computer

परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ५: छातीत गोळी लागूनही शत्रूला हरवूनच प्राण सोडणारे जदुनाथ सिंग!!

सर्वांना माहीत आहे की, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी आपले प्राण दिले. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील देशापुढील संकटे कमी झालेली नाहीत. वेळोवेळी देशासाठी इथल्या सैनिकांना स्वतःचे प्राण वेचावे लागले आहेत. अशाच सैनिकांपैकी एक म्हणजे परमवीर चक्राचे मानकरी सैनिक जदुनाथ सिंग. सिंग त्या सैनिकांपैकी एक आहेत. ज्यांनी देशाची सेवा करताना प्राण अर्पण केले, पण हार नाही स्विकारली. आज जदुनाथ सिंग यांच्या शौर्याची कहाणी आपण वाचणार आहोत. 

६ फेब्रुवारी १९४८ रोजी सेना नायक जदुनाथ सिंग सैंधारला दोन नंबर पिकेटवर सैन्याची एक तुकडी सांभाळत होते. या तुकडीवर  शत्रूंनी अचानक हल्ला केला.  त्यावेळी त्या चौकीवर सिंग यांच्यासह ९ सैनिक तैनात केलेले होते. 

भारतीय जमिन ताब्यात घेण्यासाठी शत्रू सतत गोळीबार करत होते. हा गोळीबार एवढा भयानक होता की, पोस्टच्या बाहेर शत्रू किती आहेत याचा अंदाज लावणे देखील शक्य होत नव्हते. आपल्या पहिल्याच हल्ल्यात पाकिस्तान पोस्टपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. 

(प्रातिनिधिक फोटो)

आता भारताने प्रत्युत्तर द्यायची वेळ होती. परिस्थिती कठीण असली तरी जदुनाथ सिंग आणि त्यांच्या टीमचे धैर्य मोठे होते. मूठभर सैनिकांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूला मागे ढकलण्यास सुरुवात केली. त्यांचे ९ सैनिकांपैकी ४ सैनिक गंभीर जखमी झाले होते. 

जदुनाथ आपल्या गोळ्यांनी शत्रूला निशाणा बनवत होते. शत्रूला अजून कुमक येऊन मिळाली आणि भारतीय सैनिक धोक्यात आले. स्वतः जदुनाथ यांना एका हाताला गोळी लागली होती. आता काहीतरी करणे भाग होते. जदुनाथ यांनी आपल्या सैनिकांमध्ये प्रचंड प्रेरणा भरली. 

जखमी सैनिकांनी जोरदार हल्ला चढवला. पोस्ट भारताच्या ताब्यात होती. पाकिस्तानने मोठा हल्ला चढवण्याचे ठरवले, पण काहीही झाले तरी पोस्ट पाकिस्तानच्या ताब्यात जाणार नाही हे भारतीय सैनिकांनी निश्चित केले होते.

जदुनाथ सिंग पुढे जाऊन पाकिस्तानच्या सैनिकांना निशाणा बनवू लागले. शत्रू सैन्य आता बेजार झाले होते. एवढ्यात एक गोळी येऊन जदुनाथ यांच्या छातीत आरपार गेली. पण तरी त्यांनी शत्रूला पूर्ण मागे ढकलल्यावर मगच जीव सोडला. समोर एवढे सैन्य असून देखील आपल्या ९ सैनिकांना घेऊन लढणाऱ्या जदुनाथ सिंग यांनी पोस्ट शत्रूच्या ताब्यात जाऊ दिली नाही. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required