computer

सर्बियन कलाकार जुन्या शस्त्रांमधून संगीत वाद्ये तयार करतोय...ही भन्नाट कल्पना एकदा बघायलाच हवी !!

समाजात नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टी काढणारे अनेक लोक दिसतात. पण सर्बियाच्या एका शिल्पकाराची गोष्टच वेगळी आहे. निकोला माक्युरा हा शिल्पकार शस्त्रांपासून चक्क वाद्ये बनवत असतो. हा अवलिया दिवसभर मिलिटरी जंकयार्डमध्ये सुरांच्या शोधात फिरत असतो. तिथे खराब झालेले रायफल तसेच इतर शस्त्रसामुग्री शोधून त्यांची पारख करतो. त्यातली काही सामग्री मग तो आपल्या स्टुडिओत घेऊन जाऊन त्यांच्यापासून संगीतातील साहित्य बनवत असतो. 

शस्त्र शेवट करण्याचे काम करतात तर संगीत नवनिर्मितीसाठी ओळखले जाते. हा ४२ वर्षीय कलाकार याच शेवट आणि नवनिर्मितीचा धागा गुंफण्याचा प्रयत्न करत असतो. हा परिसर 90 च्या दशकात झालेल्या युद्धांच्या जखमा आजही विसरू शकत नाही. त्यावर काहीतरी फुंकर घालण्याचा आपला प्रयत्न असल्याचे निकोला सांगतो.

त्याने एका M70 रायफल आणि आर्मी हेल्मेट पासून गिटार बनवली आहे तसेच एका ऑसाल्ट रायफलपासून व्हायोलिन देखील बनवली आहे. या प्रकारची अनेक वाद्ये त्याने या शस्त्रांपासून बनवली आहेत. 

निकोला सर्बियाच्या नोवी सॅड अकॅडमी ऑफ आर्टस् येथे प्राध्यापक आहे. या सर्व सामग्रीचा वापर करून पूर्ण तयार असे ऑर्केस्ट्रा तयार करण्याचे त्याचे स्वप्न आहे. हा ऑर्केस्ट्रा पूर्ण देशभर घेऊन जाण्याची देखील त्याची ईच्छा आहे. 

ज्या लोकांनी युद्धात भाग घेऊन काहीतरी संपविण्यासाठी हातभार लावला त्यांना आपण या माध्यमातून  नवनिर्मितीच्या कामात जोडले जाण्याची संधी देत आहोत असे देखील त्याचे म्हणणे आहे. 

त्याचा पुढचा प्रयोग हा एका आर्मी टॅंकला पाच संगीतकार वापरू शकतील अशा वाद्यात रूपांतरित करण्याचा आहे. टॅन्कचे वाद्यात रुपांतर झाल्यावर त्याला गुलाबी रंगात रंगवण्याचे देखील त्याने ठरवले आहे.

तुम्हाला ही भन्नाट कल्पना कशी वाटली?

सबस्क्राईब करा

* indicates required