computer

आता रिक्षावाला वाट बघत नाही,शेअरचे भाव बघतोय !!

सध्या भारतात शेअर मार्केटबद्दल जागृती वाढतेय. एकेकाळी फक्त श्रीमंत आणि ज्यांना फायनान्सबद्दल चांगली माहिती आहे अशा लोकांचे काम म्हणजे शेअर मार्केट असे समजले जात असे. पण आता अगदी कॉलेजात जाणारी मुलंही ट्रेडिंग करतात.

इंटरनेटमुळे शेअर मार्केटबद्दल अनेक गैरसमज लोकांचे दूर होत आहेत. त्यामुळे देखील अनेकांना यात गुंतवणूक करणे धोक्याचे वाटत नाही. हे सगळे ठीक असले तरी एखादा रिक्षाचालक शेअर्समध्ये गुंतवणूक करेल याबद्दल कुणाला खरे वाटणार नाही.

पण ट्वीटरवर आर्थिक गोष्टींचे तज्ञ असलेले दिनेश साइराम यांनी ट्विट केलेला एक फोटो बघितला तर तुम्हाला खरोखर 'मेरा देश बदल रहा है' अशी भावना येईल. त्यांनी ट्विट केलेल्या फोटोत एक रिक्षाचालक रिक्षा चालवत असताना शेअर मार्केटचे अपडेट बघत आहे. या फोटोत हा रिक्षावाला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे शेअर्र चेक करताना दिसत आहे.

दिनेश यात म्हणतात की, नियमित पगार न मिळणारी एखादी व्यक्ती शेअर मार्केट पाहात आहे, ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे. शेअर मार्केट समजण्यासाठी इंग्लिश किंवा फायनान्सबद्दल खूप माहिती असायला हवी हा गैरसमज पण या निमित्ताने दूर होत आहे.

असे पहिल्यांदा झाले असेही नाही. याआधी तर एका रिक्षात चक्क "आम्ही क्रिप्टोकरन्सीचा स्वीकार करतो" असे स्टिकर लावले होते. या गोष्टी म्हणजे मोठ्या उद्योगपती किंवा अतिहुशार लोकांचे काम असे समजले जायचे. पण या गोष्टी अगदी सामान्य लोकांच्या आवाक्यात आता आल्या आहेत. यामुळे देश किती वेगाने आधुनिक होत आहे, हे देखील स्पष्ट होत आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required