computer

जगात फक्त ४३ लोकांचा रक्तगट- गोल्डन ब्लड!! नक्की कशामुळे हा सर्वात दुर्मिळ रक्तगट बनला आहे?

नुकतंच शास्त्रज्ञांना गोल्डन ब्लड नावाचा एक नवीन रक्तगट सापडला आहे. एवढ्या वर्षांच्या संशोधनानंतरही माणसाच्या संशोधनातून हा रक्तगट कसा काय दुर्लक्षित राहिला असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, पण हे खरंच घडलं आहे.

त्याचं झालं असं की, ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी भागातून एक बाई डॉक्टरांकडे आली. तिची बाळे जगत नसत. या बाईचे रक्त डॉक्टरांनी तपासले केले, तर त्या रक्ताच्या पेशींवर आर एच प्रथिनांच्या ६१ प्रथिनांमधले एकही प्रथिन नव्हते. या रक्त गटाला आर एच नल (Rh null) असे नाव दिले.

जगभरात ह्या रक्तगटाचे फक्त ४३ लोक सापडले आहेत. त्यामुळेच की काय त्याला गोल्डन ब्लड नाव देण्यात आले आहे. हा रक्तगट दुर्मिळ असल्याने त्याचं जसं वेगळेपण आहे तसंच त्याच्यामुळे काही समस्याही उद्भवत आहेत.  हे लोक एकमेकांपासून लांब राहत असल्याने त्यांचे रक्त एकमेकांना देण्यासाठी त्या रक्ताच्या पिशव्यांना बराच प्रवास करावा लागेल. रक्त गट बॉम्बे ब्लड सारखा एक दुर्मिळ रक्त गट आहे.

पुढे वाचण्यापूर्वी ६१ प्रथिनं, रक्त गट आणि मुळातच रक्ताबद्दलची काही मुलभूत माहिती जाणून घेऊया.

रक्त ही आपल्या शरीरात द्रव ऊती म्हणून काम करते. ऑक्सिजन नेणे आणणे, बाहेरचे काही शरीरात आले असेल तर प्रतिकार करणे अशी कामे रक्त करते. आपल्याला माहीत आहेच की, रक्ताचे मुख्य चार प्रकार आहेत. ए, बी आणि एबी आणि ओ.

त्याचे असे झाले की १६२८ साली विल्यम हार्वे नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा एका प्राण्याचे रक्त दुसऱ्या प्राण्यात दिले जाऊ शकते, हा सिद्धांत मांडला.

रिचर्ड लॉवर नावाच्या शास्त्रज्ञाने त्या दृष्टीने प्रयत्न करून पाहिले. मेंढीचे रक्त माणसांच्या रक्तवाहिन्यांत टाकण्याचे प्रयोग तो करत असे. पण असे केल्याने त्या माणसाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊन तो माणूस मरत असे.

(रिचर्ड लॉवर)

त्यानंतर दीडशे ते दोनशे वर्षांनी १८१८ मध्ये परत माणसाचे रक्त दुसऱ्या माणसाला देण्याचे प्रयोग जेम्स ब्लंदेल याने सुरू केले. जेम्स ब्लंदेल एक गायनेकोलोजिस्ट होता. तो बायकांची बाळंतपणे करत असे. बाळंपणानंतर रक्त जाण्याने बायकांचे मृत्यू होत असत. ते बघून त्याने या बायकांना त्यांच्या नातेवाईकांचे रक्त देण्याचे प्रयोग करून पाहिले. बऱ्याच वेळा ते प्रयोग यशस्वी होत असत. बरेच प्रयोग फसतही.

त्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्त देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या उपकरणांचा शोध लावला. कार्ल लॅण्डस्टेनर नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला.

त्याने ब्लड ट्रान्स्फ्युजनच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०१ मध्ये त्यानेच हे ए, बी, एबी आणि ओ रक्त गट शोधून काढले. यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले आणि ज्यांना रक्त दिले गेले आहे, त्यांच्या जगण्याच्या शक्यता वाढल्या. तरीसुद्धा मृत्यूचे प्रमाण बरेच होते.

(कार्ल लॅण्डस्टेनर)

1937 मध्ये काही संशोधन करताना कार्ल लॅण्डस्टेनर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अमेरिकेतल्या ऱ्हिसस माकडांमध्ये त्यांच्या रक्तासोबत अजून एक फॅक्टर असतो असे लक्षात आले. ऱ्हिसस माकडांच्या नावावरून त्या फॅक्टरला आर एच फॅक्टर असे म्हणतात.

आर एच फॅक्टर हा एक ६१ प्रथिनांचा समूह असतो. तो प्रत्येक रक्तपेशीवर दिसून येतो. पण काही दुर्मिळ लोकांमध्ये या 61 प्रथिनांपैकी Rh D हे एक प्रथिन दिसून येत नाही. त्यामुळे रक्ताचे अजून वर्गीकरण झाले आर एच पॉझिटिव्ह आणि ज्या माणसांमध्ये आर एच फॅक्टर नाहीये ते आर एच निगेटिव्ह..

मग त्यालाच आपण ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह असे आणि ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह  एबी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह म्हणायला सुरुवात केली.

काही बायका ह्या आर एच निगेटिव्ह असतात. अश्या बायका गरोदर असल्या आणि त्यांच्या पोटातले बाळ आर एच पॉझिटिव्ह असेल तर नाळेच्या माध्यमातून रक्ताची देवाणघेवाण होण्याची शक्यता असते. असे झाले तर आईचे आणि बाळाचे दोघांचे रक्त वेगळे असल्याने बाळ दगावण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून आईला अँटी आर एच डी नावाचे इंजेक्शन दिले जाते.

तर ही होती रक्ताबद्दलची महत्त्वाची माहिती. आता तुमच्या लक्षात येईलच की हा नवन रक्तगट किती महत्त्वाचा आहे. आधीच आर एच निगेटिव्ह रक्त गट असणारे लोक दुर्मिळ रक्त गटाचे आहेत. त्यात बॉम्बे ब्लड आणि गोल्डन ब्लड या दोघांची भर पडली आहे. परंतु बहुसंख्य जनतेला त्यांचे रक्त योग्य त्या चाचण्या करून एकमेकांना देता येते.

तसेच लाल रक्त पेशी वगळून रक्ताचे उरलेले द्रव तसेच प्लेटलेट या सुद्धा रुग्णाला देता येतात.रक्ताचा पांढरा द्रव अर्थात प्लास्मा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात आले होते. रक्तपेढीत रक्त जुने झाले की त्यातून रक्त पेशी वेगळ्या काढूनही प्लास्मा मिळवता येतो. नुसता प्लास्मा देऊनही रुग्णाचे प्राण वाचवता येतात.

परंतु काही लोकांचा रुग्णाला असे वाहिन्यांतून रक्त देण्यास विरोध असतो. त्यामुळे डॉक्टरांना कधी कधी रुग्णाला वाचवणे खूप जिकिरीचे होऊन जाते.

तर आपल्या शरीरातील रक्तात एवढ्या गोष्टी सामावलेल्या  असतात. माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

लेखिका: क्षमा कुलकर्णी

 

आणखी वाचा:

'ओ' नाही, तर जगात १० लाख लोकांमध्ये फक्त चारच लोकांचा असणारा हा रक्तगट आहे युनिव्हर्सल डोनर !!

सबस्क्राईब करा

* indicates required