computer

वयाच्या १७ व्या वर्षी २००० रुपयांपासून सुरुवात करून १०० कोटींचा मालक झालेला हा मुलगा आहे तरी कोण ?

“इतने सारे पैसे इकट्ठा देखे है कभी?”
“क्या करेंगे इतनी सारी धनराशीका?”
‘कौन बनेगा करोडपती?’ हा गेम शो भक्तिभावाने बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात विचारलेला हा प्रश्न नवीन नाही.
या माणसाचे वलय आणि आवाजाचं गारुड असं की हे प्रश्न दुसऱ्या कोणी विचारले असते तर ऐकणाराने सरळ उत्तर दिलं असतं याची शाश्वती देता येत नाही. पहिल्या प्रश्नात ‘इतके’ पैसे एकत्र नक्कीच बघितले नसणार ही त्याच्या मध्यमवर्गीय कुवतीची खात्री आहे आणि दुसऱ्या प्रश्नात भोचकपणा आहे. म्हणजे घराशेजारच्या तात्या, बाबू नाहीतर आण्णाने विचारला तर आपलं उत्तर, "तुला काय करायचं ? मी काहीपण करेन", असं असू शकतं. शिवाय हा बाबा आपल्याला आता उसने पैसे मागणार ही पण शंका येऊ शकते आपल्याला. पण समोर प्रत्यक्ष फिल्म इंडस्ट्रीचा देव बसलेला असताना असा सर्टिफाइड बाणेदारपणा कोणी नाहीच दाखवू शकत. उलट अधिकाधिक नम्र होत तो ते पैसे खर्च करण्याचे त्याचे प्लान्स शेअर करतो. त्या रकमेचे हिस्से पाडतो तो. एक भाग स्वप्नांसाठी, एक भाग कुटुंबाच्या जबाबदाऱ्यासाठी, एक भविष्याच्या सुरक्षिततेसाठी. आपण त्याचे टाळया वाजवून कौतुक करतो नि उद्या त्या हॉट सीटवर आपण असू असे स्वप्न बघत झोपतो.

रोज दहा तास नोकरी करुन पगाराची ठराविक रक्कम बँकेत जमा झाल्यावर त्याचा विनियोग कसा करायचा हे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांचं ठरलेलं असतं. एखादी नवी खरेदी झाल्यावर खर्चाच्या ताळमेळात थोडे उन्नीस-बीस होते, पण आपल्या पैसा खर्चण्याच्या पद्धतीत फारसा बदल होत नाही. पैसे मिळण्यासाठी आपण करत असलेले कष्ट, कष्टाच्या व्यस्त प्रमाणात मिळणारे उत्पन्न नि त्याच जाणारी महागाई यामुळे पैसा जपून वापरायची सवय लागलेल्या मध्यमवर्गीय वृत्तीला स्वप्नेसुद्धा मोठी बघवत नाहीत. श्रीमंत म्हणून ओळख मिरवायची असेल तर एकतर सोन्याचा चमचा वगैरे तोंडात घेउन जन्माला यायला हवे, किंवा तुम्ही काहीही केलं तरी त्यात यश मिळेल इतके भाग्यवान तुम्ही असायला हवे किंवा केबीसीसारख्या गेम शोजमध्ये हॉट सीटवर बसून पार्श्वभाग शेकायची संधी मिळायला हवी. हे आणि असे कैक गैरसमज आपण पाळून असतो.

लाखो लोक पैसा कमावतात आणि तो जमीन, बँक किंवा कोणत्यातरी स्कीममध्ये भविष्यकालीन तरतूद म्हणून गुंतवतात. पैसा राखून ठेवणे वेगळे आणि थोडा अधिक अभ्यास नि निरीक्षण करुन हा पैसा वाढत जाईल अशा पद्धतीने गुंतवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण गंमतीत किंवा गंभीरपणे एखाद्याला म्हणून जातो, “माझ्याकडं काय पैशाचं झाड आहे का?” खरी गोष्ट ही आहे की तुम्ही योग्य गुंतवणूक केलीत तर पैसा झाडाप्रमाणे वाढतो. इतकंच काय, त्याला फांद्याही फुटतात.

जाणून घ्यायचंय कसं?
चला भेटू या संकर्ष चंदाला. एक तेवीस वर्षे वय असलेला मुलगा. ज्या वयात आपण सर्टिफिकेट्सची भेंडोळी घेउन नोकरीच्या शोधात मुलाखती देत हिंडत असतो त्या वयात एक मुलगा लॉजिक वापरून पैसा गुंतवत स्टॉक मार्केटमधील असामान्य व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतो हे खरंच अद्वितीय आहे. लहान वयात वॉरन बफे, बेंजामिन ग्रॅहम, जॉर्ज सॉरोस, राकेश झुनझुनवाला, राधाकिशन दामाणी यांच्या पंक्तीत बसायला मिळणे ही नक्कीच साधी गोष्ट नाही. आज गूगल सर्च केलं तर संकर्ष चंदाची ‘फिनटेक स्टार्टअप सावर्ट'चा संस्थापक ही ओळख समोर येते. स्वोबोधा इनफिनिटी इन्वेस्टमेंट ॲडवायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्याची कंपनी लोकांना स्टॉक, म्युच्युअल फंड आणि बॉंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मार्गदर्शन करते. अनुभवी माणसांकड़े आपण योग्य मार्गदर्शनासाठी बघतो. इथं तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती आहे अवघी २३ वर्षे वयाची. वयाच्या १७ व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुलाला आपल्या मध्यमवर्गीय संस्कृतीत काय ऐकावं लागेल?
‘गुरं वळायला जा, चार म्हशी घेऊन देतो’.
हेच ना? कारण आपण शिक्षणाचा संबंध आतंरिक विकासाशी न जोडता अर्थार्जन करून देऊ शकणारे माध्यम म्हणून बघतो. चांगला शिकला तरच चांगल्या पगाराची नोकरी लागेल या मानसिकतेपोटी कित्येक जण चाकोरी सोडायला तयारच होत नाहीत. अशांसाठी संकर्षचा प्रवास जाणून घेणे प्रेरणादायी ठरेल.

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी गुंतवणूक क्षेत्रातील ‘बाप’ माणूस समजला जाणाऱ्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ बेंजामिन ग्रॅहम यांचा एक लेख वाचून संकर्षला शेयर मार्केटबद्दल कुतूहल निर्माण झालं. हैदराबादच्या स्लेट या शाळेतून बारावी पास झाल्यानंतर ग्रेटर नोएडाच्या बेनेट विद्यापीठात बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यानं शिक्षण सोडून दिलं आणि शेअर मार्केटकडं लक्ष वळवलं. सुरुवातीला त्यानं गुंतवलेली रक्कम होती फक्त २००० रूपये. दोन वर्षात त्यानं जवळजवळ दीड लाख गुंतवले आणि त्याचे त्याला १३ लाख मिळाले. २०१७ मध्ये स्वतःची कंपनी सुरु करण्यासाठी त्यानं ८ लाखाचे शेअर्स विकले. बाकीचे पैसे पुन्हा गुंतवले. आज या मुलाचे हैदराबाद येथे गगनमहल मध्ये २००० स्क्वेअर फूटचे ऑफिस आहे. तिथे ३५ लोक काम करतात आणि लोकांना गुंतवणूकीचे योग्य मार्गदर्शन करतात.

हे सगळं जाणून घेतल्यावर प्रश्न पडतो, यशस्वी होण्यासाठी काय लागतं माणसाला? भाग्य?
‘हा काय बाबा, लकी माणूस !’ असं म्हणून आपण संकर्षच्या बुद्धिमत्तेकडं, मेहनतीकडं दुर्लक्ष करू शकतो? लॉटरी किंवा जुगार किंवा गेम शो मधूनच पैशाचे घबाड हाती लागू शकते. नाहीतर पैसा मिळवण्यासाठी खूप झिजावं लागतं या गैरसमजाला पूर्णविराम मिळतो जेव्हा तुम्ही या तरुण मुलाचा प्रवास जाणून घेता. २००० रूपये गुंतवणारा एक १७ वर्षांचा मुलगा ते १०० कोटींचा मालक हा प्रवास खरंच सोपा असेल?

नाही.

इथपर्यंत पोह्चण्यासाठी संकर्षने भरपूर पुस्तके वाचली. माणसे वाचली. खूप निरीक्षणे केली. मध्यमवर्गीय, उच्च वर्गीय, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्व स्तरातील लोकांशी बोलला. प्रत्येकाची मानसिकता जाणून घेतली. माणसांचा माणसांशी बदलत जाणारा व्यवहार अभ्यासला. वर्तन अभ्यासले. एक लेख वाचून स्टॉक मार्केटकडं वळलेल्या संकर्षनं २०१६ मध्ये ‘फायनांशियल निर्वाणा’ नावाचं पुस्तक देखील लिहिलं. यात त्यानं व्यापार नि गुंतवणूक यातील फरकावर भाष्य केलं आहे आणि गुंतवणूक बाजार समजण्यासाठी काही उपयुक्त सल्ले दिले आहेत.

गुंतवणूक म्हणजे ‘गाजराची पुंगी, वाजली तर वाजली’ म्हणत खेळलेला जुगार नव्हे.
‘ब्याड लकच खराब लका’ म्हणत स्वतःच्या नशिबाला दोष देणं नाही. इथं अभ्यास आहे. तर्क आहे. निरीक्षण करुन घेतले गेलेले निर्णय आहेत.
क्रिकेट खेळ आपण सारेच आवडीने बघतो. बैट्समैन बदलला की तो डावखुरा आहे की उजव्या हाताने खेळतो, तो फिरकी समोर गडबडतो की फास्ट बोलरपुढं, तो चिडका आहे की संयमी हे सारं बघून त्याच्यासाठी कोणता गोलंदाज आणायचा नि फील्डिंग कशी लावायची हे कॅप्टन ठरवतो न?
आयुष्य असंच आहे.

निरिक्षण, अनुभव नि बुद्धी वापरून थोडी रिस्क घ्यायची तयारी दाखवली तर क्षेत्र कोणतंही असो, यशश्री तुमच्या गळ्यात माळ घालायला कोणत्या तरी वळणावर उभी आहे हे लक्षात ठेवा.
मग हे शिकवणारा कोणी तुमच्यापेक्षा लहान संकर्ष असेल तरी जरुर शिका. गुरु वयाने मोठाच असायला हवा असा काही नियम नाही !!!!

राजेश्वरी कांबळे

सबस्क्राईब करा

* indicates required