार्‍यांना त्याची नोंदही घ्यायची नव्हती. कारण एकच, नागरिक बळी गेले तरी चालतील. पण रशियाच्या दोन पावलं पुढे जायचं असेल तर हे करावेच लागेल.

वाचकहो, आतापर्यंतचे सर्व भाग वाचल्यावर तुमच्या मनात एक नक्की आलं असेल की "हे बोभाटावाले फ्रँक ओल्सोनला विसरलेले दिसताहेत." तर तसं काही नाही. फ्रँक ओस्लोन आणि त्याच्या आत्महत्येमुळे उघडकीस आलेले प्रोजेक्ट एमके अल्ट्रा समजण्यासाठी हे वाचणे आवश्यकच होते. जर हे वाचता वाचता तुमच्या डोळ्यासमोर चित्रपट उलगडत गेला असे वाटत असेल तर हा आजच्या लेखानंतर इंटर्व्हल झाला आहे असं समजा. इंटर्व्हल नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत फ्रँक ओल्सोनला!!

सबस्क्राईब करा

* indicates required