computer

किडनी स्टोन: लक्षणे, उपचार, कारणे आणि प्रकार.. उडवून लावण्याचा आजार नाही हा..

किडनी स्टोन्स या नावावरूनच हा विकार काय आहे हे लक्षात येते. किडनी स्टोन्स म्हणजे किडनीत होणारे खडे. प्रत्यक्षात हे खडे म्हणजे खनिजे आणि क्षार एकमेकांना चिकटून तयार होणारे स्फटिक असतात. त्यांचा आकार सहसा मक्याच्या दाण्याएवढा असतो. किडनी स्टोन्स किडनीव्यतिरिक्त मूत्रविसर्जन संस्थेतील इतर अवयवांमध्येही आढळून येतात आणि त्यांचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असते. बहुतेक वेळा लघवी गरजेपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे म्हणजेच लघवीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किडनी स्टोन्स होतात. विशिष्ट प्रकारचा आहार, गरजेपेक्षा जास्त वजन, काही शारीरिक विकार, एखाद्या विशिष्ट रोगावर घेतली जाणारी औषधे, तसेच सप्लीमेंट्स ही किडनी स्टोन्स होण्यामागची मुख्य कारणे आहेत. ओटीपोटात जाणवणाऱ्या तीव्र वेदना हे या विकाराचे मुख्य लक्षण आहे. निदान वेळेवर झाले तर त्यामुळे शरीराची फारशी हानी होत नाही. अनेकदा फार काही न करता केवळ वेदनाशामके घेऊन आणि भरपूर पाणी पिऊन यावर नियंत्रण मिळवता येते. जास्त पाणी प्यायल्यामुळे बरेचदा किडनी स्टोन्स आपोआप शरीराबाहेर टाकले जातात. वेदनाशामक औषधे स्टोन्समुळे होणाऱ्या वेदना कमी करतात. मात्र नेहमीच हा उपाय लागू होत नाही. कधीकधी हे खडे मूत्रमार्गात अडथळा निर्माण करतात किंवा कधीकधी युरीन इन्फेक्शनशी संबंधित असतात आणि त्यांच्यामुळे इतर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी शस्त्रक्रियेचाच पर्याय उरतो.

किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट, सोनोग्राफी व सिटी स्कॅन, तसेच प्रत्यक्ष स्टोनची प्रयोगशाळेतील तपासणी या चाचण्या करतात. गर्भवती स्त्रियांना मात्र बाळाला रेडिएशनमुळे इजा होऊ नये यासाठी पहिल्या तिमाहीत सिटी स्कॅनऐवजी अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला जातो. दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत कमी तीव्रतेचा सिटी स्कॅन करता येतो.

किडनी स्टोनमुळे बरेचदा वेदना होत नाहीत. विशेषतः जोपर्यंत हे स्फटिक एका जागी स्थिर असतात किंवा किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवी वाहून येणाऱ्या नलिका म्हणजेच युरेटरमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामुळे त्रास जाणवत नाही. मात्र जर किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात. अशावेळी रुग्णाला पुढील लक्षणे जाणवतात:
- छातीच्या बरगड्यांच्या खालच्या बाजूला पाठीमागे आणि दोन्ही बाजूंना तीव्र वेदना
- ओटीपोटात आणि जननेंद्रियांजवळ निर्माण होणाऱ्या वेदना
- लहरींच्या स्वरूपात निर्माण होणाऱ्या आणि कमीजास्त तीव्रतेच्या वेदना
- मूत्रविसर्जन करताना होणाऱ्या वेदना किंवा जळजळ

याच्या जोडीला इतरही काही लक्षणे आढळून येतात:
- लघवी चा रंग गुलाबीसर लाल किंवा तपकिरी असणे
- लघवी ला उग्र वास येणे
- सतत मूत्रविसर्जन करण्याची गरज वाटत रहाणे
- एका वेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे
- उलट्या व मळमळ
- जर जंतुसंसर्ग असेल तर थंडी व ताप

किडनी स्टोन मुळे निर्माण होणाऱ्या वेदनांची तीव्रता तसेच जागा बदलत राहते. हे सहसा जेव्हा किडनी स्टोन मूत्रमार्गात इकडून तिकडे फिरतो त्यावेळी आढळून येते.

किडनी स्टोन होण्यामागे एक असे निश्चित कारण नाही, तर विविध घटक आहेत. जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्झलेट, युरिक ॲसिड अशा स्फटिक तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण जास्त असते आणि पाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते, त्यावेळी किडनी स्टोन्स तयार होतात. त्याचवेळी लघवीमध्ये हे स्फटिक एकमेकांना चिकटण्यास प्रतिबंध करणारे घटक नसतील तर किडनी स्टोन तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.

किडनी स्टोनचे प्रकार

कॅल्शियम स्टोन
बहुतेक किडनी स्टोन्स कॅल्शियम स्टोन्स असतात आणि ते कॅल्शियम ऑक्झलेट या पदार्थाच्या रूपात असतात. ऑक्झलेटची निर्मिती लिव्हरकडून केली जाते किंवा ते थेट आहारामधून शोषले जाते. काही विशिष्ट फळे व भाज्या, सुकामेवा, चॉकलेट यामध्ये ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असते. तसेच व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात घेणे, इंटेस्टीनल बायपास सर्जरी, काही प्रकारच्या मेटाबॉलिक डिसॉर्डर्स यांमुळे लघवीमधील कॅल्शियम ऑक्झलेटचे प्रमाण वाढते.

स्ट्रुव्हाइट स्टोन्स

हे खडे मूत्रमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास तयार होतात. हे खडे आकाराने भराभर वाढतात, आणि जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा युरीन स्टोनची लक्षणे जाणवू लागतात.

युरीक ॲसिड स्टोन्स

हगवण, अन्नाचे अयोग्य पद्धतीने शोषण यामुळे ज्या रुग्णांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असते किंवा ज्यांच्या रोजच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असते त्यांना, तसेच डायबिटीससारख्या विकाराने ग्रस्त असलेल्यांना युरीक ॲसिड स्टोनचा त्रास जाणवतो. यामध्ये काही प्रमाणात अनुवंशिकतेचाही संबंध आहे.

सिस्टाईन स्टोन्स

हेच टोन्स सिस्टीन्युरिया नावाच्या अनुवंशिक विकारात आढळून येतात. यामध्ये किडन्या एक विशिष्ट प्रकारचे अमिनो आम्ल जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकतात.

रिस्क फॅक्टर्स

किडनी स्टोन होण्यामागे पुढील रिस्क फॅक्टर्स आहेत:

आनुवंशिकता किंवा कुटुंबाचा इतिहास
जर तुमच्या कुटुंबात कोणाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर तुम्हालाही हा विकार होण्याची शक्यता असते. शिवाय जर एकदा किडनी स्टोन झाला असेल तर तो पुन्हा होण्याची शक्यता असते.

डीहायड्रेशन (शरीरातले पाणी कमी होणे)

पुरेसे पाणी न प्यायल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. ज्या लोकांना जास्त प्रमाणात घाम येतो त्यांनाही हा त्रास होऊ शकतो.

आहार

ज्या आहारामध्ये प्रथिने, सोडियम आणि साखर यांचे प्रमाण जास्त असते असा आहार किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढवतो.

स्थूलत्व

स्थूलपणा किंवा वजनवाढीमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता निर्माण होते.

पचनाचे विकार आणि शस्त्रक्रिया

गॅस्ट्रिक बायपास सर्जरी, बॉवेल इन्फ्लमेटरी डिसीज आणि क्रॉनिक डायरिया यामुळे पचनक्रियेवर आणि कॅल्शियम व पाणी शोषले जाण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. यामुळे युरीनमध्ये स्फटिक तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढते.

विशिष्ट औषधे व सप्लीमेंट्स

व्हिटॅमिन सी सप्लीमेंट, कॅल्शियम युक्त अँटासिड, मायग्रेन व डिप्रेशन वर वापरली जाणारी औषधे, रेचके यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

बहुतेक सर्व विकारांप्रमाणे वेळेत उपचार हे तत्त्व किडनी स्टोनच्या बाबतीतही लागू आहे. त्यामुळे लक्षणे दिसली तर ताबडतोब उपाययोजना करा आणि स्वस्थ राहा.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required