परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ३ : शत्रूला पाणी पाजून सियाचीन मधली पोस्ट सोडवून आणणारे बाना सिंग!!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/xdzfghxdfgdxfg.jpg?itok=18BXM8G3)
भारताला आपल्या ज्या सैनिकांचा प्रचंड अभिमान आहे अशा सैनिकांमध्ये बाना सिंग यांचा समावेश करावा लागेल. सियाचीन वाचवणारे महान योद्धा म्हणून त्यांची नोंद इतिहासात नेहमी राहील. देशप्रेमाचे ओतप्रोत भरलेला एक सैनिक देखील शत्रूंना पुरून उरु शकतो, याचे बाना सिंग हे मोठे उदाहरण आहे.
बाना सिंग यांचा जन्म जम्मू काश्मीरमध्ये एका शीख परिवारात ६ जानेवारी १९४९ रोजी झाला होता. सैन्यात भरती झाल्यावर त्यांची नियुक्ती ८ वी जम्मू काश्मीर लाईट इंफंट्रीमध्ये करण्यात आले होते. ही गोष्ट १९८७ सालातील आहे.
मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी घुसखोर सियाचीन हिमनदीत घुसले होते. या घुसखोरांना सियाचीनमधून हाकलणे सोपे नव्हते, पण गरजेचे होते. त्यांना हाकलण्यासाठी एक स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात येत होती. बाना सिंग यांनी स्वतःहून त्यात सामिल होण्याची इच्छा व्यक्त केली.
पाकिस्तानी सैनिकांनी ६४५० मीटरच्या उंचीवर सियाचीनच्या सर्वात उंच शिखरांपैकी एक असलेल्या शिखराचा ताबा मिळवला होता. त्यांची जागा मोक्याची होती. तिथून ते भारतीय पोस्टवर सहज निशाणा साधू शकत होते. खालून त्यांच्यावर हल्ला करणे हे प्रचंड कठीण काम होते.
त्यांना हाकलण्याच्या या मोहीमेला मोहिमेचे मुख्य अधिकारी राजीव पांडे यांच्या नावावरून 'ऑपरेशन राजीव' असे देण्यात आले. शत्रूने बळकावलेल्या पोस्टपर्यन्त जाण्यासाठी बर्फाची मोठी भिंत ओलांडून जावे लागणार होते. तिथवर पोहोचण्यासाठी बनविण्यात आलेल्या टीमचे नेतृत्व बाना सिंग यांच्याकडेच होते.
बाना सिंग यांनी सर्व सैनिकांना प्रचंड स्फुरण दिले. सरपटत त्यांनी बर्फाची भिंत चढण्यास सुरुवात केली. तिथे असलेल्या शत्रूवर त्यांनी हॅन्ड ग्रेनेडचा मारा सुरू केला. समोरासमोर सुरू झालेल्या धुमश्चक्रीत अनेक पाकिस्तानी सैनिक गारद झाले.
बाना सिंग चार सैनिक घेऊन एकेक इंच पुढे सरकत होते. तिथे प्रचंड बर्फ पडत असल्याने समोरचे काहीही दिसत नव्हते. कित्येक तास असेच हळूहळू सरकत ते शेवटी पोस्टच्या नजिक पोहोचले. तब्बल २१,००० फूट उंचीवर असलेल्या या पोस्टवर आराम करत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल की काहीही सुगावा लागू न देता भारतीय सैनिक तिथे पोहोचतील.
अचानक पोस्टचा दरवाजा उघडला गेला. पाकिस्तानी सैनिकांसमोर बाना सिंग यमदूत बनून उभे होते. त्यांनी तिथे ग्रेनेड टाकला आणि दरवाजा बंद करुन बाहेर पडले. आता झालेल्या स्फोटात पाकिस्तानी सैनिक छिन्नविच्छिन्न झाले होते. बाहेर उभे असलेले पाकिस्तानी सैनिक देखील एकेक करत संपविण्यात आले. काहींनी तर जीव वाचविण्यासाठी वरून उड्या टाकल्या पण ते देखील उंचीवरून पडल्याने प्राणांना मुकले.
अशा पद्धतीने बाना सिंग यांच्या पराक्रमामुळे २६ जून १९८७ रोजी सियाचीन हिमनदी भागातील ही महत्त्वाची पोस्ट भारताकडे येऊ शकली. बाना सिंग यांच्या शौर्यामुळे त्या पोस्टचे नाव 'बाना टॉप' असे करण्यात आले. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांचा सन्मान सरकारने परमवीर चक्र देऊन केला.