computer

हॉलिवूड चित्रपटाची कॉपी मारलेले अमीर खानचे हे ६ सुपरहिट चित्रपट!

लाल सिंग चढ्ढा हा आमीर खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचे ट्रेलर बघून लोक उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. या सिनेमा फॉरेस्ट गंप नावाच्या एका अत्यंत भारी अशा हॉलिवूड सिनेमावर बेतलेला आहे
मिस्टर परफेक्शनिस्टने हॉलिवूड सिनेमाच्या रिमेकला घातलेला हात कितपत यशस्वी होतो याबद्दल लोकांना शंका आहे. पण त्याने हॉलीवूडपटाचा रिमेक सिनेमात काम करणं काही पहिल्यांदा होत नाहीये. आपल्याला माहीत असलेले आमीरचे अनेक सिनेमे हे हॉलिवूडचे रिमेक आहेत. या निमित्ताने त्यांचीही माहिती करून घेऊया.

१) दिल है के मानता नही

दिल है के मानता नही हा महेश भटने स्वतःच्या मुलीसाठी बनविलेला सिनेमा. यात त्यांनी पूजा भट्टसोबत आमीर खानला घेतले होते. १९९१ साली आलेला दिल है के मानता नही हा १९३४ सालचा सिनेमा इट हॅपन्ड इन वन नाईट या सिनेमावर आधारित होता. इट हॅप्पन्ड इन वन नाईट या सिनेमाची भारतीय सिनेउद्योगाला थोडी जास्तच भुरळ होती असे दिसते. चोरी चोरी, नौ दो ग्यारा हे हिंदी सिनेमे यावरच आधारित आहेत तसेच बंगाली चाओ पाओ, तमिळ चंद्रोदायम आणि कढल रोजोवा तसेच कन्नड सिनेमा हुडूगता हे इट हॅपन्ड इन वन नाईट याच सिनेमावर आधारित सिनेमे आहेत.

आता दूर समुद्र ओलांडून भारतात जर इट हॅप्पन्ड इन वन नाईट इतक्या प्रमाणावर लोकांना प्रभावित करू शकतो तर स्वत: हॉलिवूड याचे रिमेक बनविल्याशिवाय राहील का? Eve Knew Her Apples हा म्युझिकल , यु कान्ट रन अवे फ्रॉम इट, रोमन हॉलीडे अशा अनेक सिनेमांमागील आधार हा इट हॅपन्ड इन वन नाईट राहिला आहे.

२) जो जीता वही सिकंदर

जो जीता वही सिकंदर हा आपल्या सर्वांचा अतिशय आवडीचा सिनेमा. आजही स्टोरीसहित जसाचा तसा अनेकांना आठवत असेल. १९९२ साली आलेला हा सिनेमा मन्सूर खानने डिरेक्ट केला होता. या अफलातून अशा या सिनेमामागे मात्र १९७९ साली आलेला हॉलीवूडचा 'ब्रेकिंग अवे' हा सिनेमा होता.

३) हम है राही प्यार के

१९९३ साली आलेला हम है राही प्यार के हा हलकाफुलका सिनेमा अनेकांच्या पसंतीस उतरला होता. आमीर खानचे या काळात आलेले अनेक सिनेमे हे सर्व वयोगटातील लोकांना आवडतील असे होते. याही सिनेमाची कथा ही १९५८ साली आलेल्या 'हाऊसबोट' या सिनेमावर आधारित होती.

४) अकेले हम अकेले तुम

आमीर खान आणि मनीषा कोईराला ही जोडी अनेकांच्या आवडीची. या जोडीचा सिनेमा अकेले हम अकेले तुम हा सिनेमा उत्कृष्ट कॉपीचा नमुना म्हणावा असा होता. कारण याची कहाणी जरी १९७९ चा सिनेमा क्रेमर vs क्रेमर यावर आधारित असली तरी याचे पोस्टर मात्र स्लीपलेस इन सिॲटल या सिनेमावरून ढापले होते. तेव्हा आजच्या सारखा सोशल मीडिया नसल्याने आमीर ट्रोल होण्यापासून वाचला असेच म्हणावे लागेल.

५) गुलाम

आमीर खानने वेगळ्या धाटणीचा रोल केल्याने गुलाम सिनेमा आणि त्यातील आमीरचे पात्र चांगलेच हिट झाले. त्यातले त्याचे डायलॉग आणि गाणी देखील चांगलीच चालली. सोबत यात राणी मूखर्जी होती. राणी म्हणजे त्याकाळी बॉलिवूडची खरोखरची राणी. पण हा आपल्याला आवडलेला भन्नाट सिनेमा पण हॉलिवूडचीच दुसरी आवृत्ती होती. हॉलिवूडमध्ये अजरामर झालेला सिनेमा 'ऑन द वॉटरफ्रंट' या १९५४ सालच्या सिनेमाची कॉपी होती.

६) मन

आमीर खान, मनीषा कोईराला आणि अनिल कपूर या तीनही लोकांच्या आवडत्या कलाकारांनी साकारलेला सिनेमा लोकांना भावुक करत असे. मनची कहाणी आणि त्यातील गाणी हे प्रेमात पडावे असेच होते. हा ही सिनेमा मात्र ऍन अफेयर टू रिमेम्बर या सिनेमाचा रिमेक होता.

तर अशा पद्धतीने आपल्याला माहीत नसलेले अनेक सिनेमे हे हॉलिवूड किंवा इतर भाषांमधील सिनेमांच्या प्रभावाखाली तयार झाले आहेत. सध्या सोशल मीडिया असल्याने लगेच पत्ता लागतो आधी मात्र तसे नव्हते.

सबस्क्राईब करा

* indicates required