computer

परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ४: हात तुटलेल्या अवस्थेतही शत्रूवर तुटून पडणारे मेजर सोमनाथ शर्मा!!

मेजर सोमनाथ शर्मा हे भारतातील पहिले परमवीर चक्र पदक प्राप्त सैनिक होते. देश स्वातंत्र्य झाल्याबरोबर पाकिस्तानने आपल्यासोबत संघर्ष सुरू केला. यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे सैनिक लढले त्यात मेजर शर्मा यांचे नाव आधी घ्यावे लागेल. 

सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे झाला होता. त्यांना कुटुंबातूनच सैनिकी पंरपरा लाभली होती. त्यांच्या वडिलांनी लाहोरमध्ये डॉक्टरकीची संधी सोडून भारतीय सैनिकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. 

शर्मा यांचे मामा देखील सैन्यात होते. जपानमध्ये लढताना ते शहीद झाले होते. या सर्व वातावरणात ते मोठे झाले होते. त्यांनी नैनिताल येथील शेरवूड कॉलेजमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे ते देहरादूनच्या प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल मिलिटरी कॉलेज मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 

२२ फेब्रुवारी १९४२ ला शर्मा यांनी चौथ्या कुमाऊ रेजिमेंटमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून प्रवेश केला. त्यांचा सैनिकी कार्यकाळ हाच दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू झाला होता. या काळात त्यांनी स्वतःला सिद्ध केले. 

२२ ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर आक्रमण केले त्यावेळी हॉकी खेळताना त्यांचा एक हात तुटला होता म्हणून ते दवाखान्यात भरती होते. त्यांना जेव्हा माहिती झाले की, त्यांची पलटण युद्धासाठी जात आहे, तेव्हा मला देखील सोबत न्या म्हणून त्यांनी हट्ट धरला. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की 'तुझा एक हात तुटला आहे या परिस्थितीत तू युद्ध कसा करू शकतो?' पण सोमनाथ यांनी आपला हट्ट सोडला नाही. 

३ नोव्हेंबर १९४७ रोजी मेजर शर्मा यांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बदगाम मोर्च्यावर जाण्याचे आदेश मिळाले. त्या दिवशी सूर्य उगवण्याआधी शर्मा तिथे जाऊन पोहोचले. तेवढ्यात त्यांच्या तुकडीवर शत्रू सैन्यातील ५०० सैनिकांनी हल्ला केला. शर्मा यांच्या तुकडीवर जबरदस्त गोळीबार सुरू झाला. शर्मा यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.

शर्मा यांच्या तुकडीतील अनेक सैनिक शहीद झाले होते. कमी सैनिकांमुळे त्यांची बाजू कमकुवत झाली होती. स्वता शर्मा यांच्या हाताला प्लॅस्टर होता, तरी देखील ते स्वतः मॅगजिनमध्ये गोळ्या भरून आपल्या सैनिकांना बंदूक पुरवत होते. मेजर शर्मा यांनी आपल्या सैनिकांना संदेश द्यायला सुरुवात केली. 

'शत्रू आपल्यापासून फक्त 50 पाऊल दूर आहे. आपली संख्या कमी होत आहे. आपल्यावर भयंकर गोळीबार होत आहे. मी एक इंच देखील मागे सरणार नाही, शेवटचा सैनिक जिवंत आहे तोपर्यंत मी इथेच आहे.'

तेवढ्यात एका मोटारचा निशाणा बरोबर मेजर शर्मा यांना लागला. जोरदार झालेल्या विस्फोटात भारत मातेचा हा वीर सुपुत्र शहीद झाला. पण मेजर शर्मा शहीद झाल्याने भारतीय सैनिक प्रचंड त्वेषाने लढले. शत्रूला त्यांनी खरोखर पुढे सरकू दिले नाही. 

पुढील काही दिवसांत भारतीय सैनिकांनी शत्रूला घाटी खाली ढकलले. मेजर सोमनाथ शर्मा यांना त्यांच्या या पराक्रमासाठी मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required