computer

डेन्मार्कमध्ये दरवर्षी ८०० व्हेल्सचा बळी का देण्यात येतो?? जाणून घ्या ही काय प्रथा आहे..

मंडळी, जगात फार पूर्वीपासून बळी देण्याची प्रथा आहे. मग तो जनावरांचा बळी असो वा माणसांचा. आजही बळी देण्याची प्रथा संपलेली नाही. फरक इतकाच की आज कायद्यामुळे फक्त कोंबडी, बकरी, मेंढीचा बळी दिला जातो.

मंडळी, हे फक्त आपल्या देशात आहे का ? तर, नाही. डेन्मार्कच्या फारो बेटावर नुकताच ८०० व्हेल्सचा बळी देण्यात आला आहे. या बातमीने सगळ्या जगात एकच खळबळ उडाली आहे.

(खालील फोटोंमध्ये प्रचंड रक्तपात आहे. आपल्या जबाबदारीवर पाहा.)

काय आहे ही अघोरी प्रथा ?

या प्रथेला म्हणतात “व्हेलिंग”. व्हेलिंगचं मूळ १५८४ सालापर्यंत मागे जातं. त्याकाळातील जर्मनिक वंशाचे लोक हे व्हेल माशांची शिकार करून खायचे. त्यांच्या अन्नाचा मोठा भाग हा व्हेल माशांमधून यायचा. आज काळ बदलला आहे. फारो बेटावरच्या प्रत्येकाला व्हेल खाऊन जगण्याची आवश्यकता नाही, पण पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही टिकून आहे.

या प्रथेत एकावेळी जवळजवळ ८०० व्हेल्सना कापलं जातं. त्यासाठी काही मोजके लोक समुद्रात जातात. व्हेल मासा दिसला की त्याला घेराव घालून किनाऱ्याकडे ढकललं जातं. किनाऱ्याच्या दिशेने आल्यानंतर त्याच्या पाठीवरच्या छिद्राला हुक अडकवला जातो आणि त्याला ओढलं जातं. पुढे त्याचा गळा कापला जातो.

व्हेलिंगवर बंदी का येत नाही ?

स्थानिक लोक आणि सरकार म्हणतं की ज्या पायलट व्हेल माशाचा बळी दिला जातो तो नामशेष होण्याच्या मार्गावर नाही आणि ही प्रथा अघोरी पण नाही. याखेरीज त्यांचा असाही त्यांचा दावा आहे की हे सगळं आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अखत्यारीत केलं जातं.

मंडळी, हे बेफिकीर उत्तर झालं. कारण या समजुतीमुळे दरवर्षी १००० व्हेल्सचा बळी जातो. याच गतीने बळी जात राहिला तर पायलट व्हेल्स नामशेष व्हायला फारसा वेळ लागणार नाही.

मंडळी, प्रथा या नेहमीच समाजाची ओळख असतात, पण सगळ्याच प्रथा कवटाळून बसता येत नाहीत. आजवर व्हेलिंगच्या विरोधात सामाजिक संस्था बोलत होत्या.  पण आता लोकही बोलू लागली आहेत. सोशल मिडीयावर या घटनेने मोठं वादळ आणलंय.

बोभाटा पब्लिक, तुम्हाला काय वाटतं व्हेलिंगविषयी ?? आम्हाला नक्की सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required