पेटीएमच्या आयपीओचा अर्ज करू की नको हे समजण्यासाठी हे नक्की वाचा !!
जर तुम्ही मिलिएनल म्हणजे नव्वदीच्या दशकात जन्माला आला असाल तर अल्ताफ राजाचं 'तुम तो ठहरे परदेसी' हे गाणं आठवत असेलच. त्यावेळी या पुढची सगळीच हिट्ट गाणी फक्त अल्ताफ राजाचीअसतील असं लोकांचं मत होतं. ते गाणं आलं आणि गेलं.आता कोणी मुद्दाम आठवण करून दिली तरच अल्ताफ राजा लोकांना आठवतो.थोडक्यात सांगायचं असं होतं की एक गाणं म्हणजे सगळीच गाणी नाही.
आज या गाण्याची आठवण होण्याचं कारण असं आहे की काहीच महिन्यांपूर्वी 'झोमॅटो'चा आयपीओ येऊन गेला आणि त्या आयपीओने लोकांना भरपूर पैसे कमावून दिले.आता तसाच 'न्यू टेक कंपनी' या सदरात मोडणारा 'पेटीएम' चा इश्यू आज बाजारात येतो आहे.या आयपीओत पण अशीच बक्कळ कमाई होणार असं काहींचं मत आहे.तर काही जणांच्या मते झोमॅटोचा सक्सेस अल्ताफ राजाच्या गाण्यासारखं होता.पेटीएमला तेच यश मिळेल असं नाही.काय घडणार आहे ते काही दिवसातच कळेल पण तोपर्यंत पेटीएमच्या आयपीओबद्दल वाचून घेऊ या.
आता 'हसत खेळत शिका' या पध्दतीने पेटीएमचा आयपीओ काय आहे ते बघू या !
हा आयपीओ आकाराने प्रचंड आहे.पेटीएम बाजारातून छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून ₹१८३०० कोटी भांडवल गोळा करणार आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान कोट्यावधी नवे गुंतवणूकदार बाजारात आलेले आहेत त्या भरवशावर हे टार्गेट ठेवले असावे असा अंदाज आहे. पण दिवाळीच्या नंतरच्या दिवसात खिसा रिकामा असलेल्या छोट्या गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले जातील का ? हा एक वेगळाच प्रश्न आहे.
आयपीओची रक्कम आयत्या वेळी का वाढवण्यात आली?
'मी येताना नक्की दोन खंबे घेऊन येतो असं सांगणार्या दोस्ताने ऐन वेळी कलटी मारली तर काय होतं ते तुम्हाला माहिती आहेच ! पेटीएमचं असंच झालं ! पेटीएमवाले आयपीओच्या आधीच साधारण ₹२००० कोटी खाजगीत गोळा करणार होते पण ते त्यांना जमले नाही. त्यामुळे १६६०० चे टार्गेट आता ₹१८३०० कोटी झालं आहे.
आता पुढचा महत्वाचा प्रश्न ! इतके सारे पैसे हवेत कशाला ?
हे समजण्यासाठी पेटीएम किंवा त्यासारखी अॅप्लीकेशनच्या आर्थिक रचनेची माहिती करून घेऊ या.नव्या टेक्नॉलॉजीवर आधारीत कंपन्यांची उत्पादने बनवण्यासाठी आधी कन्सेप्ट (संकल्पना) मांडली जाते.या कन्सेप्टला जे आर्थिक सहाय्य देतात ते प्रायमरी किंवा वेंचर इन्व्हेस्टर म्हणून ओळखले जातात.त्यांची गुंतवणूक कंपनीच्या अशा टप्प्यात केली जाते ज्रेव्हा ती बुडण्याची शक्यताच जास्त असते. त्यानंतर वेगवेगळ्या देशीविदेशी- विदेशीच जास्त- कंपन्या गुंतवणूक करतात त्या गुंतवणूकीला फर्स्ट राउंड -सेकंड राउंड इन्व्हेस्टमेंट असे म्हटले जाते.हे गुंतवणूकदार भरघोस नफ्यासहित आयपीओच्या राउंडला बाहेर पडतात.आता पेटीएम सारखी कंपनी अजून नफ्यातच नाही तर भरघोस नफा येतो कुठून ?तर तो येतो आपल्यासारख्या अर्ज करणार्या गुंतवणूकदाराकडून ! सोप्या भाषेत सांगायचं तर ₹१८३०० कोटींपैकी १०००० कोटी जुनी माणसं घेऊन जाणार आहेत आणि उरलेले ८३०० कोटी भविष्यकाळातील कामकाजासाठी वापरले जाणार आहेत.
हा आयपीओ महागच वाटतो आहे.??
आता यानंतर आपण समभागाच्या किमतीचा विचार करू या. आत्तापर्यंत म्हणजे 'टेक कंपनी' या संकल्पनेचा उदय होईपर्यंत बाजारात जे आयपीओ येत होते त्यांच्या किमतीचा विचार करताना कंपनी किती उलाढाल करते आणि किती नफा कमावते याचा विचार केला जायचा. पेटीएमचा विचार केला तर उलाढाल भरपूर आहे पण नफा दिडकीचा नाही ! मग एका समभागाची किंमत ₹२०८०–₹२१५० इतकी जास्त का आहे ? कारण असे आहे की कंपनीची ताकद सध्याच्या घडीला ₹१४९००० कोटी समजली जाते. येणार्या काळात कंपनी नफ्यात येईल असे इथे गृहीत धरले जाते.
सोप्या भाषेत सांगायचं तर पोरगं सध्या जरी 'कार्यकर्ता' असलं तरी भविष्यकाळात 'मुख्यमंत्री' होण्याच्या लायकीचं आहे असं जे समजतील त्यांनीच स्थळाचा विचार करावा ! अशा पध्दतीने विचार करणार्य गुंतवणूकदारांनाही हा आयपीओ महागच वाटतो आहे.
मार्ग अत्यंत अवघड आहे ?
पेटीएम नक्की काय करते हा प्रश्न विचारणे तुम्हाला वेडगळ वाटेल कारण आपण सर्वच नियमित पेटीएम वापरतो.आता त्यातली मेख अशी आहे की एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवण्यात पेटीएमला काहीच नफा नसतो.नफा असतो तुमच्या खरेदीतून म्हणजे P2M व्यवहारातून कंपनीला पैसे मिळत असतात.सध्यातरी या सेगमेंटमध्ये पेटीएम अग्रेसर आहे.
तरीही एका समभागासाठी इतके पैसे का मोजायचे हा प्रश्न बाकीच राहतो.
त्याचे उत्तर येणार्या ५ वर्षात दडलेले आहे.आता पेटीएमकडे पेमेंट बँक आहे. पाच वर्षे कामकाज सुरळीत केलं की पेटीएम 'स्मॉल फायनान्स बँक होऊ शकते. स्मॉल फायनान्स बँक झाल्यावर कर्ज देणे हा महत्वाचा उद्योग पेटीएम करू शकेल.
कार्टं हुशार आहे पण अभ्यास करत नाहीय्ये !!
असे असले तरी बर्याच तज्ञांच्या मते हा मार्ग अत्यंत अवघड आहे. त्याची कारणे अशी आहेत :
१ पेमेंट ट्रान्सफर ही पेटीएमची मोनोपली नाही.गुगल पे सारखी अॅप्लीकेशन टक्कर द्यायला उभीच आहेत. ( दोन्हींचा पाया युपीआयवरच रचलेला आहे )
२ P2M व्यवहारात येत्या काळात स्पर्धा वाढत जाणार आहे.येणारी प्रत्येक नवी कंपनी काहीतरी 'फुकट'देणारच आहे. उदाहरणार्थ : कॅशबॅक स्किम देणे . हे खर्च नव्या अॅप्लीकेशनला परवडतील किंवा कारावेच लागतील पण पेटीएमला आता ते परवडणार नाही.पेटीएम वापरणार्यांची संख्या इथे सगळ्यात मोठी अडचण होऊ शकते.
३ पेमेंट बँक ते स्मॉल फायनान्स बँक हा रस्ता अजून दूर आहे.येत्या ५ वर्षात बँकींग क्षेत्रात काय बदल घडतील हे सांगता येणं कठीण आहे.
४ पैसे गाठीला लावण्यासाठी कंपनीला अनेक वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतील पण पेटीएम या कामात अत्यंत मंद गतीने काम करते आहे असे तज्ञांचे मत आहे.२०१६ ते २०२१ हा पूर्ण पाच वर्षांचा 'लिड टाइम' मिळूनही गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण होतील असे वाटत नाही. थोडक्यात कार्टं हुशार आहे पण अभ्यास करत नाहीय्ये ही स्थिती आहे
अर्ज करावा की नाही ?
मग जमेची बाजू काय आहे ?? जमेची बाजू ब्रँड व्हॅल्यू आहे.आजच्या तारखेस पेटीएम म्हणजे काय ते कोणालाही समजावून सांगावे लागत नाही.भारताची डिजीटल फायनान्स या क्षेत्राची ओळख देणारी कंपनी म्हणजे पेटीएम असेच म्हणावे लागते.डिमॉनीटायझेशन नंतर पेटीएमची खरी किंमत आपल्याला कळली.या ओळखीचा फायदा करून घेण्यात कंपनी मागे पडते आहे हाच चिंतेचा विषय आहे.
आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न : अर्ज करावा की नाही ? या प्रश्नाचे उत्तर तुमचा अधिकृत अर्थ सल्लागार जे काही म्हणेल त्यावर अवलंबून असेल .आम्ही मात्र अर्ज न करता पुढच्या मंदीच्या फेर्यात पडेल भावातच हा समभाग घेणार आहोत.
जाता जाता एकच प्रश्न
जाता जाता एकच प्रश्न आम्ही विचारतो आहे त्याचं उत्तर शोधून बघा !
पेटीएमचा पब्लीक इश्यू एका ऐतिहासिक घटनेच्या तारखेसोबत जोडला गेला आहे ती घटना कोणती ते शोधून बघा !!
हा निव्वळ योगायोग आहे का हा प्रश्न विचारून बघा !!




