हिरव्या रंगाची उल्का ज्वालामुखीमध्ये पडतानाच्या परफेक्ट फोटोची कथा!!

सिनेमात हिरो-हिरॉईन तुटणारा तारा म्हणजेच उल्का पडताना काहीतरी इच्छा व्यक्त करतात आणि त्या पूर्णही होतात. काही सिनेमांत तर पाऊस पडल्यासारख्या उल्का पडत असतात, पण प्रत्यक्षात आयुष्यभरात हाताच्या बोटांवर मोजाव्यात इतक्याच उल्का आपल्याला दिसत असतील. 

काही असो,  उल्का पडताना तिच्याकडे आपली इच्छा व्यक्त केली नाही असं कोणीही नसेल.  ही उल्का इतक्या वेगात कोसळते की इच्छा बोलेपर्यंत ती दिसेनाशीही होते, मग तिचा फोटो काढणं वगैरे तर दूरच राह्यलं. पण एका भावाने उल्का कोसळतानाचा फोटो काढला आहे. त्याने काढलेला फोटो निव्वळ अफाट आहे. हा फोटो नेटकऱ्यांना प्रचंड भुरळ घालत आहे. गुनर्तो सॉंग म्हणून एक हौशी फोटोग्राफर आहे. हा भाऊ चांगल्या क्षणांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करून इन्स्टाग्रामवर अपलोड करत असतो.

या गुनर्तो सॉंगने इंडोनेशिया येथे एका ज्वालामुखीच्या दिशेने झेपावणारा तारा असा फोटो बरोबर योग्य वेळी टिपला आणि जो फोटो आला तो बघून फोटो म्हणावा तर हाच अशीच प्रतिक्रिया लोकांची उमटली. हा फोटो त्याने मेजलेंग आणि स्लेमन परिसरातील बटू एलिअन या जागी घेतला आणि हा क्षण अमर केला. 

सॉंग सांगतो आपण आकाशाकडे बघत असताना अचानक त्याला कोसळणारी उल्का दिसली आणि सेकंदाही विलंब न करता त्याने फोटो घेतला. हौशी असला तरी साँगचा कॅमेरात लेटेस्ट फीचर्स आहेत आणि त्यांच्या साहाय्यानेच त्याला हा सुरेख फोटो घेता आला आहे. नाहीतर इतक्या दूरवरचे आणि वेगवान फोटो इतक्या सुस्पष्टतेने काढणे हे अवघड प्रकरण आहे. 

हा नजारा पाहून कुणालाही असे वाटेल की हा व्हिएफएक्सच्या मदतीने एखाद्या मार्व्हलच्या सिनेमासाठी तयार केलेला हा प्रसंग आहे. पण तो खरा आहे हेच त्याच्या  अफलातून असण्याचे गमक आहे. 

सबस्क्राईब करा

* indicates required