गुंतवणूक स्पेशल : शेअर बाजारात खरेदी करण्यापूर्वी हे 'गोल्डन रुल्स' नक्की लक्षात ठेवा !!

गेल्या आठवड्यात शेअर ब्रोकर कसा निवडावा हे आपण बघीतले. आता डीमॅट आणि ट्रेडींग अकाउंट उघडून शेअर बाजारात खरेदी विक्री करण्यापूर्वी काही महत्वाचे आणि अंमलात आणलेच पाहीजेत असे स्वघोषीत नियम पाळण्याचा संकल्प करू या !
१)
अ : ट्रेडींग खाते आहे आणि हातात रोख रक्कम आहे म्हणून रोज खरेदी विक्री करावी असे नाही.
ब: जास्त उलाढाल म्हणजे जास्त नफा असे नाही.
क: बाजारात केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत हजर राहणे सुध्दा बाजारात असण्यासारखे आहे. क्रिकेटच्या खेळात फलंदाज प्रत्येक बॉलवर रन काढतोच असे नाही. काही बॉल फक्त तटवायचे असतात, काही बॉलवर किरकोळ धावा काढायच्या असतात. योग्य संधी मिळताच काही बॉल सिमापार करायचे असतात.. तर काही वेळा पिचवर टिकून उभे राहणे हाच खेळ असतो.
२)
अ: काही गुंतवणूकदारांची पैसे गुंतवल्यानंतर वर्षभर थांबण्याची तयारी आणि कुवत असेल तर काही गुंतवणूकदारांचा धीर तीन महीन्यात संपेल. म्हणून खरेदी करण्यापूर्वी गुंतवणूकीचा कालावधी नक्की करावा.
ब:हा कालावधी निश्चीत केल्यावर नफ्याचे अपेक्षीत प्रमाण टक्केवारीतच ठरवावे.
क : ही टक्केवारी कालावधीच्या आधीच मिळत असेल तर विक्री करून नफा जमा करावा.कालच्या पेक्षा आजचा दिवस बरा असेल या भ्रमात जमा झालेला नफा काहीवेळा अनपेक्षीतरित्या वाया जातो.
३)
अ) शेअर ब्रोकर सोनारासारखा असतो .सोनाराला दुकानात एका वेळी पाच लाख ख्रेदी करणार्या बायकांपेक्षा दरवर्षी एक लाखाचे दागीने मोडून नवीन दागीने करणार्या बायका जास्त आवडतात .कारण स्पष्टच आहे .सोनाराची कमाई सोन्यात नसते. त्याची कमाई घडणावळीत असते. त्याचप्रमाणे शेअर दलाल असतात.त्याची कमाई असते दलालीत .तुमच्या नफ्या तोट्यात नाही. एकाच वेळी पन्नास लाखाचे शेअर घेऊन पाच वर्षे काही न करणार्या ग्राहकापेक्षा रोज दहा विस हजाराची उलाढाल करणारा ग्राहक त्याला जास्त प्रिय असतो. त्यामुळे दलालीच्या बाबतीत घासाघीस करू नये.
ब) महत्वाची सूचना. दलालाशी संबंध मैत्रीपूर्ण असावेत पण सलगीचे नसावेत. आपल्या खात्यात लुडबूड करण्याचा अधीकार त्याला देऊ नये. गेल्या काही वर्षात उलाढाल इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी कस्टमर रीलेशन मॅनेजरची नेमणूक केलेली असते. या प्राण्यापासून तर फारच जपून रहावे. दलालीची उद्दीष्टे पार करण्यासाठी हा दिवसातून दहा वेळा वेगवेगळी बातमी तुमच्यापर्यंत आणत असतो. या सगळ्या बातम्या देण्याचे कारण एकच. ग्राहकाला जास्तीत जास्त खरेदी -विक्री करायला लावून जास्तीत जास्त दलाली कमावायची . त्याच्या कमाईच्या नादात बर्याच वेळा ग्राहकाचे भांडवल संपून जाते. अशी बरीच ब्रोकरेज हाऊस आहेत जेथे ग्राहकाच्या ट्रेडींग खात्याचे आयुष्य सात आठ महीनेच असते.या दरम्यान ग्राहकाचे भांडवल संपते.
तात्पर्य 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे'.
आणखी वाचा :
गुंतवणूक स्पेशल : असे टाका शेअर बाजारात पहिलं पाऊल!
गुंतवणूक स्पेशल : तुमचा ब्रोकर कसा निवडाल? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या!!