डोळ्यात मिरचीची भुकटी गेली असताही त्याने १८ किलोमीटर पर्यंत ट्रेन पळवली....

मंडळी, हिरो म्हणजे ज्याच्या अंगात सुपरपॉवर्स आहेत असा एखादा माणूस नसून तो आपल्यातलाच एक असू शकतो हे मुंबईच्या एका मोटरमनने सिद्ध केलं आहे. लक्ष्मण सिंग असं त्याचं नाव. एका अज्ञाताने लक्ष्मण सिंगच्या डोळ्यात मिरचीची भुकटी फेकली होती. अशा परिस्थितीही या पठ्ठ्याने १८ किलोमीटर पर्यंत ट्रेन दामटवली. चला जाणून घेऊया या घटनेबद्दल.
लक्ष्मण सिंग CSMT वरून टिटवाळ्याला जात होते. कळवा स्टेशन ओलांडल्यानंतर एका अज्ञाताने मोटारमनच्या केबिन मध्ये मिरचीची भुकटी फेकली. हा मसाला नेमका लक्ष्मण सिंग यांच्या डोळ्यात गेला. डोळ्यांची आग आग होऊ लागली. मुंब्रा येथे पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्या बदल्यात दुसऱ्या मोटारमनला ट्रेन पुढे घेऊन जाण्याची विनंती केली. पण त्यांना सांगण्यात आलं की तातडीने दुसरा मोटरमनची सोय होऊ शकणार नाही. हे समजताच त्यांनी डोळे धऊन स्वच्छ केले आणि स्वतःच ट्रेन पुढे न्यायचं ठरवलं.
दुसऱ्या मोटरमनची सोय झाली ती कल्याण मध्ये. तों पर्यंत त्यांनी १८ किलोमीटर अंतर पूर्ण केलं होतं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यांच्या डोळ्यांना अंधत्व येण्या इतकी इजा पोहोचली आहे. सध्या लक्ष्मण सिंग यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय.
लक्ष्मण सिंग यांनी ठरवलं असतं तर ते ट्रेन थांबवू शकत होते, पण त्यांनी ट्रेन पुढे जाऊ दिली. कारण ट्रेन थांबल्यामुळे बाकीच्या ट्रेन्स खोळंबल्या असत्या. शिवाय लोकांनाही उशीर झाला असता.
मंडळी, या कामगिरीसाठी लक्ष्मण सिंग यांचा रेल्वे विभागातर्फे सत्कार करण्यात आला आहे. याखेरीज त्यांना बक्षीस म्हणून १००० रुपये देण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर लोक त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.
नुकताच असाच एक किस्सा बिहार मध्ये घडला होता. राम कृपाल सिंग हे आपल्या मुलीला शाळेत सोडायला आपल्या बाइकवरून जात होते. रस्त्यात त्यांना गुंडांनी अडवलं. झटापटीत राम सिंग यांच्या छातीत लुटारूंनी २ गोळ्या घातल्या. त्यानंतर गुंड पळाले. छातीत २ गोळ्या लागलेल्या असतानाही राम सिंग यांनी मुलीला शाळेत सुखरूप सोडलं आणि मग तिथून पुन्हा बाइक पळवत हॉस्पिटल मध्ये दाखल झाले.
मंडळी, आपल्याला अनेकदा असे हिरो भेटत असतात. तुम्हाला भेटला आहे का असा हिरो ? तुमचा किस्सा नक्की सांगा !!