computer

कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान करायचे आहेत? मग त्या केसांबाबतचे नियम वाचलेत का?

कोणत्याही आईला आपल्या मुलांनी एखादे चांगले काम केले तर नक्कीच कौतुक वाटते. बॉलिवूड मध्येही कोणतेही सेलिब्रिटी असो आपल्या मुलांविषयी एखादी चांगली बातमी चाहत्यांशी सोशल मीडियावर शेअर करण्यास विसरत नाहीत. आपली बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दिक्षितनेही नुकताच तिच्या मुलाचा रायनचा (Ryan) एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून त्याला हिरो म्हणले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक सेलिब्रिटी आणि चाहते रायनचे प्रचंड कौतुक करत आहेत. काय आहे या पोस्टमध्ये चला पाहूयात.

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा मुलगा रायन त्याचे लांब केस कापताना दिसत आहे. हे केस त्याने २ वर्षं वाढवले आहेत आणि तेही फॅशन म्हणून नाही, तर कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी! तो हे केस संस्थेला दान करत आहे. माधुरीला आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो. तिने लिहिले आहे की माझा मुलगा खरा हिरो आहे. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये अनेक लोकांचे किमोथेरपीमध्ये केस जात असल्याचे पाहून रायन खूप हळवा झाला होता. त्यांचे केस गेल्याचे पाहून माझ्या मुलाने त्याचे केस कॅन्सर सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने आम्ही पालक म्हणून खूप आनंदी आहोत."

असे केस फक्त सेलेब्रिटीच दान करतात असे नाही. सोशल मिडियावर तुमच्या मित्र-मैत्रिणींनीही असे केस दान केल्याचे तुम्ही पाहिले असेल. कॅन्सर रुग्णांना केस दान करायचे असल्यास मात्र काही नियम असतात. copewithcancer.org नुसार ते खालील प्रमाणे आहेत.

१. तुम्ही कोणत्याही सलूनमध्ये केस कापून घेऊ शकता. केस कापण्यापूर्वी केस धुवावे लागतात, वाळवावे लागतात आणि दोन्ही टोकांना रबर बँडच्या सहाय्याने वेणी घालून बांधावे लागतात.

२. केस दानासाठी केसाची लांबी कमीतकमी १२ इंच असावी लागते. त्यापेक्षा लहान केस वाया जातात, कारण ते विग बनवण्यासाठी वापरता येत नाहीत.

३. दान केलेले केस जमिनीवर पडू द्यायचे नाहीत. कारण जमिनीवरून पडलेले केस विग बनवण्यासाठी वापरत नाहीत. अत्यंत स्वच्छतेत ही प्रक्रिया होते.

४. एक विग बनवण्यासाठी किमान ६-७ महिलांचे(लांबी नुसार) केस लागतात. दान केलेले केस नंतर त्यांच्या गुणवत्तेनुसार लावले जातात आणि विग तयार करण्यासाठी वापरले जातात. पांढरे किंवा रंगवलेले केसही स्वीकारले जातात.

५. दान केलेले केस एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवून त्यावर दात्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर याची माहिती द्यावी.

हे विग कितीतरी कॅन्सरग्रस्तांना आत्मविश्वास देत असतील याची कल्पना करता येईल. सोशल मीडियामुळे अनेक चांगल्या गोष्टींची माहिती सर्वांना होते. ती शेअर व्हायलाच हवी.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required