computer

लहान मुलांना बाइकवर घेऊन जात आहात? हे नियम आता अधिक कडक झाले आहेत.

अनेकदा आपण पाहतो की पालक लहान मुलांना बाईक किंवा स्कूटर्सवर नेताना योग्य ती काळजी घेत नाहीत. प्रवास करताना मुलांना झोप येते किंवा नीट बसता न आल्यानं अपघाताची शक्यता वाढू शकते. मुलांना दुचाकीवरुन नेताना वाहतूक नियमांचेही सर्रासपणे उल्लंघन होतं. दुचाकीवर पाच-सहा जणांनी बसणं तर भारतात काही नवं नाहीय. बरेच महाभाग लहान मुलांच्या हातात गाड्या देतात. या सगळ्या कारणांमुळे सरकारनं याबाबत कठोर पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. नियमाप्रमाणे काळजी न घेतल्यास किंवा विनासुरक्षा मुलांना नेणे हा आता गुन्हा ठरू शकतो.

याचे नियम आधीपासूनच आहेत, पण आता त्यात अजून सुधारणा करण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही सुधारणा मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ च्या संदर्भात आहे. या कलमात म्हणल्याप्रमाणे चार वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेची तरतूद होऊ शकते. यात ४ वर्षापर्यंतच्या मुलांना दुचाकीवरुन नेताना बाईकचा स्पीड नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ४ वर्षापर्यंतच्या मुलाला घेऊन बाईकवरुन प्रवास करत असाल तर दुचाकीचा वेग ४० किमी. प्रति तासापेक्षा अधिक असू नये.

९ महिन्यापासून ४ वर्षापर्यंत लहान मुलांना प्रवासावेळी क्रॅश हेल्मेट वापरायला हवे. लहान मुलांच्या डोक्यात व्यवस्थित फिट बसेल असं हेल्मेट हवे. तसेच ते ISI प्रमाणित असावं.वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असायला हवे. तसेच ४ वर्षापेक्षा कमी मुलांना दुचाकीवर बसवताना वाहन चालकासोबत चिटकून बसण्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करावा. सेफ्टी हार्नेस म्हणजे चालकाने घालायचा एक सुरक्षक पट्टा असतो. त्यात लहान मुलांना अश्या प्रकारे बसवायचे की त्यामुळे लहान मुलाच्या शरीराचा पुढील भाग सुरक्षितपणे चालकाच्या पाठीमागे चिकटलेला असेल. त्यामुळे मुलांना नेताना त्यांचा तोल जाणार नाही. सेफ्टी हार्नेसही लहान मोठ्या आकारानुसार
एडजस्टेबल करता येतील.

संरक्षक उपकरणे ही वजनाने हलकी असावीत शिवाय हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेली असावीत ज्यामध्ये मजबूत फोम असेल. सुरक्षा उपकरण इतकं मजबूत असावं की, ३० किलोपर्यंतचं वजन सहज पेलू शकेल.

या मसुद्याच्या नियमाबाबत कोणाला काही सूचना किंवा आक्षेप असल्यास ईमेलद्वारे कळवता येईल, असे परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required