computer

बिग बींच्या घरातले हे बैलाचे पेंटिंग ४ करोड रुपयांचे आहे? या चित्राबद्दल आणखी जाणून घ्या...

बॉलिवूडचा महानायक अमिताभ सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्यांचे खूप फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटवरून ते नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकताच दिवाळीनिमित्त म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण यावेळी चर्चा ही त्यांच्याबद्दल नाही, तर फोटोमध्ये असलेल्या पेंटिंगची झाली. अमिताभ यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काय आहे या पेंटिंगमध्ये खास? असा प्रश्न पडलाय ना!

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत पत्नी जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता बच्चन, अगस्त्य नंदा आणि नव्या नंदा दिसत आहेत. त्यांच्या मागे भिंतीवर एक मोठं पेटिंगही दिसत आहे. यामध्ये एक भला मोठा बैल दिसून येत आहे. हे पेटिंग पाहायला खूपच वेगळे वाटते आणि तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर बैलाचा पुढचा पाय आणि त्याची शेपूट ही एकत्र जोडल्याचं दिसत आहे. यामुळे सर्वांचं लक्ष या पेटिंगकडे गेले. आपण घरात पळणाऱ्या घोड्याचे पेंटिंग खूपदा पाहतो, पण हे बैल आणि तोही असा वेगळा?

सर्वात विशेष म्हणजे या पेंटिंगची किंमत तब्बल ३ ते ४ कोटी इतकी आहे. हे पेंटिंग मनजित बावा यांनी काढले आहे. मनजित हे पंजाबमधील कलाकार आहेत. त्यांची चित्रांमध्ये भारतीय पौराणिक कथा आणि सुफी पंथ यांच्या प्रेरणेची झाक दिसते. ते अनेकदा आपल्या पेटिंग्समधून पशू आणि माणसाच्या सहजीवनाबाबत भाष्य करतात. काली, शिवा या देवांचा समावेश त्यांच्या पेंटिंगमध्ये असतो. त्यांची पेंटिंग्ज जवळपास ३ ते ४ कोटी रुपयांमध्ये विकली जातात आणि त्यांच्या पेंटिंग्जचा Sotheby’s या ऑक्शन हाऊससारख्या जगातल्या लोकप्रिय ऑक्शन हाऊसमध्ये लिलाव होतो.

पेंटिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना नेहमीप्रमाणे ट्रोल केले तर काही जणांनी घरी बैलाचे पेंटिंग ठेवण्यामागचा अर्थ सांगितला आहे. बैल एक वर्चस्व, ताकद, लाभ, यश, समृद्धी आणि आशावादाचे प्रतिक म्हणून मानले जाते. वास्तू शास्त्र म्हणून बऱ्याचदा काही प्राण्यांचे फोटो किंवा मूर्ती घरात लावले जातात. काही लोकांना 'वेलकम'सिनेमातल्या मंजूभाईने काढलेले चित्रही यावरुन आठवले.

अमिताभ बच्चन यांच्या घरी हे पेटिंग लावण्यात आलं आहे, म्हणजे हे पेटिंग काही खास असणारच. नाही का?

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required