पकडवां शादी : लग्न लावण्याची ही विचित्र बिहारी पध्दत वाचून तुम्ही स्वतःला भाग्यवान समजाल!

मुलानं लग्नासाठी मुलीच्या मागे लागणं, तिला विविध मार्गांनी धमकावणं, आणि अखेरचा मार्ग म्हणून तिला किडनॅप करणं... हे सारे प्रकार तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहात असाल मंडळी. आजुबाजूला घडत नसले तरी बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये ते घडतातच! पण बिहारमधली ही लग्न लावण्याची पध्दत थोडी उलटी आणि विचित्र आहे बरं का! इथं मुलाकडून मुलीचं नाही, तर चक्क मुलीकडच्या लोकांकडून नवरदेवांचं अपहरण करून त्यांचं जबरदस्तीने लग्न लावलं जातं!

स्त्रोत

या प्रकाराचं तिथे नाव आहे 'पकडवां शादी' किंवा 'जबरिया विवाह'. अशा 'पकडवां' लग्नात वराच्या इच्छेविरुद्ध त्याला मारझोड करून, त्याचं अपहरण करून, शस्त्रांचा धाक दाखवून, एवढंच काय, तर कधीकधी अंमली पदार्थ देऊनही लग्नाच्या पाटावर बसवलं जातं! खासकरून बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही ग्रामीण भागात अशी लग्नं लावली जातात, आणि ग्रामीण भागातच हे सगळं घडत असल्याने या प्रकारांबाबत अजूनही बाहेरच्या लोकांना जास्त माहिती नाहीये.

मंडळी, तरूण मुलांचं असं अपहरण करून लग्न लावण्यामागे सर्वात मोठं कारण आहे हुंडा देण्यापासून सुटका मिळवणं. याचप्रमाणे वधूपक्षाला एकतर्फी मुलगा पसंत पडणं, वधूमध्ये काही दोष असल्यास तिचं लग्न न ठरणं अशा कारणातूनही वराचं असं अपहरण केलं जातं. विशेष म्हणजे अशा लग्नांना बळी पडणारे तरूण हे जास्त करून इंजिनिअर, डॉक्टर किंवा इतर उच्चपदावर काम करणारेच असतात!

आकडेवारीनुसार वर्ष २०१५ मध्ये ३,००१, २०१६ मध्ये ३,०७५ आणि २०१७ च्या मार्च महिन्यापर्यंत ८३० पुरूषांचं अपहरण करून असं लग्न लावण्यात आलंय! इतकंच काय राव, वराला किडनॅप करण्यासाठी इथं खास प्रोफेशनल टोळ्याही कार्यरत आहेत. पैसा घेऊन वराचं अपहरण करणं आणि जास्त पैसे मिळाल्यास अशी लग्नं टिकवण्याची हमीही या टोळ्यांकडून दिली जाते! यावरून या कुप्रथेचा प्रादुर्भाव आपल्या लक्षात येऊ शकतो. आणि जिथे खुद्द नवर्‍यामुलग्यालाच उचललं जातंय तिथं मुलगीची इच्छा आणि पसंती विचारात घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे दबावाखाली येऊन अशा अनेक पती-पत्नींना आपला संसार निमुटपणे चालवावा लागतो. ज्या नवरोबांकडून लग्न मानण्यास नकार येतो त्यांना परत पोलिस आणि कोर्टाच्या फेर्‍यांमध्ये अडकवलं जातं.

दुर्दैवाने  अशा प्रकारांना रोखण्यासाठी देशात आज कोणताही कायदा अस्तित्वात नाही. बळी पडलेले अनेक पुरूष पोलिसांकडे तक्रार करणंही टाळतात. पुढे जाणार्‍या काळानुसार अशा प्रकारांमध्ये घट होण्याऐवजी ते उलट वाढताना दिसताहेत. या कुप्रथेवर न्याययंत्रणा आणि प्रशासनाने वेळीच लगाम न घातल्यास ती देशभर पसरायला वेळ लागणार नाही. बरोबर ना?

सबस्क्राईब करा

* indicates required