१३३ दिवस समुद्रात एकाकी अडकलेल्या सैनिकाला ब्रिटिश सरकारने पुरस्कार का दिला?
लाईफ ऑफ पाय तुम्ही पाह्यला असेल. जहाज फुटून तराफ्यावर जीव जगवत असलेले 'पाय' पटेल आणि पीटर पार्कर तर आठवत असतीलच. खाणं, पिण्याचं पाणी मिळवणं, सागरी जीवांपासून संरक्षण करणं आणि हे सगळं करत असताना आपणही जगणं.. सिनेमातल्या कल्पना व्हीएफएक्सचय माध्यमातून छान वाटतात. पण असंच काही कुणी खरंच अनुभवलं असेल तर? ते ही थोडेथोडके नाही, १३३ दिवस एकाकी, समुद्रात कंठले असतील तर? तर, आजची गोष्ट आहे दुसऱ्या महायुध्दाच्या दरम्यान अशा संकटात सापडलेल्या एका माणसाची. इतके दिवस एकाकी समुद्रात राहण्याचं त्याच्यानावे रेकॉर्डही आहे. वाचा मग त्याची गोष्ट!!
काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा! जमीन, आकाश, समुद्र, सगळीकडेच युद्धाचे सावट पसरले होते. शत्रूराष्ट्राचं सैनिक दिसो, विमान की, जहाज त्यावर हल्ला करायचाच, एवढंच युद्धाचं सूत्र! अशातच केप टाऊनहून सुरीनामसाठी एक ब्रिटिश जहाज चालले होते. अमेझॉनच्या पूर्वेकडून जाताना जर्मन जहाजाने लक्ष्य या ब्रिटिश जहाजावर पडले आणि त्यांनी लागलीच या जहाजाला छेदण्यासाठी टर्पोइडच्या सहाय्याने हल्ला केला आणि त्याचे दोन तुकडे करून टाकले. जहाजावर एकूण ५३ लोक होते आणि यातील फक्त एकच माणूस वाचला, ज्याचे नाव होते पूँ ली.
पूँ ली हा चीनचा रहिवासी, मात्र त्याच्या वडिलांनी त्याला ब्रिटिश जहाजांवर नोकरीसाठी पाठवले. देशातच राह्यला तर त्याला सक्तीने युद्धासाठी नेले जाईल अशी त्यांना भीती होती. चीनच्या हैनान प्रांतातील पूँ लीचे फक्त हायस्कूलपर्यंतचे शिक्षण झाले होते. म्हणून तो बेन लेमंड या ब्रिटिश जहाजावर मदतनीस म्हणून काम करत होता. यू-१७२ या जर्मन युद्ध नौकेने त्या ब्रिटिश जहाजांवर हल्ला केल्यानंतर जहाजाचा स्फोट होण्याआधीच पूँ लीने अंगात लाईफ जॅकेट चढवले आणि त्याने पाण्यात उडी मारली. पूँ लीला पोहता येत नव्हते, पण लाईफ जॅकेटच्या साहाय्याने तो तरंगत राह्यला. दोन तासानंतर त्याला साधारण आठ-फुटांचा एक चौकोनी तराफा सापडला. तातडीने तो तराफा पकडून त्यावर चढला. पूँ लीच्या सुदैवाने त्या तराफ्यावर पाण्याचे कॅन, बिस्किट पुड्यांचे बॉक्सेस, साखरेची गोणी, दोन चुली, काही मशाली आणि टॉर्च होत्या.
पूँ लीला या शिदोरीच्या आधाराने काही दिवस निवांतपणे काढता आले, पण काहीच दिवसांत त्याची ही शिदोरी संपून गेली. त्याच्याजवळचे पिण्याचे पाणीही संपले. तेव्हा तो पावसाचे पाणी साठवून ठेऊ लागला. खाण्याचे साहित्य संपले तेव्हा मासे धरून ते उन्हात वाळवून खाऊ लागला. मासे धरण्यासाठी तो त्या तरफ्यावरील दोर आणि खिळयांचा वापर करत असे. एक पत्र्याच्या डब्यापासूनच त्याने चाकूही बनवला होता.
त्याला पोहता येत नव्हते, पण तराफ्याच्या सहाय्याने तो कसाबसा पाण्यावर तग धरून राहील होता. कधी कधी त्याच्या या तराफ्याजवळ शार्क येत. तो शार्कचीही शिकार करत असे. एखादा मोठा शार्क सापडला की बरेच दिवस त्याची त्यावर गुजराण चालत असे. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होताच. कारण मध्येच पावसाने दडी मारली होती. मग शार्कचे रक्त पिऊनच त्याने आपली तहान भागवली होती.
उन्हाचे चटके सोसवत नव्हते. खाण्यापिण्याचे हाल तर होतेच, पण येणारी जाणारी एकही बोट आपल्या मदतीसाठी येत नाही हे येणारी विषण्णता आणि खिन्नता जास्त मोठी होती. मासे वाळवून खाण्याची तशीही त्याला सवय होती. मात्र अशा अवस्थेत किती दिवस जाणार, आपल्या घरी सुखरूप पोहोचू की नाही, की असेच, इथेच मरून जाऊ की काय? अशा प्रश्नांची उत्तरे त्याला काही केल्या मिळत नव्हती.
किमान दिवस मोजण्यासाठी म्हणून तो आधी एका दिवसाला एक गाठ मारून ठेवी, नंतर नंतर त्याने तेही सोडून दिले. पण अशा गाठी किती दिवस मारणार असा विचार करून त्याने फक्त पौर्णिमेच्या दिवशीच गाठी मारण्याचे ठरवले. डोक्यावरून विमाने जात होती, समोरून अनेक जहाजे जात होती. मात्र त्याला मदत करण्यास कुणीही उत्सुक नव्हते.
एकेक करत तब्बल १३३ दिवस गेले आणि एकेदिवशी एक ब्राझिलियन मासेमाऱ्याला पूँ ली दिसला आणि त्यांनी त्याला मदत केली. या मच्छीमारांच्या मदतीमुळे पूँ ली आपल्या घरी सुखरूप पोहोचला. पण या दिवसांत त्याने जे अनुभव घेतले होते त्यांनी त्याच्या मनावर आणि शरीरावरही गहिरे घाव दिले होते. तो प्रचंड अशक्त झाला होता. त्याचे ९ किलो वजन कमी झाले होते. घरी परतल्यावर त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले. समुद्रात आजवर कुणीही इतके दिवस काढले नव्हते, म्हणून समुद्रात १३३ दिवस एकटे राहण्याचा विक्रम पूँ लीच्या नावावर नोंदवला गेला आहे. हा विक्रम तोडण्याची संधी पुन्हा कुणालाही मिळू नये अशी प्रार्थना करतो असे पूँ ली म्हणत असे.
या घटनेनंतर पूँ लीला भरपूर प्रसिद्धी मिळाली. ब्रिटिश किंग जॉर्ज सहावा याने त्याला ब्रिटिश एंपायर मेडल देऊन सन्मानित केले. ब्रिटनच्या शाही नौदलाने त्याच्या जिवंत राहण्याची ही कथा आपल्या दप्तरात नोंदवून ठेवली आहे.
दुसरे महायुद्ध सपल्यानंतर त्याने अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पण चीनी विस्थापितांचा कोटा पूर्ण झाल्याने त्याला अमेरिकन नागरिकत्व नाकारण्यात आले. परंतु त्याची ख्याती सिनेटर वॉरेन मॅग्नुसन यांच्यापर्यंत पोहोचलेली असल्याने त्याला विशेष सवलत देत अमेरिकन नागरिकत्व बहाल केले.
कठीण प्रसंग गुदरल्यावर अनेक जण संघर्ष करण्याच्या मनस्थितीतही नसतात, पण पूँ लीने आलेल्या प्रसंगाला स्वीकारत धैर्याने त्यावर मात केली. पूँ लीच्या या कथेतून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली, ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.
मेघश्री श्रेष्ठी




