बच्चन काकांच्या 'हॉरलिक्स' विकण्यावर हे आहेत लोकांचे आक्षेप !!

आमचे बच्चन काका म्हणजे सेल्समन नंबर १ !! आधी कॅडबरी विकत होते नंतर नवरत्न तेल विकत होते आणि आता तर हाताशी मिळेल ते प्रोडक्ट विकून मोकळे होतात. अधूनमधून काही सरकारी योजनांसाठीपण काम करतात. पण यावेळी त्यांची ‘पोषण अभियानाची’ जाहिरात त्यांच्या अंगलट येतेय असं दिसतंय.
हॉरलिक्स एक नवीन अभियान घेऊन येत आहे. या अभियानाचं नाव आहे ‘पोषण अभियान’. भारतातील कुपोषण मिटवण्यासाठी ह्या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी हॉरलिक्सने ब्रॅड अँम्बसिडर म्हणून आपल्या बच्चन काकांना निवडलंय. बच्चन काका सुद्धा मोठ्या दिमाखात ट्विटरवर या अभियानाची जाहिरात करताना दिसतायत. पण यावेळी जनता जनार्दन खुश नाही झाली भाऊ. कुपोषितांच्या विषय असला तरी हॉरलिक्स सारख्या ब्रँडची जाहिरात केल्याबद्दल लोक बच्चन काकांवर नाराज आहेत.
T 2823 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) May 31, 2018
भारत का सबसे बड़ा पोषण अभियान #MissionPoshan जल्द आ रहा है @CNNnews18 @firstpost @CNBCTV18News @News18India पर. मिशन पोषण, भविष्य रोशन @Network18Group @Horlicks_india @Manekagandhibjp @MinistryWCD @NITIAayog @amitabhk87 @narendramodi pic.twitter.com/wZzTniyaQ5
त्याचं काय आहे ना, हॉरलिक्सवर अनेक आक्षेप घेण्यात येत आहेत. तसं हे काही नवीन नाही पण अमिताभ बच्चन सारख्या बड्या स्टारने त्याची जाहिरात करावी हे काही पटत नाही ब्वा.
मंडळी, हॉरलिक्सच्या जाहिरात करण्यात येणारे दावे सपशेल खोटे आहेत हे सिद्ध झालं आहे. याबद्दल पुढील मुद्दे महत्वाचे ठरतील :
१. हॉरलिक्सचा दावा असतो की हॉरलिक्स पिण्याने मुलांची उंची वाढते, त्यांची शक्ती वाढते आणि मुलं तल्लख बुद्धीची (Taller, Stronger And Sharper) होतात. पण खुद्द हॉरलिक्सकडेच याबद्दल कोणताही भक्कम पुरावा नाही. एवढंच काय FSSAI ने सुद्धा त्यांच्या या दाव्यांना रद्दबातल केलं आहे.
२. जवळपास २,००,००० वर्षांपासून मानव या पृथ्वीवर आहे. प्रगत मानव म्हणजे होमोसेपिअन्स बद्दल बोलायचं झालं तर होमोसेपिअन्स गेल्या ६००० वर्षापासून अस्तित्वात आहेत. भाऊ या ६००० वर्षांमध्ये हॉरलिक्स अस्तित्वात नसूनही मानव जिवंत कसा राहिला ? मुळात ‘हॉरलिक्समुळेच’ तुम्हाला पोषण मिळतं हा दवाच खोटा ठरतो.
३. मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ होण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे नियमित व सकस आहार आणि चांगला व्यायाम. मुलांची परिपूर्ण वाढ होण्यास आहार ७०% तर व्यायाम २-२५% मदत करतं. उरलेलं पोषण देण्याचं काम हॉरलिक्स किंवा तत्सम ड्रिंक्स देतात. याचाच अर्थ हॉरलिक्स फक्त आहाराला पूरक (Food Suppliment) असं घटक आहे.
हीच गोष्ट बुस्ट, बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन इत्यादी प्रोडक्ट्सनापण लागू होते.
मंडळी, हॉरलिक्सच्या खोट्या जाहिराती अनेक वर्षांपासून लोकांची दिशाभूल करत आहेत. जर बच्चन काकांसारखे बडे स्टार्स हॉरलिक्सची जाहिरात करू लागले तर या खोट्या माहितीमुळे हॉरलिक्स घेणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढू शकते असं लोक म्हणत आहेत. बच्चन काकांनी २०१४ साली शरीरास घातक असल्याच्या कारणावरून पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला होता तसाच नकार त्यांनी हॉरलिक्सच्या बाबतीत का नाही दिला राव ? असो.
मंडळी, बच्चन काकांनी आता बोलबच्चन कमी करून हाताला येईल ते विकणं बंद करायला हवं नाही का ? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा !!