computer

या पाच प्रसिद्ध कंपन्यांचा मूळ व्यवसाय काही औरच होता! काय असेल, अंदाज बांधता का?

नेहमीच मनासारखं किंवा योजल्यासारखं होतं असं नाही. सामान्य माणसासोबत असं झालं तरी ते वाईटच, मग ते बऱ्याच लोकांचा आधार असणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत झालं तर? अशावेळी काहीजण खचून जातात, पण काहीजण त्याचंही सोनं करतात. आजची गोष्ट अशाच कंपन्यांची आहे. आज या कंपन्यांकडे पाह्यलं तर सध्याच्या व्यवसायात उतरण्यापूर्वी त्या वेगळ्याच व्यवसायात होत्या हे सांगूनही पटणार नाही. अशा काही कंपन्यांची यादीच तुम्हाला देतो.

१) कोलगेट

टूथपेस्ट न मागता माणूस कोलगेट द्या म्हणतो ही झेप या कंपनीने घेतली आहे. टूथपेस्टच्या मार्केटमध्ये या कंपनीला तोड नाही. ही कंपनी १९०६ साली विल्यम कोलगेट यांनी सुरू केली होती. त्यावेळी साबण आणि अगरबत्ती विकून हे गृहस्थ आपला व्यवसाय करत होते. १८७३ मध्ये यांनी थोडा बदल केला आणि ते टूथपेस्ट विकू लागले. गियर बदलला आणि गाडीने वेग पकडला असे झाले नाही. यांनी थेट रस्ताच बदलला.

२) ॲवन

महिलांच्या आवडीची असलेली ही कंपनी ब्युटी प्रॉडक्ट्स आणि पर्सनल केअर इत्यादी गोष्टी विकते. १८८६ साली डेव्हिड मॅक्नोल यांनी ही कंपनी पुस्तके विकण्यासाठी सुरू केली होती. घरोघरी जाऊन ते पुस्तके विकत. पुस्तके विकली जावीत म्हणून ते नंतर पुस्तकांसोबत परफ्यूमही देऊ लागले. आता त्यांना एक गोष्ट लक्षात येऊ लागली. लोकांना पुस्तकांपेक्षा परफ्यूममध्ये अधिक इंटरेस्ट आहे. पुस्तकांचा धंदा गुंडाळून ठेवत त्यांनी मग परफ्यूम बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आणि अशा पद्धतीने आजच्या ॲवन कंपनीत बदल झाला.

३) रीगली(wrigley )

रीगली या कंपनीचे च्युईंगम अनेकांच्या पसंतीचे असतील. या कंपनीची स्टोरी पण काहीशी ॲवनसारखीच आहे. ही कंपनी आधी बेकिंग सोडा विकत असे. पण विक्री वाढवण्यासाठी त्यांनी सोबत च्युईंगम विकण्यास सुरुवात केली. झाले असे की लोकांना बेकिंग सोडा नव्हे, तर च्युईंगम अधिक पसंत पडले. मग यांनीही ट्रॅक बदलला आणि च्युईंगम विकण्यास सुरुवात केली.

४) नोकिया

नोकियाची स्थापना झाली १८६५ मध्ये. त्यांनी त्याकाळी पेपर मिल सुरू केली होती. १९८६ येता येता त्यांनी मग दुसरी मिल सुरू केली होती. पण कंपनीचे मालक फ्रेडरिक ईदेस्ताम यांना मोबाईलचे भविष्य उज्वल आहे हे कळून चुकले. मग त्यांनी मोबाईल बनविण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने मग नोकियाने मोबाईलचे मार्केट ताब्यात घेतले होते.

५) सॅमसंग

नोकियाप्रमाणे सॅमसंग मोबाईल मार्केटचा बडा खिलाडी आहे. नोकियाचे दिवस भरले, पण सॅमसंगची पकड काय ढिली होत नाही. आज इलेक्ट्रॉनिक उद्योगात टॉपवर असणारी ही कंपनी मात्र कधीकाळी सुकी मासळी आणि नूडल्स विकत असे. पुढे ते मोबाईल बनवू लागले आणि आजचे त्यांचे हे साम्राज्य उभे राहिले.

अशा पद्धतीने कुठून सुरुवात करून कुठे पोचण्याचा या कंपन्यांचा इतिहास आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required