computer

मालकीण घरी नसताना या पोपटानं केली ॲमेझॉन ॲलेक्सावरुन शॉपिंग...

एका पोपटानं चक्क ॲलेक्सा वापरुन ख्रिसमसची शॉपिंग केलीय!! काय काय मागवलं?  कलिंगड, बेदाणे, ब्रोकोली, आईस्क्रीम, एक लाईटचा बल्ब आणि चक्क एक पतंग!! हा पोपट आहे इंग्लंडातल्या ऑक्सफर्डशायरमधला. त्याचं नांव आहे रोको. त्याला कलिंगड, बेदाणे, ब्रोकोली, आईस्क्रीम हे सगळं खायला जाम आवडतं. पण तो पतंग आणि बल्बचं काय करणार आहे काही कळत नाही. 

ॲलेक्सा म्हणजे काय?

मंडळी, स्मार्टफोन जुने झालेत. आता लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना फेसबुक, पेटीएम, व्हाट्सॲप, फ्लिपकार्ट-ॲमेझॉन सगळं नीट वापरता येतंय. त्यामुळं त्याचं आता काही कौतुक राह्यलं नाहीय. मग नवीन काय आहे? नवीन आहे गुगल होम आणि ॲमेझॉन ॲलेक्सा!!

 

हे आणि काय नवीन? तुम्ही कॉफी विथ करण बघता की नाही? त्यात  अस्से लाईट्स लाव म्हटलं की एका उभ्या गडूमधून आवाज येतो आणि लगेच तस्से लाईट लागतात, हे पाह्यलंय ना? ते म्हणजे गुगल होम. ते गुगलचं यंत्र, तर अशाच ॲमेझॉनच्या यंत्राला ॲलेक्सा म्हणतात. खरं तर त्याचं नांव ॲमेझॉन इको आहे, पण आत बोलणाऱ्या बाईचं नांव ॲलेक्सा असल्यानं सगळे त्या यंत्रालाही ॲलेक्साच म्हणतात. आणि अशा या यंत्रांना स्मार्ट असिस्टन्ट म्हणतात. ते वापरण्यासाठी घरात वाय-फाय मात्र असावं लागतं. इंटरनेटशिवाय हे दोघेही काहीही करु शकत नाहीत. 

हे पाहा असे दिसतात गुगल होम आणि ॲलेक्सा..

ॲलेक्सावरुन शॉपिंग केली म्हणजे नक्की काय केलं?

हे जाणून घेण्यासाठी ॲलेक्साचं काम कसं चालतं हे आधी माहित हवं. ॲलेक्साला तोंडी आज्ञा दिल्या की ती काम करते. सध्या सगळीच कामं तिला जमत नसली तरी "अमक्या ठिकाणचं आजचं हवामान कसं आहे", "आजच्या ठळक बातम्या काय आहेत", "ऑल इंडिया रेडिओ विविध भारती लाव", "स्मार्ट बल्ब  चालू किंवा बंद कर", "टीव्ही लाव", "टिव्ही बंद कर", "टिव्हीचा आवाज वाढव/कमी कर", "अमकं गाणं लाव", "मला ढमक्या गावाबद्दल सांग", "तमक्याला फोन लाव"..अशा नाना आज्ञा देता येतात आणि ती ही सगळी कामं मस्त करते. एवढंच काय, ती रिमाईंडर लावते, कामाच्या याद्या पण बनवून देते. तर अशा या ॲलेक्साला हे पोपटराव म्हणाले, "ॲमेझॉन शॉपिंग कर". तिनं विचारलं असेल, "काय काय घ्यायचंय?" या महाशयांची यादी तयारच असेल. मग काय, ॲमेझॉनची शॉपिंग कार्ट तयार!! या पोपटाच्या दुर्दैवानं त्याच्या मालकिणीनं ही कार्ट पाहिली आणि तिला त्यातल्या सगळ्या वस्तू रद्द कराव्या लागल्या. 

रोको हा अफ्रिकन ग्रे जातीचा पोपट आहे. हे पोपट एकदम हुबेहुब आवाज काढण्यात जाम पटाईत असतात. हा आगाऊ पोपट आधी एका पक्षी अभयारण्यात होता. तिथं हा अशी शिवराळ भाषा वापरे, की त्याला तिथून हलवावंच लागलं. तिथंच काम करणाऱ्या मरिअन विश्नेव्स्कींनी त्याला आपल्या घरी आणलं तर तिथंही त्यानं हे उद्योग केले.

ज्यांच्या घरी ॲलेक्सा आणि गुगल होम आहेत, त्यांच्या घरची लहान मुलं पण त्यांच्यावर जाम खूष असतात. हवी ती गाणी लावतात आणि त्यांच्याशी गप्पाही मारतात. या लहान मुलांसमोरही ॲलेक्सा आणि गुगल होम वापरुन शॉपिंग केलीत तर तीही त्याचं अनुकरण करायला मागं पाहणार नाहीत. 

तेव्हा मालकांनो, आपापल्या ॲलेक्सा आणि ॲमेझॉन अकाऊंट्स सांभाळा!!

सबस्क्राईब करा

* indicates required