computer

स्वप्नात येऊन बलात्कार केल्याप्रकरणी त्याने २८ वर्षे शिक्षा भोगली? काय होतं हे प्रकरण?

वर्णद्वेषाला गुलामीपासूनच्या कालखंडाची पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला गुलाम म्हणून विकलेल्या आफ्रिकन लोकांविषयी असणारा तुच्छता भाव पुढे जाऊन वर्णद्वेषात बदलला. हा वर्णद्वेष आजही संपलेला नाही. मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांची हत्या असो, की मे २०२० मध्ये गुन्हेगारीच्या संशयातून गळ्यावर गुढग्याचा दाब देऊन एका अमेरिकन पोलीस अधिकाऱ्याने केलली कृष्णवर्णीयाची हत्या असो. दोन्ही घटनांना वर्णद्वेषाची किनार असल्याचे दिसून येते. वर्णद्वेष ही समाजमनाला लागलेली कीड आहे. कातडीचा रंग हा शस्त्र होवू शकत नाहीच खरंतर, पण त्याचा शस्त्रासारखा वापर करून वर्णद्वेषाला खतपाणी घातले जाते. अशीच एक अन्यायकारक घटना क्लेरेन्स मोझेस-एल याच्या सोबत घडली. जो गुन्हा त्याने केलाच नव्हता त्या गुन्ह्यासाठी त्याला सलग २८ वर्षे शिक्षा भोगावी लागली. आयुष्याचा ऐन उमेदीचा काळ त्याला गमवावा लागला.

आता या घटनेची थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया.

१९८७ साल होतं. अमेरिकेच्या डेन्व्हर भागातल्या एका महिलेने तीन जणांसोबत मद्यपान केले. त्या रात्री त्या महिलेवर जीवघेणा हल्ला झाला आणि तिच्यावर बलात्कारही करण्यात आला. मेख अशी होती की, नशेत असल्या कारणाने तिला हे कोणी केलंय तेच नीट आठवेना. काही दिवसांनी तिने मोझेस-एल यानेच आपल्यावर हल्ला केला असल्याची जबानी दिली. याला आधार म्हणून तिने सांगितलं की, ‘मोझेस-एलचा चेहरा मला स्वप्नात दिसलेला, त्यानेच माझ्यावर हल्ला केला होता.’

आश्चर्य म्हणजे या जबाबाला गृहीत धरून मोझेस यांना अटकही करण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मोझेस यांनी आपण निर्दोष आहोत हे सांगत गुन्हा अमान्य केला आणि  त्याविरोधात याचिका दाखल केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. डेनेव्हर पोलिसांनी मोझेस निर्दोष आहेत की दोषी याची खातरजमा न करता सारे पुरावे, जसे की, घटनेच्या ठिकाणी सापडलेले डीएनएचे पुरावे, बॉडी स्वँब, पिडीतेचे कपडे आदी सारे नष्ट केले. हे पुरावे मोझेस यांना निर्दोष सिद्ध करू शकत होते.

१९८८ साली मोझेस-एल यांना डेनेव्हर काऊंटी कोर्टाने बलात्कार आणि मारहाणीच्या गुन्ह्यावरून दोषी ठरवून ४८ वर्षांची शिक्षा ठोठावली. अनेक वर्षांनी २०१३ साली मोझेस यांना तुरुंगात एक पत्र मिळाले. जे एल सी जॅक्सन नावाच्या इसमाने हे पत्र पाठवले होते. हा एल सी जॅक्सन तोच होता ज्याने घटनेच्या दिवशी इतर तीन जणांसह पिडीत महिलेसोबत मद्यपान केले होते. जॅक्सन ने पत्रात लिहिलं होतं की, ‘माझ्या मनावर या घटनेचा खूप ताण होता आणि हे इतकी वर्षं अंधारात लपलेलं सत्य आता उजेडात येणं आवश्यक आहे. तो मीच होतो ज्याने त्या महिलेसोबत जबरदस्ती केली होती. त्याच दरम्यान मला राग अनावर झाल्याने मी त्या महिलेला मारहाण देखील केली होती.’ जॅक्सनचा हा जबाब ग्राह्य धरून २०१५ मध्ये मोझेस यांची तुरूंगातून सुटका केली गेली व त्यांना याचिका नव्याने दाखल करण्याचीही परवानगी देण्यात आली.

"डीएनए पुरावे नष्ट करणे ही या केसमधील सर्वात चुकीची गोष्ट ठरली. मला मोझेस-एल व त्या़ंच्या कुटूंबियांना झालेल्या वेदनेची कल्पना आहे. मी त्यांचा हा काळ किती कठीण होता हे समजू शकतो." या शब्दांत डेनेव्हर प्रांताचे अँटर्नी जनरल वायझर यांनी आपले मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की "आम्ही त्यांचे गजाआडचे आयुष्य परत देऊ शकत नाही, परंतू त्यांची आर्थिक नुकसानभरपाई नक्कीच देऊ शकतो." वायझर यांनी २ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ १५ कोटी रुपये एवढी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

डेनेव्हर कोर्टातून जेव्हा मोझेस निर्दोष असल्याच्या शिक्क्यासह बाहेर पडले तेव्हा ते शांत होते. "हाच तो क्षण ज्याच्यासाठी मी आजवर लढा दिला. केवळ स्वप्नाच्या आधारे एखाद्याला दोषी ठरवणे हे अन्यायकारक आहे. पण मी शांत आहे. मला माझ्या कुटू़ंबाजवळ परतायचे आहे. माझ्या नातवंडांसोबत उरलेले आयुष्य व्यतीत करायचे आहे." या शब्दात मोझेस-एल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज त्याचं वय ६० आहे. पण दुर्दैवाने मोझेस यांचा लढा इथेच संपला नाही. जाहीर झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठीही मोझेस यांना न्यायालयीन लढा द्यावा लागला.

केवळ कृष्णवर्णीय असल्याची किंमत म्हणून मोझेस यांना आपल्या आयुष्याची २८ वर्षे गजाआड घालवावी लागली. वर्णद्वेषाच्या या विषवल्लीला समूळ उपटून टाकल्याशिवाय हे अन्यायसत्र संपणार नाही. तोवर असे अनेक मोझेस गुन्हेगार ठरत राहणार हेच खरे..

 

लेखिका: मानसी चिटणीस

सबस्क्राईब करा

* indicates required