इडली सांबार आहे हजारो वर्षं जुनं.. जाणून घ्या इतिहास!!
पों पों करत येणारा इडलीवाला आपल्या चांगल्या परिचयाचा आहे!! गरम नरम इडली आणि सोबत सांबार चटणी या फेमस आणि सोयीच्या नाश्त्याची मुंबईकरांना सवय लावली उडप्याच्या हॉटेलने. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की इडलीची रेसेपी काही हजार वर्षं जुनी आहे!
पण या सगळ्या वर्षांत तिला बरीच नावंही मिळत गेली. म्हणजे बघा, इडलीचं संस्कृत नाव आहे इंदुलीका. इंदू म्हणजे चंद्र, पौर्णीमेच्या चंद्रासारखी दिसणारी म्हणून इंदुलीका! इसवी सनाच्या ९ व्या शतकात वद्दरधाने या ग्रंथात शिवकोट आचार्य यानं इडलीचा उल्लेख इड्डलीगे असा केलाय. तर अकराव्या शतकातील लोकोपकार या कन्नड शब्दकोशात आणि ११३० साली सोमेश्वर राजाने संपादीत केलेल्या मानसोल्लास या ग्रंथात इड्डरीका असा उल्लेख आहे. इतकंच नाही, तर १६ व्या शतकातील एका गुजराती वरानक समुच्चय या ग्रंथात इडरी असा उल्लेख आहे.
पण मंडळी, या सर्व ग्रंथात वेगवेगळी नावं दिसली तरी रेसेपी मात्र सर्वत्र एकसारखीच आहे. या रेसीपीच्या वर्णनात भर टाकून मेदूवड्याची म्हणजे घारीकेची आणि दहिवड्याची म्हणजेच वटकाची रेसेपी पण आहे.
तत: सम्पेष्य पेषण्यां सम्भारेण विमिश्रितान्|
स्थाल्यां विमर्ध्य बहुश: स्थायपेत्तदहस्तत:||
आम्हीभूतं मापपिष्टं वटिकासु विनिक्षिपेत्|
वस्त्रगर्भाभिरन्याभि: पिधाय परिचायतेत्||
अवतार्यात्र मरिचं चूर्णितं विकिरेदनु|
घृताक्ता हिंङगुसर्पिघ्यां जीरकेण च धूपयेत्||
सुशीता: धवला: श्लक्ष्मा एता इडरिका वरा:||
इतका जुना इतिहास आहे आपल्या आवडत्या इडली सांबाराचा!

वरचं संस्कृत खूपच जड गेलं असेल तर आपल्याकडे बाळगोपाळांचं हे आवडतं गाणंही आहेच हो..
एक होती ईडली
खुप खुप चिडली
सांबार होते गरम गरम
ईडली होती नरम नरम
चमचा आला खुशित
येवुन बसला बशीत
चमच्याने पाहिले ईकडेतिकडे
ईडलीचे केले तुकडे तुकडे
ईडली झाली होती मस्त
मुलांनी केली ईडली फस्त..
मग, कधी आहे बेत आता इडली-सांबाराचा?




